' राजेश खन्नाच्या शेवटच्या दिवसांमधील हा प्रसंग म्हणजे प्रसिद्धीमागे असणाऱ्या दुःखाची साक्ष – InMarathi

राजेश खन्नाच्या शेवटच्या दिवसांमधील हा प्रसंग म्हणजे प्रसिद्धीमागे असणाऱ्या दुःखाची साक्ष

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बॉलिवूडच्या तारकांच्या केवळ स्क्रीनवरच्या दिसण्याविषयीच नाही तर त्यांच्या पडद्यामागच्या खऱ्याखुऱ्या आयुष्याविषयी जाणून घेण्यातही आपल्यासारख्या सामान्य माणसांना रस असतो. अभिनयाने, दिसण्याने आपल्यावर छाप पाडणारे हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घडामोडींसाठीही चांगलेच चर्चेत राहतात.

अगदी पूर्वीपासून ते आजतागायत सेलिब्रिटीजच्या प्रेम प्रकारणांविषयी वाचणं, ऐकणं आपल्यासाठी नवं नाही. लग्न होण्यापूर्वी बऱ्याच सिनेकलाकारांची नावं ज्या व्यक्तीशी लग्न झालंय त्या व्यक्तीखेरीज इतर दोन-तीन कलाकारांसोबत हमखास जोडली गेलेली असतात.

प्रत्येक नात्याचं लग्नात रूपांतर होतंच असं नाही. म्हणूनच “आता हे अमुक अमुक दोघे लग्न” करतील असं वाटतं न् वाटतं तोच ते दोघे एकमेकांपासून फारकत घेतात. जुन्या काळासाठीही हे चित्र यापेक्षा काही वेगळं नव्हतं.

बॉलिवूडचे पहिलेवहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते राजेश खन्ना हे जसे त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वासाठी, उत्तमोत्तम चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते तसेच ते त्यांच्या अफेअर्ससाठीही त्याकाळी चर्चेत असायचे.

राजेश खन्नाच्या नुसत्या एका दर्शनासाठी लोकांची गर्दी व्हायची. त्याच्या भरघाव वेगवान जाणाऱ्या गाडीची धूळही मुली कुंकू म्हणून लावायच्या इतक्या त्या त्याच्यावर फिदा होत्या. त्यामुळे राजेश खन्नाचं लग्न होण्यापूर्वी अभिनेत्रींबरोबर त्याचं नाव जोडलं जाणं आणि लग्नानंतरही त्याचं अफेअर असणं यात तसं काही नवल वाटण्याजोगं नाही.

 

rajesh khanna inmarathi

 

डिंपल कपाडियाबरोबर लग्न झाल्यानंतरही हा अभिनेता ‘टिना मुनीम’ या अभिनेत्रींसोबत म्हणजे आताच्या ‘टिना अंबानीं’सोबत त्यावेळी खुलेआम ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ मध्ये राहत असे.

६०-७० च्या दशकापासून राजेश खन्नांचा चाहतावर्ग प्रचंड वाढू लागला आणि ७०-८० च्या दशकांमधले ते सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. त्यांच्या सिनेकारकिर्दीत त्यांनी ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘कटी पतंग’, ‘आनंद’, ‘सच्चा झूटा’, ‘दो रास्ते’, ‘हाथी मेरे साथी’ अशा अनेकानेक गाजलेल्या चित्रपटांमधून रसिकांचं मन रिझवलं.

 

Rajesh-Khanna-inmarathi

 

दरम्यान ऋषी कपूरशी डिम्पल कपाडियाचं ब्रेक अप झाल्यानंतर त्यांनी डिम्पल कपाडियाला लग्नासाठी मागणी घातली आणि त्यांचं लग्न झालं. कालांतराने, राजेश खन्ना यांच्या यशाला उतरती कळा लागली. त्यांचे चित्रपट चालेनासे झाले आणि दारूच्या नशेत त्यांनी स्वतःला बुडवून घेतलं.

डिम्पल कपाडिया यांनी मात्र या सगळ्या दिवसांमध्येही त्यांना अतिशय खंबीर साथ दिली, पण राजेश खन्नाचं डिम्पल कपाडियांवरचं प्रेम हळूहळू ओसरत चाललेलं.

”सौतन’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजेश खन्ना ‘टिना मुनीम’ मध्ये गुंतले. ते दोघे एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये आले. या जोडीने ‘सौतन’ खेरीज ‘सुराग’, ‘अलग-अलग’, ‘बेवफाई’, ‘आखिर क्यों’, ‘फिफ्टी फिफ्टी’, ‘अधिकार’ यासारखे अनेक गाजलेले चित्रपट दिले.

 

rajesh khanna inmarathi 1

 

टिना मुनीमने त्यांचं हे नातं फार गांभीर्याने घेतलं होतं, पण तिने अनेकदा सांगूनही राजेश खन्ना डिम्पल कपाडियाला घटस्फोट द्यायला तयार नव्हते. मुलींकडे बघून ते तिला घटस्फोट देत नव्हते.

राजेश खन्ना आणि टिना मुनीम दोघेही त्यावेळी उघउघडपणे ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होते. डिम्पल कपाडियाला जेव्हा त्या दोघांच्या अफेअरविषयी कळलं तेव्हा कुणालाही काही न सांगता तिने त्यांचं मुंबईतलं राहतं घर सोडलं.

डिम्पल कपाडियाबरोबरच्या संसारात राजेश खन्ना आनंदी नव्हते, पण टिना मुनीम बरोबरच्या रिलेशनशीपमध्येही ते समाधानी नव्हते. अनेकदा सांगूनही राजेश खन्ना घटस्फोट घेत नव्हते म्हणून शेवटी कंटाळून रागाने टिना मुनीमने त्यांच्याशी ब्रेकअप केलं.

ते टिना मुनीममध्ये फारच गुंतले होते. तिने आपल्याला सोडून जाऊ नये असं त्यांना वाटत होतं म्हणून त्यांनी तिची मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण असा दोन्ही दगडांवर पाय असलेल्या आणि धड कुठलाच ठाम निर्णय घेऊ न शकणाऱ्या राजेश खन्नावर आता आपला अजिबातच विश्वास राहिला नसल्याचे तिने त्यांना सांगितले.

त्यानंतर नाईलाजाने ते डिम्पल कपाडियाकडे परतले. डिम्पल कपाडिया आणि राजेश खन्नाने कधी कायद्याने घटस्फोट घेतला नाही, पण या सगळ्यानंतर ते फार वर्षं एकमेकांबरोबर एकत्रही राहिले नाहीत. तरीदेखील डिम्पल कपाडियाने शेवटपर्यंत त्यांची साथ सोडली नाही.

 

rajesh khanna inmarathi 2

 

इतकंच नाही तर राजेश खन्ना यांच्या वाईट काळात डिम्पल आणि राजेश खन्नांची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंजू महेंद्रू एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या. राजेश खन्ना यांनी मात्र एका मुलाखतीत म्हटलं होतं की, “डिम्पल कपाडियाबरोबरच माझं नातं हा माझा नाईलाज होता, पण टिना माझ्या जखमांवरचं खरं मलम होती.”

आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक वर्षे राजेश खन्नांसोबत लिव्ह इन मध्ये राहूनदेखील त्यांच्या शेवटच्या दिवसांत टिना मुनीम म्हणजेच आताची टिना अंबानी त्यांना भेटायला गेली नव्हती.

पडद्यावर प्रेम आणि कारुण्य दाखवलेल्या राजेश खन्नाला एवढं प्रचंड स्टारडम मिळूनसुद्धा आतून हा अभिनेता समाधानी नव्हता. सगळं काही मिळूनही त्याच्या आत एक पोकळी उरलीच होती. वलय आणि वास्तव यात केवढी मोठी दरी असू शकते! आपल्यासारख्या सामान्य माणसांना हे समजणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?