Site icon InMarathi

देशाला पहिला वर्ल्डकप मिळवून देणारा कपिल देव त्या दिवशी मात्र टीव्हीवर ढसाढसा रडला!

kapil dev crying featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कपिल देव म्हटलं की अनेक विशेषणं, अनेक उपाध्या अगदी सहजपणे आठवतात. भारताचा पहिला फास्ट बॉलिंग ऑलराउंडर म्हटलं तर कपिल, भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार कपिल, भारतीय संघाला स्वप्नं बघायला शिकवणारा कपिल, गोलंदाजीत खोऱ्याने विकेट काढून गोलंदाजीचे विश्वविक्रम रचणारा कपिल, नाबाद १७५ धावा ठोकून इतिहास घडवणारा कपिल, अशा गोष्टींची यादीच करायला गेली, तर ती मारुतीच्या शेपटासारखी वाढतच जाईल.

भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या क्रिकेटपटूंची यादी करायची झाली, तर कपिल देव निखंज हे नाव फार वरच्या क्रमांकावर लिहावं लागेल.

 

 

याचं एक कारण असं आहे, की त्याने स्वप्नं पाहिली; केवळ स्वतःसाठी नव्हे, तर देशासाठी स्वप्नं पाहिली. वर्ल्डकप खेळायला मिळाला हेच भाग्य आहे, अशी विचारसरणी असणाऱ्या भारतीय संघाला ती स्पर्धा जिंकण्याची स्वप्नं दाखवण्याची धमक त्याच्यात होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

केवळ स्वप्नं दाखवली नाहीत, तर ती सत्यात कशी आणायची हे स्वतःच्या कामगिरीतून दाखवून दिलं. संघाला जेव्हा गरज पडली तेव्हा बाह्या सरसावत आणि कॉलर उंचावत पुढे होणं, ही कपिलदेवची ओळख होती असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.

भारतीय संघाचा एक अविस्मरणीय कर्णधार आणि एक सच्चा खेळाडू असणाऱ्या या कपिलदेव नावाच्या व्यक्तीवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर त्याला वाईट वाटलं नसतं तरच नवल!

 

 

कपिलदेवला वाईट वाटलं, नुसतंच वाईट वाटलं नाही, तर तो चक्क कॅमेऱ्यासमोर, टीव्हीवर ढसाढसा रडला नेमकं काय घडलं होतं, काय होते ते आरोप आणि यामागे नेमकं होतं तरी कोण? चला आज घेऊयात.

निवृत्तीनंतर बनला भारतीय संघाचा कोच

कपिलदेवने एका यशस्वी कारकिर्दीचा शेवट केला, तो १९९४ मध्ये. त्याने निवृत्ती स्वीकारली आणि भारताचा तत्कालीन सर्वोत्तम अष्टपैलू निवृत्त झाला. काही माणसं अशी असतात, जी खेळातून निवृत्त झाली, तरी खेळापासून दूर राहू शकत नाहीत.

अशाच दिग्गजांपैकी एक म्हणजे कपिलदेव. आजही समालोचक किंवा क्रिकेट समीक्षक म्हणून कपिलदेव अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. निवृत्तीनंतर त्याची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी लागली होती.

हा कार्यकाळ मात्र अल्पकालीन आणि खडतर ठरला. कपिलदेव यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने केवळ एकच कसोटी सामना जिंकला.

 

भारतीय भूमीवर न्यूझीलंडला पराभूत करणाऱ्या या संघाला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-० आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-० अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. अशा या अपयशी कामगिरीमुळे चहूबाजूंनी टीकेचा भडीमार झाला.

कपिलदेव यांच्या या अपयशाची उलट-सुलट चर्चा घडू लागली. १९८३ साली इतिहास घडवून भारताचं नाव सुवर्णक्षरांनी कोरल जाईल अशी कमाल करणारा कपिलदेव क्रिकेट चाहत्यांना आणि जाणकारांना व्हिलन वाटू लागला. अशा या प्रशिक्षकाने अखेरीस राजीनामा दिला. मात्र याचं कारण काहीसं वेगळं होतं.

राजीनामा देण्याचं कारण…

एका बाजूला अपयश पदरी पडत असताना आणि दुसरीकडे सगळ्यांच्या टीकेचे धनी झालेले असताना, कपिलदेव यांच्यावर फार गंभीर आरोप करण्यात आले. हे आरोप करणारी व्यक्ती होती मनोज प्रभाकर. मनोज प्रभाकर यांनी कपिलदेव यांच्यावर चक्क मॅच फिक्सिंगचे आरोप केले.

यामुळे मात्र भारतीय क्रिकेटविश्व अधिकच हादरलं. रवी शास्त्री यांनी सुद्धा प्रभाकरच्या बोलण्याला दुजोरा दिला होता. मीडिया, माजी खेळाडू, चाहते अशा सगळ्यांच्या तोंडी हा एकच विषय सुरु होता.

अर्थात, यापैकी कुणाचाच प्रभाकर यांच्या बोलण्यावर फारसा विश्वास नव्हता. कपिलदेव सारखा क्रिकेटप्रेमी, सच्चा आणि दर्जेदार खेळाडू असं करणार नाही, याची सगळ्यांनाच खात्री वाटत होती.

 

 

कपिलदेव यांनी मात्र भारतीय प्रशिक्षकपदाचा राजीनामा देऊ केला. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची झालेली बदनामी, त्यांना सहन करावा लागलेला त्रास, या सगळ्याला ते कंटाळले होते. कपिलदेव यांची कुठलीही चूक नसताना, त्यांना भयानक मानसिक त्रास मात्र सहन करावा लागला होता.

कपिलदेव नेमकं काय म्हणाले?

वैयक्तिक राग किंवा एखाद्या कट कारस्थानाचा एक भाग म्हणून आपल्यावर असे हीन दर्जाचे आरोप करण्यात आले असल्याचं त्यावेळी कपिलदेव यांनी स्पष्ट केलं होतं. एवढंच नाही, तर प्रभाकर याने समोरासमोर सामना करावा आणि हे आरोप करून दाखवावेत अशी इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली होती.

रवी शास्त्री इतकी वर्षं नेमकं काय करत होते असा सवाल सुद्धा त्यांनी केला होता. सुनील गावस्कर, प्रशांत वैद्य, नयन मोंगिया, नवज्योत सिद्धू अशा खेळाडूंनी मात्र या आरोपांचा खंडन केलं होतं.

एका मुलाखतीत कपिलदेव यांना याविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरं देताना मात्र ते फारच भावुक झालेले पाहायला मिळाले.

 

 

या खोट्या आरोपांमुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, त्यांचं क्रिकेटवर जीवापाड प्रेम आहे, आणि ते क्रिकेटशी कधीही गद्दारी करू शकणार नाहीत, असं या मुलाखतीत ठासून सांगताना, त्यांना अश्रू अनावर झाले. कॅमेऱ्यासमोर, टीव्हीमध्ये कपिलदेव ढसाढसा रडले.

‘असं कृत्य करण्याऐवजी मी स्वतःचा जीवही दिला असता.’ असंही कपिलदेव यांनी यावेळी म्हटलं होतं.

चोर तर चोर आणि वर शिरजोर…

कपिलदेव यांच्यावर इतके गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर, त्यांची सीबीआय चौकशी सुद्धा करण्यात आली. मात्र या चौकशीअंती हे सिद्ध झालं, की त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे होते.

गंमतीचा भाग असा, की कपिलदेव यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपानंतर जवळपास तीन वर्षांनी मॅच फिक्सिंगचे खरे सूत्रधार जगासमोर आले.

 

 

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि एका सट्टेबाजाचा संवाद दिल्ली पोलिसांच्या हाती लागला. सुरुवातीला आरोपांचं खंडन करणाऱ्या क्रोनिएने अखेर सगळे आरोप मान्य केले.

एवढंच नाही, तर त्याने फिक्सिंगमध्ये सहभागी असणाऱ्या इतरही काही खेळाडूंचा नामोल्लेख केला. त्यात चक्क मनोज प्रभाकर हे नाव समाविष्ट होतं.

कपिलदेव यांना मात्र या सगळ्या घटनेमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांचं मुलाखतीत भावुक होणं आणि अश्रूंचा बांध फुटणं, हे या गोष्टीला दुजोरा देण्यासाठी पुरेसं आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version