Site icon InMarathi

नूडल्सची विक्री ते थेट गुगलशी पंगा; सॅमसंगच्या या गोष्टी तुम्हाला माहीतच नसतील!

samsung inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

प्रत्येकाच्या खिशात अगदी हमखास असणाऱ्या, मोबाईलफोन कंपन्यांमधील काही नावं अगदी सहजपणे तोंडावर येतात. एमआय, वनप्लस, ओप्पो, विवो, अॅपल, एलजी अशा कंपन्यांच्या नावांसह सॅमसंग हे नाव सुद्धा अगदी लीलया या यादीत येऊन बसतं.
केवळ मोबाईलच नव्हे, तर टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप्स, या आणि अशा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदी-विक्रीत सॅमसंग हे नाव अगदी नियमितपणे कानावर पडतं, पण या सॅमसंगबद्दलच्या अशाही काही बाबी आहेत, ज्या सहसा माहित नसतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

YouTube video player

सॅमसंग एक उत्तम इलेक्ट्रॉनिक कंपनी म्हणून सगळ्यांनाच ठाऊक आहे, मात्र या गोष्टी जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेमकी काय आहेत, सॅमसंगची ही सिक्रेट्स? काय आहेत या सहजरित्या कानावर न पडणाऱ्या बाबी… चला आज जाणून घेऊया.
१ सॅमसंग म्हणजे थ्री स्टार्स
बऱ्याचदा आपल्याला कंपनीचं किंवा ब्रँडचं नाव ठाऊक असतं, मात्र या नावाचा अर्थ किंवा नावामागची कथा अजिबातच माहित नसते. अशीच काहीशी बाब सॅमसंगच्या बाबतीत सुद्धा आहे. कंपनीची निर्मिती करणारा Lee Byung-chul याला कंपनी भविष्यात मोठी मजल मारेल याविषयी खात्री होती.
म्हणूनच त्याने कंपनीचं नाव ‘थ्री स्टार्स’ असा अर्थ असणाऱ्या शब्दावरून ठेवलं होतं. एवढंच नाही, तर सॅमसंगच्या लोगोमध्ये दिसणारा निळा लंबगोल, म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून, ब्रह्मांड आहे. म्हणूनच सॅमसंगच्या लोगोमध्ये हा अशा प्रकारचा लंबगोल वापरण्यात आला होता.
२. अगदी आयफोनमध्ये सुद्धा ‘सॅमसंग’ आहे…
वाचून चक्रावून गेलात ना? हो, पण हे सत्य आहे. सॅमसंग ही काही फक्त मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारी कंपनी नाही. कोरियामध्ये तर सॅमसंगचा आवाका फारच मोठा आहे.
सॅमसंग टॉवर पॅलेस, सॅमसंग मेडिकल सेंटर, महाविद्यालयं अशा प्रकारच्या अनेक क्षेत्रात सॅमसंग हे नाव दिमाखात घेतलं जातं. जगातील सगळ्यात उंच असणारी इमारत, म्हणजेच बुर्ज खलिफा हीदेखील सॅमसंग सी अँड टी कॉर्पोरेशनने बांधली आहे.
मग आता तुम्ही म्हणाल, याचा आयफोनशी काय संबंध? थांबा की मंडळी, तेही सांगतोय. इलेक्ट्रॉनिकच्या विश्वात सुद्धा निराळी छाप पाडणारी सॅमसंग, गॅजेट्ससाठी लागणारं हार्डवेअर सुद्धा तयार करते. मोबाईलसाठी लागणाऱ्या प्रोसेसर चिप्स असोत किंवा रॅम, मोबाईलमधील इतर छोटेमोठे पार्टस असोत, किंवा थेट मोबाईलची स्क्रीन; अनेक कंपन्या चक्क सॅमसंगचं हार्डवेअर वापरतात.
छोट्यात छोट्या ब्रँडपासून आयफोनपर्यंत कुठलंही गॅजेट तुम्ही वापरत असाल, तर त्यात सॅमसंगचं अस्तित्व असणार हे नक्की!
३. पहिला मान सॅमसंगचा…
नुकतेच सॅमसंगने फोल्ड होऊ शकतील, असे मोबाईल्स बनवले आहेत, हे तर तुम्हाला माहित असेलच. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्याच्या जाहिराती तुम्ही पाहत असाल. पहिल्यांदाच अशाप्रकारचा फोन बनवणारी सॅमसंग ही पहिलीच कंपनी आहे. त्याआधी मोबाईलच्या कर्व्ह्ड स्क्रीन तयार करण्यात सुद्धा सॅमसंगने पहिला नंबर लावला होता.
सीडीएमए सेल्युलर सिस्टिम, डिजिटल टीव्ही, पहिला एमपीथ्री कॅमेरा फोन, १० मेगापिक्सेल इनबिल्ट कॅमेरा असणारा पहिला फोन अशा अनेक नवीन शोधांचं श्रेय सुद्धा सॅमसंगला जातं.
४. किराणा आणि नूडल्सचं दुकान…
सॅमसंग म्हटलं की स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टीच आठवतात. मात्र हीच सॅमसंग कंपनी चक्क नूडल्स आणि किराणा विकणारं दुकान म्हणून सुरु झाली होती.
सुकवलेले मासे, पिठं, भाज्या अशा किराणा सामानासह, स्वतःचे नूडल्स सुद्धा सॅमसंग बनवत असे. अर्थात या सामानाची निर्यात करण्याचा व्यवसाय केला जात असे. म्हणजेच, सॅमसंगची सुरुवातच मोठ्या महत्वाकांक्षेसह आणि मोठ्या प्रमाणावर झाली आहे असं म्हणायला हवं.
हळू हळू साखर आणि कापडउद्योगांसारख्या व्यवसायात सुद्धा सॅमसंगने शिरकाव केला. १९३८ साली उदयास आलेली सॅमसंग दिवसेंदिवस मोठी होत होती.
अखेरीस १९६९ मध्ये, आज ज्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठ्या दिमाखात पाय रोवून उभे आहेत, त्या इलेक्टोनिक क्षेत्रात सॅमसंगने पहिलं पाऊल ठेवलं. याच प्रवासातून मग पुढे मोबाईल आणि स्मार्टफोन्सचा जन्म झाला.
५. गुगलला टक्कर देण्याची होती संधी…
आज स्मार्टफोनला जितकं महत्त्व आहे तितकंच, किंबहुना काहीसं अधिक महत्त्व आहे ते अँड्रॉइडचं! प्रत्येकच स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीमध्ये अगदी सर्रास दिसणारी ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे अँड्रॉइड. या अँड्रॉइडवर आणि पर्यायाने अवघ्या स्मार्टफोन विश्वावर सध्या गुगलची हुकूमत आहे.
२००५ साली अँड्रॉइडवर हक्क प्रस्थापित करून गुगलने क्रांती घडवून आणली असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.
अँड्रॉइड हा त्यावेळी एक स्टार्टअप होता आणि त्यांना आर्थिक साहाय्याची  गुंतवणूकदारांची आवश्यकता होती. अर्थात, या यादीत कोरियन कंपनी असणाऱ्या सॅमसंगचा समावेश होता. सॅमसंगने मात्र या गुंतवणुकीला साफ नकार दिला. ही संधी गुगलने मात्र सोडली नाही.
अँड्रॉइड हा आजच्या सर्वाधिक स्मार्टफोनमधील अविभाज्य भाग झालाय. स्मार्टफोन्स बनवण्याच्या बाबतीत सॅमसंग ही जगातील सर्वाधिक मोठी कंपनी आहे.
याच स्मार्टफोन्सचा आत्मा असणारा अँड्रॉइडसुद्धा सॅमसंगच्या मालकीचा असता, तर आज स्मार्टफोन जगतात सॅमसंगची किंमत काय असती, याचा केवळ विचारच केलेला बरा! गुगलला टक्कर देण्याची नामी संधी सॅमसंगकडे होती, पण त्यांनी ती गमावली असं म्हणायला हवं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version