' भारतातलंही एक शहर होणार ‘स्पंज सिटी’, म्हणजे नेमकं काय? – InMarathi

भारतातलंही एक शहर होणार ‘स्पंज सिटी’, म्हणजे नेमकं काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणूस बुद्धिवादी आहे. माणसाच्या बुद्धीतून असंख्य कल्पना आल्या आणि त्याने त्या प्रत्यक्षात उतरवल्या. अशक्य वाटतील अशा अनेक गोष्टी त्याने मानवजातीसाठीच विकसित केल्या खऱ्या पण हे करत असताना आपण फायद्याबरोबरीने आपलं नुकसानही करून घेतोय का याचं आत्मपरीक्षण करायला तो विसरला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘विसरला’ पेक्षाही खरंतर ते करायचं राहीलंच कारण सतत पुढे पळत राहणाऱ्या त्याच्याकडे आत्मपरीक्षणासाठी वेळच उरला नाही. विकास करण्याच्या नादात तो कधी निसर्गाच्या विरोधात गेला हे त्याचं त्यालाही लक्षात आलं नाही. आता ते लक्षात येऊ लागलंय तेव्हा त्याची धावणारी बुद्धी थोडा वेगळ्या प्रकारे विचार करू लागलीये.

बुद्धीपेक्षा निसर्गच श्रेष्ठ आहे ते त्याला नव्याने उमगलंय आणि आता हवेत उडणारी त्याची पावलं पुन्हा जमिनीला टेकली आहेत. निसर्गाच्या बरोबरीने चाललो तरच आपण या सृष्टीत तग धरून राहू हे आता आपल्या लक्षात आलंय. त्यामुळे माणूस आता ज्या योजना आखतोय तेही त्या निसर्गाच्या हातात हात घालून जाणाऱ्या आहेत असं बघूनच.

चीनमधला एक अतिशय हुशार प्राध्यापक ‘यु काँगजियान’ याला एक हटके कल्पना सुचली. शहराला ‘स्पंज सिटी’ करण्याची. “पुराला घाबरण्यापेक्षा जर आपण ती पूरपरिस्थिती स्वीकारून त्याच्यावर दीर्घकाळ उपयोगी पडेल असा तोडगा काढला तर?” असा या ‘स्पंज सिटी’ च्या संकल्पनेमागचा त्याचा मूलभूत विचार होता.

काय आहे ही ‘स्पंज सिटी’ची संकल्पना?

 

sponge city inmarathi1

 

‘स्पंज’ या संकल्पनेवरूनच ‘स्पंज सिटी’ची संकल्पना आलेली आहे. ज्याप्रमाणे स्पंज पाणी शोषून घेतो त्याचप्रमाणे अतिवृष्टीचे, पुराचे पाणी जमिनीत शोषून घेतले जावे, त्याची साठवणूक व्हावी आणि त्या पाण्याचा पुनर्वापर करता यावा हा ‘स्पंज सिटी’ निर्माण करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

एरवी ज्या प्रकारे पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन केले जाते त्यात पाईप्स आणि नाले तयार करून शक्य तितक्या लवकर पाणी वाहून जाईल अशी सोय केली जाते किंवा काँक्रीटच्या साहाय्याने नद्यांचे किनारे अधिक बळकट करून पाणी जास्त वाहून जाणार नाही असं बघितलं जातं, पण ‘स्पंज सिटी’त याच्या नेमकं उलटं केलं जातं.

पावसाचं अतिरिक्त पाणी आणि पुराचं पाणी यात जमिनीत शोषून घेतलं घेतलं जातं. कुठल्याही प्रकारे सिमेंट काँक्रीटचा वापर न करता नैसर्गिक मार्गाने.

या संकल्पनेचं माहेरघर ‘चीन’

चीनमधले प्राध्यापक ‘यु कॉंगजियान’ यांची ही संकल्पना आहे. त्यांच्या मतानुसार, चीनमधली जी किनारपट्टीवरची शहरं आहेत आणि ज्या बाकी देशांमध्ये अशाच प्रकारचं हवामान असलेली शहरं आहेत त्या शहरांनी शहरांच्या एकूणच बांधकामाचं फार काळ टिकून राहू शकणार नाही असं मॉडेल स्वीकारलं आहे.

पाश्चिमात्य देशांच्या अंधानुकरणातून जे तंत्र विकसित झालं आहे ते आपल्यासारख्या युरोपियन राष्ट्रांसाठी उपयोगाचं नाही. खासकरून पावसाळ्यात तर नाहीच नाही. सुरुवातीला त्याच्या या म्हणण्याला खूप विरोध झाला पण अखेरीस २०१४ साली ‘चिनी कम्युनिस्ट पार्टी’ आणि ‘राज्य परिषदे’ने ही संकल्पना ‘अर्बानिझम पॉलिसी’ म्हणून मान्य केली.

चेन्नईत होणार आता ‘स्पंज सिटी’ची निर्मिती

 

sponge city inmarathi

 

‘चेन्नई मेट्रोपॉलिटीयन डेव्हलपमेन्ट ऍथॉरिटी’ने ‘स्पंज पार्क्स’ आणि अशा पाणथळ जागांची निर्मिती करण्याचे ठरवले आहे की ज्या पुराचे, अतिवृष्टीचे पाणी आत शोषून घेतील.

मोठमोठ्या शहरांमध्ये अतिवृष्टीमुळे साचलेल्या या पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल अशी सोयच नसते. त्यामुळे चक्क रस्त्यांच्याच नद्या झालेल्या असतात आणि लोक बोटींमधून प्रवास करू लागतात. नियोजनात फारच काहीतरी चुकतंय हे यातून लक्षात येतं.

शहरं विकसित करण्याच्या नादात आपण निसर्गाच्या पूर्णतः विरोधात गेलोय. निसर्गाच्या विरोधात गेलं की निसर्ग कोपणार आणि नैसर्गिक संकटं येणार हे निश्चित. आपण सिमेंटपासून जी घरं, इमारतींची बांधणी, सगळीच बांधकामं करतोय, शहरांना ज्या प्रकारे आपण काँक्रीटचं जंगल करून टाकलंय त्यामुळे पावसाचं पडणारं सगळं पाणी फुकट जातं. ते साठवून ठेवता येत नाही. कारण, ते पाणी साठवून ठेवण्यात ही मोठमोठाली बांधकामं भलामोठा अडथळा निर्माण करतात.

बरीचशी शहर ही पाणथळ भागांवर, जिथे डबकी, नाले, छोटे तलाव असतात त्यांच्यावर उभारली जातात. अशाप्रकारे शहरं उभारली गेल्यामुळे वरून पडणारं पाणी कुठे जाणार असा प्रश्न निर्माण होतो. जमिनी ते शोषून घेऊ शकत नाहीत.

जर शहरांमधली ही पुराची आणि कमी होत चाललेल्या पाण्याच्या साठ्यांची समस्या सोडवायची असेल तर निसर्गाची जशी नैसर्गिक रचना आहे त्याला अनुसरूनच योजनांची आखणी आणि अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळेच ‘स्पंज सिटीज्’ तयार व्हायला हव्या आहेत.

‘स्पंज सिटी’ कशी तयार करायची?

 

sponge city inmarathi2

 

‘जल संसाधन विभाग’ सध्या ‘रिचार्ज शाफ्ट्स’ ची निर्मिती करण्याच्या विचारात आहे. जमिनीवरच्या काही भागांवर साधारण ८० ते ९० फूट खोलवर हे ‘रिचार्ज शाफ्ट्स’ खणले जातील. स्पंजवर जशी छिद्रं असतात त्यासदृश्य ही छोट्या छोट्या डबक्यांच्या स्वरूपातली ‘रिचार्ज शाफ्ट्स’ असतील.

‘रिचार्ज शाफ्ट्स’ वरून दगडमाती टाकून बंद केली जातील. पावसाचं अतिरिक्त पाणी या ‘रिचार्ज शाफ्ट्स’द्वारे शोषलं जाईल. पुराची समस्या उद्भवणं यामुळे टळू शकेल.

विभागाच्या योजनेनुसार जी छोटी तळी, तलाव, नाले, मंदिराआसपासच्या ज्या विहिरी, जलाशयं आहेत त्याचा संरचनात्मक पदधतीने उपयोग करून अतिवृष्टीमुळे साचणारं अतिरिक्त पाणी साठवून ठेवता येईल. हे साठवून ठेवलेलं पाणी गरजेनुसार काढून शहरातल्या ज्या ज्या भागांमध्ये पाण्याची गरज आहे तिथे आवश्यक्तेनुसार पाठवलं जाईल.

फायदे

यामुळे शहरात येणाऱ्या पुराचं प्रमाण कमी होईल. जलसाठ्यांची जी कमतरता निर्माण झाली आहे ती कमी होईल. भूजल पातळी त्यामुळे वाढेल. ते पाणीही रिचार्ज होईल. अशाप्रकारे पाण्याची साठवणूक केल्यामुळे आणि ते जमिनीत शोषलं गेल्यामुळे आपलं पर्यावरण सुधारायला नक्कीच मदत होईल आणि आपल्याकडे जी जैवविविधता आहे तीदेखील अधिक चांगल्या प्रकारे विकसित होईल.

पावसाचं जे पाणी साठवून ठेवलेलं आहे त्याचा सिंचनासाठी आणि घरगुती उपयोगासाठी पुनर्वापर करता येईल. ‘स्पंज सिटी’ची जी धोरणं आहेत ती निसर्गाच्या हातात हात घेऊन जाणारी आहेत ज्याद्वारे आपण पावसाचं पाणी साठवून त्याचं शुद्धीकरण करू शकतो.

 

rainy season precaution inmarathi2

हवामानासंबंधीच्या, विशेषतः पावसाळ्यातल्या समस्यांशी दोन हात करता यावेत म्हणून जे ज्ञान प्राचीन काळी दिलं गेलं होतं त्या ज्ञानाच्या आधारावर ही संकल्पना बेतलेली आहे.

केवळ सामान्य माणसालाच नाही तर संशोधक, अभ्यासकांनादेखील नवे शोध लावायला, नव्या संकल्पना विकसित करायला आता निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जावं लागेल.

निसर्ग कसा त्याचं स्वतःचं व्यवस्थापन करतोय त्याचं बारकाईने निरीक्षण करावं लागले. बुध्दीमनाला आता निसर्गाचा कायमस्वरूपी लगाम असेल. उधळलेल्या स्वैर घोड्यासारखं पुढे जाणं आता मानवणार नाही. ‘स्पंज सिटी’ची ही संकल्पना नक्कीच या सगळ्या निकषांना धरून आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?