' कोरोनाग्रस्त रुग्णाकडून संसर्ग पसरणं नक्की कधी, कसं थांबतं? – InMarathi

कोरोनाग्रस्त रुग्णाकडून संसर्ग पसरणं नक्की कधी, कसं थांबतं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगभर कोरोनाने थैमान घालून २ वर्षे झाली. अजूनही कोरोना संपायचं नाव घेत नाही. कोरोनाच्या डेल्टा, ओमिक्रॉनसारख्या व्हेरियंट्सचाही मोठ्या प्रमाणावर संसर्ग व्हायला लागला आणि आपले धाबे दणाणले.

कोरोना एव्हाना घराघरात पोहोचलाय तरी या आजाराबाबत सगळं आपल्याला माहीत झालंय का? असा प्रश्न स्वतःला विचारला तर शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांसकट आपल्या प्रत्येकाचंच यावरच उत्तर ‘नाही’ असं आहे.

एकीकडे आपण या आजाराला सरसावत असलो तरी अजूनही आपण कोरोना आणि त्याचे बाकी व्हेरियंट्स नेमके काय आहेत, ते कसे पसरतात, किती कालावधीत पसरतात, पसरल्यानंतर रुग्णात किती काळ ती लक्षणं दिसतात, लक्षणं दिसली म्हणजेच कोरोना झालाय की लक्षणं दिसत नसतानाही कोरोनाची आपल्याला लागण झालेली असू शकते हे सगळंच हळूहळू समजून घेतोय.

 

 

corona test inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आपल्याला हा आजार, त्यामुळे सगळीकडे निर्माण झालेलं वातावरण एव्हाना सवयीचं झालेलं असल्यामुळे पूर्वी जितकी आपल्याला कोरोनाची भीती वाटत होती तितकी आता वाटत नाही. मात्र या रोगाचं गांभीर्य अद्याप कायम आहे, असणार आहे आणि कदाचित दिवसेंदिवस अधिकाधिक वाढणारही आहे. त्यामुळे स्वतःची योग्य ती काळजी घेण्यात हलगर्जीपणा करणं आपल्याला परवडणारं नाही. आपल्याला अगदी छोटे छोटे तपशील व्यवस्थित समजून घ्यावे लागणार आहेत. एकदा ते समजून घेता आले की कोरोनाचा वैयक्तिक, समाजिक, जागतिक पातळीवर असणारा लढा कठीणच राहिला तरी लढा देणं आधीपेक्षा अधिक सुसह्य होईल, आधीपेक्षा कमी भीतीदायक होईल.

कोरोना आणि ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर किती दिवसांत लक्षणं दिसतात? त्यानंतर पुढच्या किती काळात ती बाकीच्यांपर्यंत पसरतात?

अभ्यासकांच्या मते, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर साधारण ५-६ दिवसांत कोरोनाची लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे लक्षणं दिसण्याच्या थोडं आधी आणि थोडं नंतर या रोगाची तीव्रता खूप जास्त असते. रोगाचा संसर्ग इतरांना होण्याची भीती अधिक असते.

रोगाची लक्षणं दिसू लागण्यानंतर पहिल्या आठवड्यात या रोगाचा संसर्ग इतरांना होऊ शकतो. त्यातही आठवड्यातले पहिले ५ दिवस संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. कोरोनाची लक्षणं दिसत नसतील तरीदेखील एखाद्या व्यक्तीला कोरोना असू शकतो आणि त्या व्यक्तीकडून इतरांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो.

आधी लक्षणं दिसत नाहीयेत पण नंतर दिसायला लागली आहेत असंही होऊ शकतं. साधारणपणे पहिल्या आठवड्यानंतर कोरोनाची लक्षणं हळूहळू कमी होत जातात. जर रुग्णाला झालेल्या कोरोनाची तीव्रता फार कमी असेल किंवा माफक स्वरूपात असेल तर कोरोना झालेल्या रुग्णाकडून ७ ते १० दिवसांतच इतरांना विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो.

 

corona weakness inmarathi

 

कोरोनाची लक्षणं दिसून २ आठवडे उलटून गेल्यानंतर कोरोनाच्या रुग्णाकडून इतरांना त्याचा संसर्ग होत नाही. मात्र रुग्णाला फार गंभीर स्वरूपात कोरोनाची लागण झाली असेल तर अगदी १० ते २० दिवसही कोरोनाची लक्षणं रुग्णात असू शकतात. पण तरीही सर्वसाधारणपणे कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर साधारण ५ दिवसांत ती इतरांच्यात संक्रमीत होतात.

साधारणपणे खोकल्यावाटे आणि शिंकण्यातून कोरोना पसरतो. कोरोनाची आणि डेल्टाच्या आधी आलेल्या इतर व्हेरियंट्सची लक्षणं जरी ५-६ दिवसांत दिसत असली तरी डेल्टाच्या बाबतीत ही लक्षणं ४ दिवसांत दिसायला लागत होती.

आता ओमिक्रॉनच्या बाबतीत तर ती अवघ्या २ ते ३ दिवसांत दिसतात. कोरोनाच्या इतर व्हेरियंट्सच्या मानाने ओमिक्रॉन फार झपाट्याने पसरतो.

स्पेनच्या ला रिओजा आंतरराष्ट्रीय विद्यापीठातल्या प्राध्यापकांनी सांगितलं की, “कुणीतरी शिंकल्यानंतर एका दिवसात विषाणूंची संख्या वाढायला सुरुवात होते आणि दोन दिवसांत लक्षणं येतील एवढी ती संख्या वाढते.”

 

 

cold inmarathi

 

साधारणपणे कोरोना झालेल्या रुग्णाला लक्षणं दिसायला सुरुवात होऊन १० दिवसांच्या वर कालावधी उलटून गेला असेल, २४ तासांत ताप घालवण्याची कुठलीही औषधं न घेता ताप यायचा बंद झाला असेल, केवळ अन्नाची चव लागत नाहीये आणि वास येत नाहीये इतकी लक्षणं वगळता बाकी कुठली लक्षणं दिसत नसतील तर तो रुग्ण मास्क लावून आणि इतर आवश्यक काळजी घेऊन माणसांमध्ये जाऊ शकतो.

पण हे अर्थातच ज्यांना फार कमी तीव्र स्वरूपात किंवा माफक स्वरूपात कोरोना झालाय त्यांच्याच बाबतीत योग्य ठरतं. ज्यांची या आजाराची तीव्रता फार जास्त आहे त्यांनी किमान २० दिवस क्वारंटाईन राहणं आवश्यक असतं.

ओमिक्रॉनच्या बाबतीत हे चित्र काहीसं वेगळं आहे. अमेरिकेत सहा कोरोना रुग्णांवर झालेला एक अभ्यास डिसेंबरमध्ये प्रकाशित करण्यात आला . त्या अभ्यासानुसार, कोरोनाच्या इतर व्हेरियंट्समध्ये लक्षणं दिसण्याचा कालावधी ५-६ दिवसांचा असतो ज्याला ‘इन्क्युबेशन पिरियड’ म्हणतात. मात्र ओमिक्रॉन चा हा ‘इन्क्युबेशन पिरियड’ केवळ ३ दिवसांचा असतो.

कोरोनाच्या इतर व्हेरियंट्सपेक्षा ओमिक्रॉन जरी झपाट्याने पसरत असला तरी इतर व्हेरियंट्सच्या मानाने त्याची तीव्रता बरीच कमी आहे आणि ओमिक्रॉनमुळे हॉस्पिटलला रुग्ण दाखल करायला लागल्याची उदाहरणं आणि ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाल्याची उदाहरणंही फार कमी आहेत.

ओमिक्रॉन असतो तेव्हा लक्षणं दिसण्याच्या साधारण १ ते २ दिवस आधी आणि लक्षणं दिसल्यानंतर साधारण १ ते २ दिवस ओमिक्रॉनचा संसर्ग लोकांना होण्याची शक्यता असते. कोरोनाच्या इतर व्हेरियंट्सच्या बाबतीत जशी आठवडे, २ आठवडे किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ कोरोनाची लक्षणं दिसतात तसं ओमिक्रॉनच्या बाबतीत होत नाही.

 

omicrone virus inmarathi

 

ओमिक्रॉनची लक्षणं रुग्णात ७ दिवसांच्या वर आढळून येत नाहीत आणि साधारण त्यातलया ५ दिवसांतच त्याचा संसर्ग इतरांना होऊ शकतो. लागण झालेल्या व्यक्तीकडून इतरांना विषाणूंचा संसर्ग होईल की नाही हे तपासण्यासाठी त्या व्यक्तीला ‘अँटीजेन टेस्ट’ करण्याचा सल्लाही दिला जातो. ही टेस्ट स्वस्तात होते.

ज्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसून येत नाहीत पण कोरोना झालेला असतो अश्या रुग्णांकडूनही विषाणूंचा संसर्ग होण्याचा कालावधी हा ती लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत जितका असतो तितकाच असणं अपेक्षित आहे. ओमिक्रॉन रुग्णांच्या बाबतीत लक्षणं दिसत नसलेल्या व्यक्तीकडून अधिक जास्त प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता असते कारण ते क्वारंटाईनमध्ये नसतात आणि लक्षणं दिसत नसल्यामुळे स्वतःची अतिरिक्त काळजीही घेत नसतात.

लहान मुलांमध्येसुद्धा कोरोनाची लक्षणं दिसत नसली तरी प्रौढांच्या बाबतीत विषाणू इतरांमध्ये संक्रमित व्हायला जितका काळ लागतो तितक्याच वेगाने लहान मुलांकडूनही विषाणू पसरतो असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. सर्वसाधारणपणे ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना तरुणांच्या आणि मध्यमवयीनांच्या मानाने जास्त दिवस कोविड होऊ शकतो. पण हे असंच असेल असं नाही. वेगवेगळ्या वयातल्या माणसामाणसानुसार हा कालावधी अगदी थोड्याफार फरकाने मागेपुढे होतो.

आपल्यापैकी कुणालाही कधीही क्वारंटाईन व्हावं लागेल अशी बाहेर परिस्थिती आहे. घरात क्वारंटाईन झालेल्या रुग्णांसाठी हे सगळं जितकं कठीण आहे तितकंच त्या घरात राहणाऱ्या इतरांसाठीही ते कठीण आहे. स्वतःची काळजी घेत घेत शक्य तितकं अंतर ठेवून आपल्या जवळच्या माणसाची काळजी घ्यायची आहे.

 

self quarantine inmarathi
the tribune india

 

शक्य होईल तितका आपल्याला प्रवास टाळावा लागणार आहे आणि जमेल तितकं घरूनच काम यापुढचा काही काळ तरी करावं लागणार आहे. त्यामुळे न घाबरता, पण महत्त्वाची ती सगळी माहिती मिळवत आपण स्वतःची व्यवस्थित काळजी घेत कोरोनासोबत जगत राहूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?