Site icon InMarathi

मी त्याला ओळखतही नव्हते, तेव्हा ज्योतिषाने सांगितलं, “तुझं लग्न अक्षय कुमारशी होईल”

akshay twinkle inmarathi6

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणूस म्हटलं की त्याच्या नाना इच्छाआकांक्षा, स्वप्नं आलीच. मग त्या इच्छांचे, स्वप्नांचे स्वरूप छोटे असेना का मोठे. प्रत्येक माणसानुसार त्याच्या इच्छाआकांक्षा, त्याची स्वप्नं बदलतात, पण तीच स्वप्नं, त्याच इच्छा मनाशी बाळगून चालत राहणं आवश्यक असतं.

आपलं आयुष्य कितीही आपल्या नियंत्रणात आहे असं म्हटलं तरी असे अनेक चांगले-वाईट योग आयुष्यात येतात जे आपलं आपल्या आयुष्यावर पूर्णतः नियंत्रण नाही, कितीही नाकारायचं म्हटलं तरी काही अंशी तरी आपण नियतीच्या खेळातली प्यादी आहोत हे सत्य आपल्याला मान्यच करायला लावतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पुढे काय वाढून ठेवलंय हे माहीत नसलं तरी आपल्यातल्या अनेकांना ते जाणून घ्यायचं औत्सुक्य स्वस्थ बसू देत नाही. आपण अशा वेळी ज्योतिषाकडे जातो. आपल्या कुंडलीवरून, हाताकडे, चेहऱ्याकडे बघून ज्योतिषी भाकीतं वर्तवतात. या ज्योतिषाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न, पण आपल्या विश्वास ठेवण्या-न ठेवण्याने आपल्या आयुष्यात पुढे जे व्हायचं असतं ते व्हायचं थांबत नाही.

हे केवळ आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांपुरतंच मर्यादित नाही तर सिनेसृष्टीतली मंडळीही याला अपवाद नाहीत. लेखिका ट्विंकल खन्ना हिचे वडील असलेल्या दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना त्यांच्या ज्योतिषाने असं सांगितलं होतं, की ट्विंकल खन्नाचं लग्न अक्षय कुमारशी होईल.

 

 

ही गोष्ट राजेश खन्ना यांनी जेव्हा ट्विंकल खन्ना ला सांगितली तेव्हा हे ऐकून ती चक्रावून गेली. “आपण तर अक्षय कुमारला ओळखतही नाही.”, अशी तिची या सगळ्यावरती प्रतिक्रिया होती. खरा गंमतीचा भाग हा की त्या ज्योतिषाने वर्तवलेली ही भविष्यवाणी पुढे खरंच खरी झाली. ट्विंकल खन्नाचं खरोखरच अक्षय कुमार बरोबर लग्न झालं.

ट्विंकल खन्ना ही दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिम्पल कपाडिया या दाम्पत्याची लेक. ‘ट्विक इंडिया’ या तिच्या युट्युब चॅनेलवर जॅकी श्रॉफ यांची मुलखात घेताना तिने हा किस्सा सांगितला.

आपल्याकडे काही लोकांना ज्योतिषशास्त्र कसं हास्यास्पद वाटतं याविषयी ते बोलले. “आपला ज्योतिषावर विश्वास नाही.”, असं ट्विंकल खन्ना त्यावेळी म्हणाली. पण आपले वडील म्हणजेच दिवंगत अभिनेते राजेश खन्ना हे पूर्वी ज्योतिषाचा सल्ला घेत असत असं तिने सांगितलं.

“मी माझ्या नवऱ्याला भेटण्यापूर्वी त्या ज्योतिषाने माझ्या वडिलांना सांगितलं, की माझं ‘अक्षय कुमार’शी लग्न होईल आणि त्यांनी ते येऊन मला सांगितलं. त्यावर विश्वास न बसल्यामुळे मी त्यांना विचारलं “कोण?” तर त्यांनी मला ‘अक्षय कुमार’ असं पूर्ण नाव परत सांगितलं. “कोण? मी तर याला ओळखतही नाही.”, अशी माझी यावरची प्रतिक्रिया होती.”, असं ट्विंकल खन्ना म्हणाली.

 

 

पूर्वी अभिनेत्री असलेली आणि आता लेखिका असलेली ट्विंकल पुढे म्हणाली, “आणि नंतर माझं खरंच अक्षय कुमार बरोबर लग्न झालं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी बाबा पुन्हा त्या ज्योतिषाला कॉफी प्यायला घेऊन आले होते. मी सहसा असं कुणाला विचारत नाही, पण त्या ज्योतिषाला मी विचारलं की “माझ्या व्यवसायाचं काय होईल?” तर त्यावर त्या ज्योतिषाने “तू लेखिका बनशील.”, असं भाकीत वर्तवलं.

मी २० वर्षांत काहीही लिहिलं नव्हतं. मी त्यांना म्हणाले, “माझ्या सजावटीच्या उद्योगाचं काय होईल ते सांगा. हे ‘लेखिका बनेन’ वगैरे काहीही काय सांगताय तुम्ही?” आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांचं हेही भाकीत खरं झालं.”

असं सगळं असूनही भविष्य जाणून घेण्यात काही अर्थ नसतो असं ट्विंकल खन्नाचं मत आहे आणि जॅकी श्रॉफने तिच्या या मताला दुजोरा दिला. जॅकी श्रॉफचे वडील स्वतः ज्योतिषी होते आणि त्यांनी वर्तवलेली बरीच भाकीत खरी झालेली आहेत.

त्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ ट्विंकल खन्नाला असं म्हणाले की त्यांनी आपल्या वडिलांना स्वतःहून कधी स्वतःच्या भविष्याबद्दल विचारलं नाही, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना अनेक गोष्टी सांगितल्या. जॅकी श्रॉफ अभिनेते होतील हे भाकीतही त्यांच्या वडिलांनी आधीच वर्तवलं होतं.

 

 

 

इतकंच नाही तर ज्या दिवशी जॅकी श्रॉफ यांच्या भावाचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यादिवशीसुद्धा त्यांच्या वडिलांनी जॅकी श्रॉफ यांच्या भावाला “घराबाहेर पडू नकोस.”, असा धोक्याचा इशारा दिला होता.

ट्विंकल खन्नाशी लग्न होण्यापूर्वी अक्षय कुमारचं नाव रवीना टंडन, शिल्पा शेट्टी या अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं. अक्षय कुमार हा आपल्याकडच्या सुपरस्टार्सपैकी एक समजला जातो. आजही तो अतिशय लोकप्रिय आहे आणि बॉक्स ऑफिसवर त्याचे चित्रपट दणक्यात चालतात.

ट्विंकल खन्ना मात्र अभिनय क्षेत्रात आल्यावर आपल्या अभिनयाची चमक दाखवू शकली नाही. ती लेखिका असून आजवर तिची ‘ मिसेस फनीबोन्स’, ‘द लेजेंड्स ऑफ लक्ष्मी प्रसाद’ आणि ‘पैजामाज आर फर्गिविंग’ ही तीन पुस्तकं छापली गेली आहेत. शिवाय ती स्तंभलेखनही करते. आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्ट्समधूनदेखील ती व्यक्त होत असते.

 

 

सगळ्या ज्योतिषांचं भविष्य खरं होत असेलच असं नाही. पण कुणालातरी आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे कळणं आणि त्याप्रमाणे तसं घडणं हा अनुभव नक्कीच ज्योतिषावर विश्वास नसलेल्या एखाद्यालाही त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडू शकतो. विधिलिखित कुणालाही चुकत नाही म्हणतात. खुद्द ट्विंकल खन्ना तरी त्याला अपवाद कशी ठरणार!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version