आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
भारतात शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचार आणि घोटाळे काही नवीन नाहीत. गेली अनेक वर्षे या क्षेत्रात भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची बजबजपुरी माजली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी देशाचे भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य ह्या अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी पणाला लावले आहे.
यांच्या याच काळ्या कृत्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत गेलेत. अनेकांनी पुढे नुसता अंधार दिसल्यामुळे आत्महत्येचा मार्ग देखील निवडला, पण ह्या स्वार्थी आणि घाणेरड्या वृत्तीच्या अधिकाऱ्यांना मात्र त्यामुळे काहीही फरक पडत नाही. भस्म्या रोग झाल्यासारखे ते पैसे खात सुटलेत.
नुकतेच उघडकीला आलेलं प्रकरण म्हणजे तुकाराम सुपे ह्यांची अटक! महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे ह्यांच्याकडून पुणे पोलिसांनी ३ कोटी ८८ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक पात्रता परीक्षेत म्हणजे टीईटी परीक्षेत हेराफेरी केल्याप्रकरणी तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या भीतीने तुकाराम सुपेंनी हा काळा पैसा त्यांच्या नातेवाईक व मित्रांच्या घरी लपवून ठेवला होता. तुकाराम सुपे ह्यांच्यावर २०१८ व २०१९ साली झालेल्या टीईटी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तुकाराम सुपे यांच्यासह सुखदेव डेरे यांनाही अटक करण्यात आली आहे. सुखदेव डेरे हे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे आयुक्त होते.
महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणात चौकशी करताना पुणे पोलिसांना म्हाडाच्या पेपरफुटीची माहिती मिळाली आणि म्हाडाच्या पेपरफुटीप्रकरणी चौकशी सुरू असताना शैक्षणिक पात्रता परीक्षेतील घोळ पोलिसांनी शोधून काढला. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर पुणे पोलिसांनी तुकाराम सुपे ह्यांना अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर ह्यांनी टीईटी परीक्षेत तब्बल ८०० उमेदवारांकडून त्यांना परीक्षेत मिळालेले गुण वाढवण्यासाठी त्यांच्याकडून ४ कोटी २० लाख रुपये इतकी रक्कम उकळली आहे.
विशेष म्हणजे आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचार करण्याची तुकाराम सुपेंची ही पहिलीच वेळ नव्हे. ह्यापूर्वी देखील त्यांनी आर्थिक व्यवहारांमध्ये अफरातफर केली आहे.
२०१४ साली पुणे महानगरपालिकेच्या शाळांना एक अजब हुकूम मिळाला होता की अमुक एकाच दुकानातून झाडे लावण्यासाठी कुंडी विकत घ्यायची आणि ह्या कुंडीची किंमत होती ११०० रुपये! इतर ठिकाणी जास्तीत जास्त शंभर रुपयांना झाडाची कुंडी मिळत असताना तब्बल दहा-अकरा पट किंमत असलेली कुंडी विकत घेण्याचे आदेश देणारे शिक्षण अधिकारी हे तुकाराम सुपेच होते.
तुकाराम सुपेंवर हे आर्थिक व परीक्षा गैरव्यवहाराचे आरोप झाले तेव्हा ते महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्तांच्या पदावर होते. त्याच्या अटकेनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ह्यांनी त्यांना निलंबित केले आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त जॉईंट डायरेक्टरचे समकक्ष अधिकारी असतात आणि त्यांना जॉईंट डायरेक्टरची ग्रेड व सवलती मिळतात.
तुकाराम सुपे हे एमपीएससीच्या सरळ सेवा भरतीत परीक्षा देऊन शिक्षण अधिकारी झाले होते. सेवाज्येष्ठतेच्या निकषावर पदोन्नती मिळून त्यांना आधी डेप्युटी डायरेक्टर आणि मग जॉईंट डायरेक्टरची ग्रेड मिळाली. या दरम्यान त्यांनी विविध पदे सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नाशिक व पुणे ह्या दोन शहरांत काम केले. त्यांची नाशिकमधील कारकीर्द वादग्रस्त होती.
२०१३ साली सुपे यांनी नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांना मान्यता दिली होती. या प्रकरणात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल झाला होता. तसेच नाशिकमध्ये काम करत असताना सुपे संस्थाचालकांचीच बाजू उचलून घेत असत असाही आरोप त्यांच्यावर झाला होता.
सुपे शाळांना मान्यता देताना भ्रष्टाचार करत असत असा आरोप त्यांच्यावर केला गेला. त्यांचे व संस्थाचालकांचे फारच जिव्हाळ्याचे संबंध होते. या कारणामुळे सुपे ह्यांचे नाव कायम चर्चेत राहत असे. ह्याच कारणामुळे त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली झाली होती.
—
- बिग बॉस स्कॅम: जेंव्हा टिव्ही ‘शो’च्या नावाखाली ९ महिला सापळ्यात अडकल्या होत्या
- एलआयसीला ‘चुना’ लावणारा, हर्षद मेहताच्याही आधीचा ‘बिगबूल’
—
त्यांच्या व संस्थाचालकांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांविषयी एक किस्सा सांगितला जातो. २०१३ साली एका शाळेने काही मुलांना फी न भरल्याच्या कारणारून शाळेतून काढून टाकले होते. जेव्हा ह्या प्रकरणाची दाद मागायला शिक्षण अधिकारी संस्थाचालकांकडे गेले तेव्हा संस्थाचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवले होते.
या प्रकारामुळे व्यथित होऊन शिक्षण अधिकारी सुपेंना भेटले. सुपे तेव्हा शिक्षण विभागाचे उपसंचालक होते. सुपेंनी शिक्षण अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले परंतु संस्थाचालकांवर काहीही कारवाई केली नाही. या प्रकरणाचा अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा काहीच कारवाई न झाल्याने ते अधिकारी पुढे इतर मोठ्या अधिकाऱ्यांना भेटले आणि मग सुपेंची नाशिकहून पुण्याला बदली करण्यात आली होती.
२०१४ साली सुपे पुणे महानगर पालिकेच्या शिक्षक मंडळाचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले होते. त्यांच्याकडे तेव्हा अनेक अधिकार होते. या अधिकारांचा त्यांनी अनेकदा दुरुपयोग केल्याचे सांगितले जाते.
१ जानेवारी २०१८ रोजी त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आणि २०१८ च्या टीईटी परीक्षेतही घोटाळा झाला होता. हे असे भ्रष्ट अधिकारी शिक्षण क्षेत्रात असतील तर विद्यार्थ्यांचे भविष्य व जीव टांगणीला लागणार नाही तर काय!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.