Site icon InMarathi

एक काळ असा होता जेव्हा भारतात ‘गांजा’ कायदेशीररित्या विकला जायचा!

Ganja Featured IM 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठल्याही अंमली पदार्थाचे सेवन करणे म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देणे. आपल्याकडे जितके मजेसाठी अमली पदार्थांचे सेवन केले जाते त्याव्यतिरिक्त आपले रोजच्या आयुष्यातले मानसिक, आर्थिक ताणतणाव विसरणे यासाठीही गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय अशा सगळ्या स्तरांतले लोक सिगारेट, दारूचं सेवन करतात.

अनेकांच्या बाबतीत हे सेवन व्यसनात बदलायला वेळ लागत नाही आणि वेगवेगळे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. दारू आणि सिगरेट सेवनाबाबत विचार करतानाच आपला मेंदू इतका सावध होत असेल तर मग गांजा, भांग यांच्याविषयी बोलायलाच नको.

आपल्याकडे गांजाच्या सेवनाला कायद्याने बंदी आहे. असं असलं तरी बेकायदेशीररित्या गांजाची खुलेआम विक्री होते आणि कायदा गुंडाळून खिशात घालत अनेक माणसं गांजाचं सेवन करतात.

 

 

आज जरी भारतात गांजाच्या विक्रीवर कायद्याने बंदी असली तरी असा एक काळ होता जेव्हा भारतात गांजा कायदेशीररित्या विकला जायचा.

गांजासेवनाचे अनेक दुष्परिणाम आहेत ही एक बाजू आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना माहीत असते. पण, गांजाचा आपल्या स्वास्थ्यासाठी काही उपयोगही होऊ शकतो हा विचार आपल्या मनालाही शिवत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यात मध्यंतरी झालेलं आर्यन खान प्रकरण आणि सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री आणि त्याची प्रेयसी असलेल्या रिया चक्रवर्तीला, तिच्या भावाला एनसीबीने अंमली पदार्थांच्या सेवनासंदर्भात केलेली अटक यामुळे नेपोटीझमनंतरचं बॉलिवूड जगताचं हे दुसरं पितळ उघडं पडलं.

 

 

यानंतरच गांजासारख्या अंमली पदार्थाचं सेवन भारतात कायदेशीर केलं जावं का या मुद्याने पुन्हा एकदा डोकं वर काढलं. गांजा, भांग हे अंमली पदार्थ मुळात एका वनस्पतीपासून बनलेले आहेत.

अथर्ववेदात ज्या पाच महत्त्वाच्या वनस्पती मानल्या आहेत त्यातली एक महत्त्वाची वनस्पती म्हणून भांगाच्या वनस्पतीचाही उल्लेख आढळतो. सुश्रुत संहितेत भांगाच्या या वनस्पतीला औषधी वनस्पती असे मानले जाते. ब्रिटिश ज्यावेळी भारतात आले तेव्हा त्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारलेला भांगचा व्यापार पाहिला.

त्यातून अमाप पैसा त्यांच्या हाती लागत होता. त्यामुळे १८३८, १८७१ आणि १८७७ मध्ये भांग सेवन करणे हा गुन्हा आहे असा पुन्हा पुन्हा आवाज उठवला गेला तरी ब्रिटिशांनी भारतात भांगविक्री होऊ देणे कायदेशीररित्या सुरूच ठेवले.

 

 

गांजाच्या सेवनाचे माणसांवर मोठ्या प्रमाणात होणारे दुष्परिणाम, गांजाविक्री कायदेशीर ठेवण्याचा धोका या बाबी लक्षात घेऊन १९८५ साली ‘नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपीक सबस्टन्स’ हा कायदा भारतात संमत करण्यात आला.

भांग विक्रीला कायद्याने परवानगी मिळाली असली तरी गांजा, चरस विकणे, त्याचे सेवन करणे कायद्याने गुन्हा असल्याचे निश्चित झाले. असे असले तरी आजही भारतात गांजा सर्रासपणे विकला-विकत घेतला जातो.

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अभ्यासानुसार १० ते ७५ वर्षे वयोगटातले साधारण २. ८३ % भारतीय मारियुआनाचं सेवन करतात. ही संख्या ३ करोड दहा लाख इतकी आहे.

भारतात गांजावरची बंदी हटवावी असं मानणाऱ्यांचं म्हणणं आहे की गांजाच्या सेवनाने लगेचच माणूस व्यसनाधीन होईल असं नाही तर स्वतःसाठीच्या मजे करता माफक प्रमाणात गांजा सेवन करण्याला हरकत नसावी. गांजाचा वैद्यकीय उपयोगदेखील आहे. या वनस्पतीचे उत्पादन होऊ न देण्यात शेतकऱ्यांचेदेखील नुकसान आहे.

 

 

खरं म्हणजे, दारू-सिगारेट यावरही बंदी आणली पाहिजे. या अंमली पदार्थाचे सेवन केवळ मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेच हानिकारक नसून भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

आजही आपल्याकडे कुंभमेळ्यात, होळीला, शिवरात्रीला भांग प्यायली जातो. जे मोठमोठे साधूसंत म्हणून मान्यता पावलेले आहेत ते देखील खुलेआम चिलीम ओढतात. चिलीमही अंमलीच आहे. त्यामुळे एका बाजूने फार कडक निर्बंध लादले गेलेले असले तरी दुसऱ्या बाजूने अगदी पवित्र समजली जाणारी माणसेही अंमली पदार्थांचे सेवन करत आहेत.

 

 

अमेरिकेसारख्या देशात जरी २१ वर्षांपुढच्या व्यक्तीला मारियुआनाचे सेवन करणे कायद्याने मान्य केले असले तरी भारतात ते सुरू करून सगळे काही आलबेल राहील याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. कारण, बंदी असतानादेखील या अंमली पदार्थांच्या बाबतीतली भारतातली परिस्थिती आलबेल नाही.

त्यामुळे कधीकाळी गांजा भारतात कायदेशीररित्या विकला जात असला तरी आणि या वनस्पतीचे इतर फायदे लक्षात घेतले तरी भारतात गांजाविक्री कायद्याने संमत करायची की नाही याविषयीचे प्रश्नचिन्ह कायम आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version