Site icon InMarathi

दृष्टिहीनांसाठी वरदान ठरलेल्या ‘ब्रेल लिपी’च्या जनकाची खडतर कहाणी…

brail final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अनेकदा धडधाकट शरीर असूनही माणसाला छोट्या छोट्या गोष्टींवर रडका सूर लावायची सवय असते. आपल्यात कशाचीच कमतरता नाही ही जमेची बाजू कदाचित अनेक माणसांच्या लक्षातच येत नसावी. त्यामुळे आपल्यातली अशी बरीच धडधाकट, सगळे अवयव व्यवस्थित असलेली माणसं कुठलंही मोठं स्वप्न उराशी न बाळगता एका सरधोपट आयुष्याची निवड करतात.

ज्याच्यात असं एखादं व्यंग असतं तो त्याच्याकडे असलेल्या बाकी अनेक सकारात्मक गोष्टींकडे पाहतो आणि आपल्या व्यंगावर पूर्णतः मात करणं शक्य नसलं तरी उपलब्ध असलेला किंवा जमेल तो तोडगा काढत आपली वाट पुढे चालत राहतो. असं म्हणतात, देवाने माणसाला एखादं व्यंग दिलं असेल तर त्या बरोबरीनेच देवाने त्या माणसाला अश्याही अनेक विशेष क्षमता दिलेल्या असतात ज्यांच्या आधारे तो माणूस आपलं आयुष्य उत्तमरीत्या घडवू शकतो.

 

pakistantoday.com.pk

 

चाचपडत चाचपडत चालणाऱ्या अंध व्यक्तींना बघणं आपल्यासाठी काही नवं नाही. त्यांना हे अंधत्त्व जन्मजात असो अगर जन्मानंतर काही काळाने ते त्यांच्या वाट्याला आलेलं असो, कुठल्याही अंध व्यक्तीला रोजच्या रोज झगडत राहणं चुकत नाही. त्यांना हे सुंदर जग बघता येऊ शकत नाही ही बाब अत्यंत दुर्दैवी असतेच पण बऱ्याचदा या अशा अंध व्यक्तींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्यासारख्या डोळस माणसांपेक्षाही अधिक सकारात्मक असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आपल्याला डोळे आहेत याचा अर्थ आपल्याला ‘दृष्टी’ असतेच असं नाही. हे जग बघता आलं नाही तरी बाकी इंद्रियं आणि मनाच्या शक्तीच्या जोरावर अश्या अंध व्यक्तींना आपल्यापेक्षाही या आयुष्याची, जगण्याच्या अर्थपूर्णतेची अधिक तीव्र अनुभूती येत असावी. पण तरी बाकीच्या डोळस व्यक्तींसाठी उपलब्ध असलेल्या लिपींद्वारे या अंध व्यक्तींना वाचता येणं शक्य नव्हतं.

 

 

स्वतः अंध असलेल्या अश्या एका व्यक्तीनेच यावर एक नामी तोडगा काढला आणि अंधांसाठी ‘ब्रेल लिपी’चा शोध लावला. ‘लुईस ब्रेल’ असं या व्यक्तीचं नाव. हे नाव आपल्या कुणालाही अपरिचित नसेल. पण या ‘ब्रेल लिपी’च्या जन्मामागची कहाणी आणि लुईस ब्रेल यांना त्याच्या आयुष्यात करावा लागलेला संघर्ष फार खडतर होता. कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या ‘लुईस ब्रेल’ यांनी हा शोध लावून समस्त दृष्टीहीनांवर फार मोठी कृपा केली आहे.

४ जानेवारी १८०९ रोजी लुईस ब्रेल यांचा जन्म झाला. ४ जानेवारी २०१९ या वर्षांपासून ‘जागतिक ब्रेल दिन’ साजरा केला जातो. त्यांचं कुटुंब एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं. त्यांची आई गृहिणी होती तर त्यांचे वडील सायमन ब्रेल हे शाही घोड्यांसाठी बनवल्या जाणाऱ्या खोगिराच्या आणि जीन्सच्या कारखान्यात काम करायचे.

 

 

३ वर्षांचे असताना लुईस हे एकदा खेळता खेळता जीन्स बनवण्यासाठी वापरण्यात येणारी चामडी चाकूने कापायचा प्रयत्न करत होते पण अनावधानाने तो चाकू त्यांच्या डोळ्यात गेला आणि वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षीच त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. त्यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत त्यामुळे दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाऊन वयाच्या आठव्या वर्षापर्यंत ते पूर्णतः आंधळे झाले होते.

अंधत्त्व आल्यावरही त्यांच्यात काही ना काही शिकत राहण्याची प्रचंड जिज्ञासा होती. त्यांची ही जिज्ञासा पाहून फ्रेंच धर्मगुरू बॅलांटे यांनी लुईस यांना ‘रॉयल नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड चिल्ड्रेन’ या शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्या शाळेत ‘वेलन्टीन होउ’द्वारे जी लिपी बनवली गेली होती त्या लिपीतून शिक्षण दिलं-घेतलं जायचं. पण अंधांसाठी ही लिपी अपुरी असल्याचे लुईस यांच्या लक्षात आलं. या शाळेत शिकत असताना लुईस यांनी इतिहास, भूगोल आणि गणित या विषयांमध्ये प्राविण्य मिळवलं.

 

 

याच शाळेत एकदा एक फ्रेंच लष्करी अधिकारी कॅप्टन चार्ल्स बार्बर इथल्या अंध मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी आले होते. सैनिकांना अंधारात वाचता यावं यासाठी जी ‘नाईट रायटिंग’ किंवा ‘सोनोग्राफी’ लिपी तयार केली गेली होती त्या लिपीविषयी चार्ल्स बार्बर यांनी इथल्या अंध मुलांना माहिती दिली. ही लिपी ६-६ बिंदूच्या दोन ओळींमध्ये असलेल्या १२ बिंदूवर आधारित होती. पण या लिपीत विराम चिन्हे, संख्या आणि गणिती चिन्हांचा अभाव होता. त्यावेळी लुईस हे केवळ १२ वर्षांचे होते.

‘गरज ही शोधाची जननी आहे’ असं म्हणतात. प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या लुईस यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी १२ बिंदूच्या ऐवजी ६ बिंदू वापरून ‘ब्रेल लिपी’ तयार केली. या लिपीत ६४ अक्षरं असून विरामचिन्हांखेरीज गणिती चिन्हं , संख्या देखील आहेत. इतकंच नाही तर या लिपीद्वारे संगीताच्या नोटेशन्सही लिहिता येऊ शकतात. १८२९ साली आलेली ही लिपी आज ‘ब्रेल लिपी’ म्हणून सर्वत्र मान्य झाली आहे.

‘ब्रेल लिपी’ ही एक भाषा आहे असा गैरसमज बऱ्याचदा लोकांच्या मनात असतो. पण ‘ब्रेल’ ही भाषा नसून ‘कोड लिपी’ आहे. केवळ शालेय विद्यार्थ्यांची पाठयपुस्तकंच या लिपीत उपलब्ध नाहीत तर त्या बरोबरीनेच रामायण, महाभारत आणि दरवर्षी छापलं जाणारं कालनिर्णयही या लिपीत उपलब्ब्ध आहे. आता संगणकातही ‘ब्रेल लिपी’ वापरली जाते. यात गोलाकार आणि वाढलेले बिंदू असतात. अंध व्यक्तींना तांत्रिक कामं करणं यामुळे शक्य होऊ शकलंय.

 

 

ज्या शाळेत लुईस शिकले त्याच शाळेत ते पुढे शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी मुलांना कधीही शिक्षा केली नाही. एक प्रेमळ शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांचे लाडके होते. पण इतक्या खाचखळग्यांमधून जाऊन त्यांनी ही लिपी विकसित केली असली तरी तिला सहजासहजी मान्यता मिळाली नाही. शिक्षणतज्ञांनी ही ‘ब्रेल लिपी’ ओळखली नाही. तिला अधिकृत मान्यताही मिळत नव्हती. पण अंध व्यक्तींमध्ये ही लिपी चांगलीच लोकप्रिय झाली होती. लुईस यांचं इतकं दुर्दैव की त्यांच्या मृत्यूनंतर तब्ब्ल १०० वर्षांनी या लिपीला मान्यता मिळाली.

वयाच्या अवघ्या ४३व्या वर्षी क्षयरोगाच्या आजाराने त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर कुठल्याही वृत्तपत्रात त्यांच्याविषयी साधं एक अक्षरही छापून आलं नव्हतं. मात्र त्यांचा मृत्यू होऊन १०० वर्षे झाल्यानंतर जगभरातल्या वृत्तपत्रांमध्ये त्यांच्यावर लेख छापून आले आणि त्यांच्या घराला संग्रहालयाचा दर्जा दिला गेला.

२० जून १९५२ हा दिवस लुईस ब्रेल यांचा सन्मान दिवस म्हणून निश्चित करण्यात आला. स्थानिक प्रशासन आणि लष्कराने लुईस यांच्या मृत्यूनंतर तब्ब्ल १०० वर्षे त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लुईस यांच्या पार्थिवाच्या अवशेषांची माफी मागितली. त्यांच्या गावात १०० वर्षांपूर्वी पुरलेले हे अवशेष सन्मानाने बाहेर काढण्यात आले आणि राष्ट्रगीतासह ते अवशेष राष्ट्रध्वजात गुंडाळून, त्यावर संस्कार करून लुईस यांना शेवटची श्रद्धांजली दिली गेली.

 

आयुष्यात आपल्यासोबत काय होईल हे आपल्या हातात दरवेळी नसलं तरी त्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं, परिस्थितीला कसं सामोरं जायचं याची निवड करणं नक्कीच आपल्या हातात असतं. जे काही बरंवाईट घडेल त्याला सामोरं जाण्याची जिद्द जर आपल्यात असेल तर आपण केवळ स्वतःलाच नाही तर आपल्यासारख्याच त्रासातून जाणाऱ्या इतर अनेकांना आशेचा किरण दाखवू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच लुईस ब्रेल यांची ही जीवनगाथा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version