Site icon InMarathi

जेव्हा खुद्द गांधीजीनीसुद्धा राष्ट्रगीतासाठी उभं राहण्यास नकार दिला…

gandhiji featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत म्हणजे देशाची शान, देशाचा अभिमान असं मानलं जातं. त्यात चुकीचंसुद्धा काहीच नाही. त्यामुळेच राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा मान राखण्याचा प्रयत्न आपण नेहमीच करत असतो. जानेवारीत साजरा होणारा प्रजासत्ताक दिन आणि ऑगस्टमध्ये साजरा होणारा स्वातंत्र्य दिन या दोन्हीच्या दुसऱ्या दिवशी चुकीच्या ठिकाणी पडलेला तिरंगा पाहिला तर अनेकांना वाईट वाटतं, कधी चीडही येते.

भारतीय क्रिकेट संघाचा सामना बघत असताना, तिथे दूर कुठेतरी वाजत असलेलं राष्ट्रगीत टीव्हीवर पाहत असताना सुद्धा अनेकजण सावधान स्थितीत उभे राहतात. एवढंच नाही, तर चित्रपटगुहांमध्ये चित्रपटाच्या आधी राष्ट्रगीत वाजवलं जातं. त्यावेळी एखादी व्यक्ती बेमालूमपणे तशीच खुर्चीत बसून राहते, हे बघून अनेकांना राग अनावर होतो.

 

 

या अशा सगळ्या गोष्टींचा विचार करता, एखाद्या व्यक्तीने राष्ट्रगीताचा अपमान केला, तर नेमकं काय घडू शकतं याचा अंदाज नक्कीच येतो.

अशावेळी खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीच राष्ट्रगीताचा सन्मान म्हणून उभं राहणं अमान्य केलं होतं असं कळलं तर नेमकं काय वाटेल? पण मंडळी हे असं खरंच घडलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महात्मा गांधी यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याकरिता चक्क नकार दिला होता. नेमकं काय घडलं होतं, काय होती ती घटना, हेच आज जाणून घेऊया.

सुभाषचंद्र बोस यांनी ठरवलं भारताचं राष्ट्रगीत :

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं कार्य केलं आहे, हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. भारताबाहेर जाऊन भारतासाठी मदत मिळवण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. याच दरम्यान युरोपात त्यांनी २ नोव्हेंबर १९४२ रोजी ‘फ्री इंडिया सेंटर’ उभारलं.

केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग असणारा काँग्रेसचा तिरंगा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं ‘जन गण मन अधिनायक…’ हे गीत नेताजी बोस यांनी देशाचं राष्ट्र्रगीत म्हणून घोषित केलं.

 

 

अर्थात यावेळीसुद्धा सार्वमत घेण्यात आलं होतं, स्वतः नेताजी यांना मोहम्मद इकबाल यांनी लिहिलेल्या ‘सारे जहाँ सें अच्छा…’ या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यास कुठलीही हरकत नव्हती.

नक्की कुणासाठी लिहिलं होतं?

भारत देशाचं राष्ट्रर्गीत म्हणजेच ‘जण गण मन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे, हे तर आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र याविषयीची एक कथा फारशी कुणाला ठाऊक नसते. हे गीत, हे शब्द टागोरांनी नक्की कुणासाठी लिहिले होते, याविषयी एक वाद निर्माण झाला होता.

१९०८ साली ‘भारत भाग्य विधाता’ नावाने त्यांनी लहिलेली कविता ‘तत्वबोधिनी’ या नियतकालिकात छापली गेली होती. पुढे याच कवितेचं पहिलं कडवं भारताचं राष्ट्रगीत म्हून स्वीकारण्यात आलं.

एका शाळेत पहिल्यांदा गाण्यात आलेलं हे गीत १९११ साली काँग्रेसच्या एका कार्यक्रमात गायलं गेलं, त्यावेळी मात्र ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं. २७ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात ईश्वरस्तुती म्हणून हे गीत गाण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं कारण मात्र निराळं होतं. ब्रिटिश राजा पंचम जॉर्ज पहिल्यांदाच भारतात आला होता.

 

 

बंगाल राज्याचा प्रश्न निकालात काढण्याचा आणि ओडिसा राज्याच्या निर्मिती करण्याचा प्रस्ताव यावेळी त्याने स्वीकारला होता. या कार्यक्रमात गीत गायलं गेलं आणि वादाला सुरुवात झाली. हे गीत पंचम जॉर्ज याच्यासाठी लिहिण्यात आलं आहे, असे आरोप करण्यात आले. याला कारणही तसंच होतं.

रवींद्रनाथ टागोर लिखित ‘भारत भाग्य विधाता’ सादर झालं त्याचप्रमाणे रामभुज चौधरी यांनी लिहिलेली ‘बादशहा हमारा’ ही कवितासुद्धा या कार्यक्रमात सादर करण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मात्र भलतंच काहीतरी छापून आलं. टागोरांनी लिहिलेली कविता ईश्वरस्तुतीसाठी सादर झाली होती, मात्र वर्तमानपत्रात असं म्हटलं गेलं की हीच कविता पंचम जॉर्ज याच्या सन्मानासाठी लिहिण्यात आली आहे.

टागोरांचं मत काय होतं?

या घटनेवर रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेलं स्पष्टीकरण मात्र विचार करण्यासारखं आहे. या सगळ्याच आरोपांचं त्यांनी साफ खंडन केलं आहे. १९३७ साली टागोर असं म्हणाले होते, की एका ब्रिटीश ऑफिसर मित्राने त्यांना राजाच्या सन्मानार्थ एक कविता लिहायला सांगितली होती. मात्र याचा त्यांना प्रचंड राग आला होता.

भारताचा भाग्य विधाता स्वतःचं भाग्य स्वतः निर्माण करत असल्यामुळे, ब्रिटिशांचा सन्मान करण्याचा प्रश्नच उध्दभवत नाही, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. ‘जन गण मन’ या गीतात त्यांनी म्हणूनच ‘भारत भाग्य विधाता’ या शब्दांचा वापर केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

 

 

ब्रिटिश राजाचा उल्लेख ‘भाग्य विधाता’ असा का केला जाईल असा प्रतिप्रश्न सुद्धा त्यांनी केला. १९३९ साली तर त्यांनी विचारलेला सवाल त्यांचं मत अधिक स्पष्ट करणारा आहे. “जॉर्ज चौथा असो किंवा पाचवा, त्याच्याबद्दल मी का लिहू? खरंतर याबद्दल बोलणं हासुद्धा मी माझा अपमान समजतो.”

महात्मा गांधी दंगल रोखण्यासाठी गेले होते त्यावेळी…

१९४६ साली कलकत्त्यात हिंदू मुस्लिम गटांमध्ये दंगल घडली होती. हा वाद थांबवण्यासाठी, गांधीजी कलकत्त्याला पोचले. त्यांनी सगळ्या नेत्यांची एक सभा घेतली. हे सगळे नेते कलकत्त्यात झालेल्या दंगलीमागचे सूत्रधार होते, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

यावेळी सुद्धा महात्मा गांधींनी त्यांचं नेहमीच शस्त्र वापरलं होतं, ते म्हणजे सत्याग्रहाचं! हा वाद मिटावा, शांतता नांदावी यासाठी गांधीजी उपोषणाला बसले होते. ‘वाद संपेल किंवा माझं जीवन’ असा पवित्रा त्यांनी घेतला होता.

 

 

या काळापर्यंत ‘जन गण मन’ या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली होती. प्रत्येक सभेचा शेवट हा या गीताने करण्यात येत असे. त्याच प्रथेप्रमाणे महात्मा गांधींनी घेतलेल्या या सभेनंतर, राष्ट्रगीत वाजवण्यात आलं.

गांधीजी मात्र बसूनच राहिले…

बंगाल संस्थानाचे माजी पंतप्रधान हुसेन सुहरावर्दी, ज्यांना दंगलीमागचे मुख्य सूत्रधार मानलं जातं, तेदेखील उपस्थित होते. राष्ट्रगीत वाजत असताना, त्या सन्मानार्थ तेदेखील उभे राहिले. त्यावेळी महात्मा गांधी मात्र त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत तसेच बसून होते.

याविषयी विचारलं असता, गांधीजी म्हणाले होते की, मान-सन्मान देण्यासाठी उठून उभं राहण्याची पद्धत आपली नाही. ही पद्धत युरोपीयांनी भारतात आणली आहे.
देशाच्या मानसन्मानाचं एक प्रतिक म्हणून राष्ट्रगीताची निवड करण्यात आली आहे.

 

 

या प्रतीकांचा सन्मान करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे, ते म्हणजे देशाचा आणि देशातील नागरिकांचा सन्मान करणं. ही विचारसरणी असणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यावेळी राष्ट्रगीताचा अवमान केला असं म्हणता येणार नाही. कारण महात्मा गांधीजींची देशाचा आदर, सन्मान करण्याची विचारधाराच निराळी होती.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version