Site icon InMarathi

७५ दिवसात रायगड ते हिमालय, तेही पायी चालत; एका तरुणाची प्रेरणादायी गोष्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

असं म्हणतात, की जर एखादी गोष्ट प्रत्यक्षात उतरवायचा तुम्ही ध्यास घेतला असेल तर आधी प्रतिकूल वाटणारी परिस्थितीही अखेरीस हार मानते आणि नशिबाचे फासे तुम्हाला हवे तसे पडतात. तुम्हीच तुमचं नशीब घडवता.

भिवंडीतल्या एका तरुणाने असंच एक स्वप्न उराशी बाळगलं होतं. रायगड ते हिमालय हे अंतर केवळ चालत पार करण्याचं. ते कसं पार करायचं याची योजनाबद्ध आखणीही त्याने केली होती.

हे अंतर नुसतंच पार करायचं एवढंच त्याचं स्वप्न नव्हतं. हा मुलगा पर्यावरणप्रेमीही आहे. चालत चालत जाताना आपल्या मार्गात वृक्षलागवड करत जायची आणि हे अंतर पार करायचं असं स्वप्न त्याने मनाशी बाळगलं होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्याचा हा प्रवास खूप खाचखळग्यांनी भरलेला होता तरीदेखील त्या सगळ्यावर मात करून अखेरीस केवळ ७५ दिवसात त्याने रायगड ते हिमालय हे अंतर चालत पार केलं.

भिवंडीत राहणाऱ्या या तरुणाचं नाव ‘सिद्धार्थ गणाई’ असं आहे. सिद्धार्थचे बालपण इतर लहान मुलांसारखे आरामशीर, सुखाचे नव्हते. या मुलाला लहान वयातच जगाच्या कटू वास्तवाची ओळख झाली. तो लहान असतानाच त्याच्या आईवडीलांचा घटस्फोट झाला.

 

 

सुरुवातीला त्याचे वडील त्याचा सांभाळ करायचे पण त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नव्हती म्हणून त्यांनी त्याचा सांभाळ केला नाही. त्यापुढची एक ते दोन वर्षे त्याने पुलाखाली राहून काढली. पोलिसांच्या हे लक्षात आले तेव्हा पोलिसांनी त्याच्या आईचा शोध घेतला.

त्याची आई तेव्हा केरळ मध्ये होती. केरळ मध्ये त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. पण २०११ साली तो पुन्हा मुंबईत परतला. त्यानंतर त्याची मावशी आणि त्याच्या बाकी नातेवाईकांनी त्याला सांभाळलं.

सध्या सिद्धार्थ भिवंडीतील बापगाव येथील मैत्रीकुल येथे राहतो. विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या ‘विद्यार्थी भारती’ संघटनेचा तो सदस्य आहे.

 

 

हे करत असतानाच काही वर्षांपूर्वी त्याला माउंट एव्हरेस्टचे शिखर सर करण्याची प्रेरणा मिळाली. पण त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ त्याच्यापाशी नव्हते.

त्याने मोटारसायकल, सायकल, स्केटिंग अशा वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला पण त्यासाठीही त्याच्यापाशी पुरेसे पैसे नव्हते. असं सगळं असूनही एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा त्याचा निर्धार जराही ढळला नाही.

रायगड ते हिमालय हे अंतर पार करताना सिद्धार्थ रोज जवळपास ३५ ते ४० किलोमीटर पायी चालायचा. अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयाचा तो विद्यार्थी. हे करत असतानाच त्याने त्याची टीवायबीएससीची परीक्षाही दिली. तो रोज किमान तासभर अभ्यास करायचा.

सिद्धार्थ हा पर्यावरणप्रेमी आहे. तो जिथे राहतो त्याच्या आसपास पर्यावरणाशी संबंधित जे उप्रकम होतात त्यात त्याचा सक्रिय सहभाग असतो.

हा प्रवास सुरू करताना त्याने त्याच्यासोबत बिया आणल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी तो थांबत थांबत हे एकेक बीज पेरत होता. ‘एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं’ असा संदेश देत होता.

 

सिद्धार्थ असं सांगतो, की “या झाडं लावण्याच्या कल्पनेमुळे माझी वेगवेगळ्या समाजसेवकांशी, वेगवगेळ्या प्रांतातल्या हॉस्टेल्सच्या आणि शाळकरी विद्यार्थ्यांशी भेट झाली आणि माझ्यासोबत मी ज्या बिया घेऊन आलो होतो त्या पेरून मी झाडं लावली.” सिद्धार्थ पर्यावरणप्रेमी असल्याने पर्यावरणाचं नुकसान होईल, प्रदूषण होईल अश्या कुठल्याही प्रकारे त्याला आपला प्रवास करायचा नव्हता.

शिवाय या प्रवासासाठी लागणारे पुरेसे पैसेही त्याच्याकडे नव्हते. त्यामुळे त्याने पायी चाल चालत हा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात आपली प्रकृती बिघडू नये म्हणून आपल्याला केवळ घरचे अन्न आणि पाणी मिळावे असे त्याने लोकांना आवाहन केले होते.

भुसावळला जेव्हा तो पोहोचला तेव्हा तिथल्या पर्यावरणप्रेमींनी त्याचे खूप स्वागत केले. गांधी पुतळ्याजवळ त्याचं स्वागत केलं गेलं आणि पर्यावरणप्रेमींच्या उपस्थितीत झाडंही लावली गेली.

सिद्धार्थ म्हणतो, ” हा माझ्यासाठी अतिशय सुंदर अनुभव होता. ८० दिवसांत हा प्रवास पूर्ण करायचा अशी माझी योजना होती पण मी हा प्रवास केवळ ७५ दिवसांमध्येच पूर्ण करू शकलो. एव्हरेस्ट शिखर चढायचं स्वप्न मी नेहमीच उराशी बाळगून होतो पण त्याकरता लागणारे पुरेसे पैसे माझ्यापाशी नव्हते त्यामुळे हा प्रवास करत असताना दिवसभरात मी केवळ एक वेळचंच जेवण जेवायचो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि नेपाळमधल्या खूप लोकांनी मला या प्रवासात मदत केली आणि ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’ पर्यंत पोहोचायला मार्गदर्शन केले.”

 

 

अन्नपूर्णा बेस कॅम्पपाशी पोहोचून त्याने आपली ‘एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं’ही मोहीम पुरी केली. ३१ डिसेंबरला संध्याकाळी तो त्याच्या हॉस्टेलमध्ये परतला.

सिद्धार्थच्या या कामगिरीमुळे केवळ महाराष्ट्रातल्याच नाही तर वेगवेगळ्या राज्यातल्या आणि नेपाळमधल्या लोकांनीही त्याचं भरभरून कौतुक केलं. जग फिरायचंय असं सिद्धार्थचं स्वप्न आहे. त्यामुळे आता कुठे आपली सुरुवात झालीये. अजून खूप स्वप्नं सत्यात उतरवायची आहेत असं सिद्धार्थला वाटतं.

सिद्धार्थसारखी उदाहरणं आपल्याला आयुष्याच्या सुंदर बाजूकडे बघायला शिकवतात. आपली मनापासून इच्छा असेल तर या जगात अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकतो असा विश्वास आपल्याला देतात.

आयुष्य कितीही खडतर असलं तरी प्रयत्नांच्या जोरावर आपण आपली स्वप्न सत्यात उतरवू शकतो हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून आपल्याला प्रेरित करतात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version