' सगळं काही आहे मात्र ही एक गोष्ट नाही; १० कलाकारांची दुखरी नस… – InMarathi

सगळं काही आहे मात्र ही एक गोष्ट नाही; १० कलाकारांची दुखरी नस…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठलंही क्षेत्र असो, त्यात जर दीर्घकाळ टिकून राहायचं असेल तर स्पर्धेला पर्याय नाही. कित्येकजणांच्या वाट्याला यशही येत नाही, पण यशस्वी होऊनही काही वेळेस त्या यशाला अधिक झळाळी आणणारी, अधिक अधोरेखित करणारी त्या यशाची पावती माणसाला हवी असते. मग कधी ती कुणाच्या बाबतीत एखाद्या मानाच्या बढतीची असेल तर कुणाच्या बाबतीत पुरस्काराच्या रूपात असेल.

एकदा का यशावर अशी एखाद्या महत्त्वाच्या सन्मानाची मोहोर उमटली की माणूस भरून पावतो, पण यशस्वी झालेल्या भल्याभल्या मंडळींच्या बाबतीत जेव्हा असं काहीतरी त्यांच्या कारकिर्दीला चार चाँद लावणारं घडत नाही, तेव्हा ते न घडण्याची चुटपूट मात्र त्यांना आणि त्यांच्या जवळच्यांना, हितचिंतकांना लागून राहते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बॉलिवूड इंडस्ट्रीतही अनेक यशस्वी कलाकार आपण पाहतो. इंडस्ट्रीत दिल्या जाणाऱ्या काही अतिशय मानाच्या पुरस्कारांपैकी ‘फिल्मफेअर’ हा एक पुरस्कार आहे, पण कित्येकदा हे आपले आवडते कलाकार काही महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरीच ठरलेले नाहीयेत हे आपल्याला माहीत नसतं आणि माहीत होतं तेव्हा त्याविषयी आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

बॉलिवूडमधल्या अशा काही यशस्वी दिग्गजांना आजवर ‘फिल्मफेअर’ पुरस्कारच मिळालेला नाही. आजपर्यंतच्या फिल्मी कारकिर्दीवर ‘फिल्मफेअर’ची मोहोर न उमटलेले असे १० अभिनेते-अभिनेत्री पाहुयात.

१. तब्बू –

tabbu inmarathi

तब्बू हे नाव आपण अभिनयापासून वेगळं करूच शकत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या उत्तमोत्तम अभिनयाने, भूमिकांनी तब्बू आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आलीये.

‘माचीस’, ‘विरासत’, ‘नेमसेक’, ‘हैदर’, ‘दृश्यम’ आणि २-३ वर्षांपूर्वी आलेला ‘अंधाधून’ यांसारख्या अनेक सिनेमांमधून तब्बूने अप्रतिम काम केलेलं आहे. लोकप्रिय अभिनेत्री तर ती आहेच पण समीक्षकांचीही लाडकी अभिनेत्री आहे.

‘फिल्मफेअर’च्या ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’च्या पुरस्कारासाठी तब्बूला ६ वेळा नामांकनं मिळाली आहेत. ‘समीक्षकांची निवड’ आणि ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण’ या श्रेणींअंतर्गत तिला ‘फिल्मफेअर अवॉर्ड’ मिळाले आहेत, पण ऐकायला आणि वाचायला कितीही आश्चर्यकारक वाटलं तरी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ म्हणून तब्बूला अद्याप फिल्मफेअरने गौरवण्यात आलेलं नाही.

२. धर्मेंद्र –

 

dharmendra 1 inmarathi

 

धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीतले प्रथितयश आणि ज्येष्ठ अभिनेते. तब्बल ५ दशकं २५० चित्रपटांमधून कामं करत ते पडद्यावर दीर्घकाळ राज्य करत राहिले. त्यांनी ‘शोले’, ‘यादों की बारात’, ‘जीवन मृत्यू’, ‘चुपके चुपके’ अश्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं.

तमाम चाहत्यांनी त्यांच्या कामाची आजवर प्रशंसा केली. धर्मेंद्र यांना ‘फिल्मफेअर’च्या ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ या श्रेणीअंतर्गत १० वेळा नामांकनं मिळाली आहेत, तरी धर्मेंद्र यांना इतक्या प्रदीर्घ कारकीर्दीत दुर्दैवाने आजवर एकदाही ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळालेला नाही. मात्र १९९७ साली त्यांना ‘फिल्फेअर’च्या ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानीत केलं आहे.

३. शशी कपूर –

 

shashi kapoor inmarathi

६० च्या दशकातल्या महत्त्वाच्या रोमँटिक हिरोजपैकी एक समजल्या जाणाऱ्या शशी कपूर यांनी जवळपास १७० चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत.

अनेकांकडून मिळालेल्या प्रशंसेचे ते मानकरी ठरले आहेत. ‘जब जब फूल खिले’, ‘दीवार’, ‘त्रिशूल’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून त्यांनी उत्तम भूमिका वठवल्याच. शिवाय, अनेक इंग्रजी चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

त्यांना त्यांच्या ‘मुहाफिझ’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘दीवार’ या चित्रपटासाठी ‘फिल्मफेअर’चा ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्या’चा पुरस्कार मिळाला होता.

असं असूनही आजवर एकदाही त्यांना ‘फिल्मफेअर’चा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’साठीचा पुरस्कार मिळालेला नाही. मात्र शशी कपूर यांनाही ‘फिल्मफेअर’च्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारने गौरवण्यात आले आहे.

४. शत्रुघन सिन्हा –

 

shatrughna sinha inmarathi

 

शत्रुघन सिन्हा हे भारतीय चित्रपटसृष्टीतलं एक अतिशय महत्त्वाचं नाव. या ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्या ४ दशकांच्या मोठ्या कारकिर्दीत सुमारे १५० चित्रपटांमधून कामं केली आहेत. रसिकप्रेक्षकांच्या कौतुकाला ते पात्र ठरलेले आहेत.

त्यांना आजवर चार वेळा फिल्मफेअर नामांकनं मिळाली आहेत. ‘मेरे अपने’, ‘कालीचरन’, ‘विश्वनाथ’, ‘तन्हाई’, ‘काला पथ्थर’, ‘शान’, ‘पारस’ या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. इतक्या लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेत्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला नाही याचं नवल वाटल्याशिवाय राहत नाही.

५. अक्षय कुमार –

 

Akshay_Kumar_1 InMarathi

 

गेली अनेक वर्षं प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करत आलेला अक्षय कुमार हा अभिनेता. त्याच्या चित्रपटांनी आजवर बॉक्स ऑफिसवर इतकी भरघोस कमाई केली आहे, की आर्थिक गणित चोख कळलेला अभिनेता म्हणूनदेखील अक्षय कुमार ओळखला जातो.

अक्षय कुमारने जवळपास ११० चित्रपटांमधून काम केलेलं असून ‘मोहरा’, ‘बेबी’, ‘एअरलिफ्ट’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ , ‘पॅडमॅन’ यांसारख्या अनेक चित्रपटांतल्या त्याच्या भूमिका गाजलेल्या आहेत.

२००१ साली ‘अजनबी’ या चित्रपटासाठी त्याला ‘फिल्मफेअर’चा ‘सर्वोत्कृष्ट खलनायका’चा पुरस्कार मिळाला होता. २००५ साली ‘गरम मसाला’ या चित्रपटासाठी त्याला ‘फिल्मफेअर’चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्या’चा पुरस्कार मिळाला होता. मात्र, ‘फिल्मफेअर’चा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’साठीचा एकही पुरस्कार अक्षय कुमारच्या नावावर नाही.

६. अजय देवगण –

 

Ajay-Devgn-2 InMarathi

 

९० च्या दशकापासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करू लागलेला हा आणखी एक नावाजलेला अभिनेता. अजय देवगण त्याच्या बोलक्या डोळ्यांसाठी आणि उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो.

‘फूल और कांटे’ या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि जवळजवळ १०० चित्रपटांमधून कामं केली. ‘इश्क’, ‘सिंघम’, ‘दृश्यम’, ‘रेड’ हे त्याचे काही गाजलेले चित्रपट. अजय देवगणने फिल्मफेअर पुरस्काराच्या ४ वेगवेगळ्या विभागांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत.

त्याला ‘फिल्मफेअर’च्या ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’च्या श्रेणीअंतर्गत ७ वेळा नामांकनं मिळाली आहेत. असं असूनही त्याला आजवर एकदाही ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’साठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळू शकलेला नाही.

७. सुनील शेट्टी –

 

sunil shetty inmarathi

 

सुनील शेट्टी हे ९० च्या दशकातले एक महत्त्वाचे ‘ऍक्शन हिरो’ म्हणून ओळखले जातात. पण केवळ हीच त्यांची ओळख नसून त्यांनी खलनायक आणि विनोदी अभिनेता म्हणून साकारलेल्या अनेक भूमिकाही गाजलेल्या आहेत.

‘मोहरा’ , ‘टक्कर’, ‘हेरा फेरी’, ‘धडकन’, ‘शूटआउट ऍट वडाला’ या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका त्यांच्या कारकिर्दीतल्या काही महत्त्वाच्या भूमिका समजल्या जातात.

‘धडकन’ या अतिशय गाजलेल्या चित्रपटाकरता ते ‘फिल्मफेअर’च्या ‘सर्वोत्कृष्ट खलनायका’च्या पुरस्काराचे मानकरी ठरले होते. मात्र अद्याप त्यांना ‘फिल्मफेअर’चा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’चा पुरस्कार मिळालेला नाही.

८. उर्मिला मातोंडकर –

 

urmila matondkar inmarathi

 

९० च्या दशकातली उर्मिला मातोंडकर ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री. तिच्या ‘रंगीला’मधल्या भूमिकेनंतर तर ती तिच्या मादक सौंदर्यासाठीही ओळखली जाऊ लागली. उर्मिला ही फार सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

‘प्यार तुने क्या किया’, ‘एक हसीना थी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून तिने साकारलेल्या हटके भूमिकांमधून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तरीदेखील ‘फिल्मफेअर’च्या ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा शिक्का आजवर उर्मिलाच्या नावापुढे लागलेला नाही.

९. राजेंद्र कुमार –

 

rajendra kumar inmarathi

 

राजेंद्र कुमार हे ज्येष्ठ अभिनेते ‘जुबिली कुमार’ या नावानेही ओळखले जातात. कारण, त्यांचे ६० च्या दशकातले अनेक चित्रपट ‘जुबिली हिट्स’ ठरले. भारतीय चित्रपटसृष्टीतले एक महत्त्वाचे अभिनेते समजले जाणारे राजेंद्र कुमार त्यांच्या ‘धूल का फूल’, ‘मेरे मेहबूब’, ‘संगम’ या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी प्रामुख्याने ओळखले जातात.

जवळपास ८० चित्रपटांमधून काम केलेल्या या अभिनेत्याला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’च्या श्रेणीअंतर्गत ४ वेळा ‘फिल्मफेअर’ची नामांकनं मिळाली आहेत. त्यांना १९६९ साली ‘पद्मश्री’ पुरस्कारानेदेखील सन्मानीत करण्यात आलं होतं. मात्र त्यांना त्यांच्या ४ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘फिल्मफेअर’चा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’साठीचा एकही पुरस्कार मिळालेला नाही.

१०. माला सिन्हा –

 

mala sinha inmarathi

 

माला सिन्हा या बॉलिवूड जगतातलया एक अतिशय सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. ‘मर्यादा’, ‘नाईट इन लंडन’, गीत’, ‘आंखें’ या आणि अश्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत.

‘फिल्मफेअर’च्या ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’च्या विभागाअंतर्गत त्यांना ४ वेळा नामांकन मिळाली होती. माला सिन्हा यांना जरी अनेक पुरस्कार मिळाले असले तरी ‘फिल्मफेअर’चा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मात्र त्यांना मिळू शकलेला नाही.

काही महत्त्वाचे पुरस्कार वाट्याला येवोत न येवोत, या वरच्या सगळ्या कलाकारांवर प्रेक्षक कौतुकाचा, प्रेमाचा वर्षाव करत आलेले आहेत. करत राहणार आहेत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?