' एका सूडासाठी माकडांनी मारली २५० कुत्र्यांची पिल्लं; अंगावर काटा आणणारा थरार – InMarathi

एका सूडासाठी माकडांनी मारली २५० कुत्र्यांची पिल्लं; अंगावर काटा आणणारा थरार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपली विचार करण्याची वृत्ती आणि भावनाप्रधान स्वभाव हे आपल्याला प्राण्यांपासून वेगळं करतात असं आपण नेहमीच म्हणतो. आपल्यासोबत कोण कसं वागतंय? हे बघून त्याच्यासोबत तसंच वागणे ही एक मानव निर्मित सवय म्हणता येईल.

प्राणी हे शांत असतात. आपण त्यांना त्रास दिला नाही तर ते आपल्याला त्रास देत नाहीत हे वाक्य आपण प्राणी संग्रहालयात कित्येकदा ऐकलं आहे, पण बीड जिल्ह्यातील लावूळ गावात गावकऱ्यांना सध्या माकडांच्या माणसांसारख्या ‘डुग’ धरून बसण्याच्या, ‘जशास तसे’ या वागण्याचा सामना करावा लागत आहे आणि त्यामुळे प्राण्यांचा स्वभाव हा सध्याचा चर्चेचा विषय झाला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एका छोट्या कुत्र्याने एका माकडाला मारलं आणि त्याचा वचपा काढण्यासाठी माकडांनी २५० कुत्र्यांना मारलं या विचित्र घटनेने सध्या समस्त गावकरी, प्राणीमित्र सध्या घाबरले आहेत. काय आहे हे प्रकरण  इमारतीच्या छतावरून शांतपणे निघून जाणारी वानर सेना इतकी हिंसक का झाली असावी? जाणून घेऊयात.

 

monkey inmarathi1

 

कुठे आहे लावूळ? नेमकं काय घडलं?

माजलगाव पासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेलं लावूळ हे ५००० लोकांची वस्ती असलेलं एक छोटंसं गाव आहे. शेतीप्रधान असलेल्या या शांत गावात मध्यंतरी काही कुत्र्यांनी एकत्र येऊन एका नवजात वानराची हत्या केली.

काही वानरांनी हे प्रत्यक्ष घडतांना बघितलं, पण ते कुत्र्यांचा प्रतिकार करू शकले नाहीत. आपल्याला प्रिय असलेल्या वानराला डोळ्यासमोर मरतांना बघून वानरांना खूप वाईट वाटलं असावं. वानरांनी तातडीने या घटनेबद्दल आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं.

माकडांनी या घटनेचा निषेध केला आणि कुत्र्यांना जशास तसं उत्तर देण्याचा निर्णय घेतला. टीव्हीवरील एखाद्या कार्टूनमध्ये दाखवतात तशी ही माकडं एकत्र आली, त्यांनी या घटनेचा ‘बदला’ घेण्याचं ठरवलं आणि ते त्वरित कामाला लागले.

नवजात कुत्र्यांना उचलून घेऊन जायचं आणि त्यांना इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकून द्यायचा त्यांनी धडाकाच सुरू केला. एक – दोन करत त्या गावातील २५० नवजात कुत्र्यांना त्यांनी इतक्या उंचीवरून फेकलं, की त्यातील एकही कुत्रा खाली पडल्यावर जिवंत राहू शकला नाही. आज अशी अवस्था झाली आहे की, लावूळ गावात एकही कुत्रं अस्तित्वात नाहीये.

 

monkey inmarathi2

लावूळ गावातील लोक या सर्व घटना आपल्या डोळ्यासमोर बघत होते, पण त्यांना काहीच थांबवता येत नव्हतं हे दुर्दैव म्हणावं लागेल. ग्रामस्थांनी एकत्र येऊन या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली. माकडांना पकडा आणि त्यांनी सुरू केलेला हा ‘श्वानसंहार’ थांबवा अशी ग्रामस्थांनी मागणी केली. वन अधिकाऱ्यांनी या गंभीर घटनेची त्वरित दखल घेतली आणि त्यांचं एक पथक लावूळ गावात पाठवलं.

वन अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना सुरुवातीला यश आलं नाही. कारण, वानरांची संख्या आणि गती अर्थातच जास्त असल्याने वन अधिकाऱ्यांची चांगलीच त्रेधा तिरपीट होत होती. लावूळ गावातील लोकांनी पुढे येऊन वन अधिकाऱ्यांना या कामात मदत करण्याचा निर्णय घेतला.

माकडांना पकडण्याच्या या कामात कित्येक ग्रामस्थ जखमी झाले. माकडांनी माणसांकडून होणारा त्रास बघून गावातील लहान मुलांना त्रास देण्यास सुरुवात केली. लावूळ गावात या घटनेनंतर एक वेगळीच दहशत पसरली होती.

 

monkey inmarathi3

 

बीड जिल्ह्यातील वन विभागाला या घटनेवर नियंत्रण मिळवता येत नव्हतं. त्यामुळे १८ डिसेंबर रोजी नागपूर वन अधिकाऱ्यांना पाचारण करण्याची विनंती करण्यात आली.

नागपूरच्या अधिकाऱ्यांनी या मिशनची रणनीती आखली आणि त्यांना दोन मोठ्या माकडांना पकडण्यात यश आलं आणि त्यांनी नागपूरच्या जंगलात त्या माकडांची रवानगी केली.

छत्तीसगड राज्यातील ‘कोठार’ गावात जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा तिथल्या वन अधिकाऱ्यांनी काही ‘शार्प शूटर’ची या कामावर नेमणूक करून उपद्रवी वानरांचा खात्मा केला होता. कोठार गावातील शेतीचं या मिशनमध्ये प्रचंड नुकसान झालं होतं.

लावूळ गावातील हा प्रकार त्यावेळी प्रकाशात आला जेव्हा त्याचा एक व्हिडिओ मधल्या काळात सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला होता. गावकऱ्यांना दहशतीमुळे घरी बसावं लागतंय हे जेव्हा प्रशासनापर्यंत पोहोचलं तेव्हा तातडीने कारवाईचे करण्याचे आदेश देण्यात आले होते.

 

monkey inmarathi
ANI

 

वन विभागाने सुरुवातीला हे प्रकरण हलक्यात घेतलं होतं, पण जेव्हा ही बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियाने सुद्धा उचलून धरली तेव्हा या प्रकरणाचं गांभीर्य त्यांना पटलं अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली होती.

लावूळ गावातील या घटनेत मृत झालेल्या कुत्र्यांच्या पिल्लाची संख्या ही २५० इतकी नसून ती ५० ते ६० इतकीच आहे असं काही ग्रामस्थांनी बीबीसी वृत्तवाहिनीला बोलतांना सांगितलं होतं. बीडच्या वन अधिकारी डी एन मोरे यांनी तर मृत कुत्र्यांची संख्या ही दोन अंकी सुद्धा नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

प्राणी अभ्यासकांना या घटनेबद्दल मत विचारलं असता त्यांनी माकडांच्या अशा विक्षिप्त वागण्याला दुजोरा दिला आहे. “माकडांना कोणी त्रास दिला तर ते त्यांना असाच त्रास देतात” असं औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयाचे अधिकारी डॉक्टर नाईकवाडे यांनी सांगितलं आहे.

लावूळ गावात मागील ३ महिन्यांपासून सुरू असलेला हा थरार नागपूर वनविभागाच्या मदतीने आता संपुष्टात आला आहे याबद्दल त्रस्त गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?