दीपिका ते कतरीना; बॉलिवूडचे लग्नसोहळे “यांच्या” मेहेंदीशिवाय पूर्ण होत नाहीत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट करायची तयारी असेल आणि पाय जमिनीवर असतील तर देवही माणसाला साथ देतो. अगदी अनपेक्षित वाटावा इतक्या सुखद धक्क्यांनी भरलेला प्रवास आपल्या वाट्याला येऊ शकतो. खरंतर, आपणच येणाऱ्या प्रत्येक संधीकडे आपल्यासाठीच असलेली ही योजना आहे असं मानून एकेका संधीचं सोनं करायला लागतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
ऐकायला आणि म्हणायला ही गोष्ट कितीही सहजसोपी वाटली, तरी प्रत्यक्षात मात्र ती तशी नसते. त्यामुळे फार कमी जण हे असं इतकं प्रामाणिक कष्टांचं आयुष्य जगून मोठे होतात. नावारूपाला येतात.
मनापासून आपलं काम चोख करण्याच्या वृत्तीने सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातली एक मुलगी आपल्या मेहेंदी काढण्याच्या कलेत निपुण होऊन त्याचं व्यवसायात रूपांतर करते आणि बघता बघता बॉलिवूडची ‘मेहेंदी क्वीन’ म्हणून ओळख मिळवते.
बॉलिवूड तारेतारकांचे लग्नसोहळे म्हटले की जितकी चर्चा त्यांनी लग्नासाठी, दागदागिन्यांसाठी केलेला खर्च, त्यांची वेडिंग लोकेशन्स, त्यांचे ब्रायडल लूक्स यांची होते तितकी अभावानेच त्यांच्या मेहेंदीबाबत ऐकायला मिळते, पण वीणा नागदा यांनी काढलेल्या मेहेंदीने बॉलिवूड कलाकारांचे हात रंगल्याशिवाय कुठल्याही बॉलिवूड लग्नसोहळ्याला चार चाँद लागत नाहीत.
‘वीणा नागदा’ आणि मेहेंदी हे बॉलिवूड जगतातलं एकमेकांपासून वेगळं करताच येणार नाही इतकं घट्ट समीकरण आहे. बॉलिवूड जगताला मेहेंदीच्या बाबतीत वीणा नागदा यांच्याखेरीज पर्याय नाही.
अतिशय कडक शिस्तीच्या वडिलांच्या सहवासात लहानाच्या मोठ्या झालेल्या वीणा यांचे ५ बहिणी आणि एक भाऊ, आईवडील आणि त्या असे मध्यमवर्गीय कुटुंब होते. वडील फार कडक शिस्तीचे होते त्यामुळे ते मुलींना घराबाहेर पडून द्यायचे नाहीत. त्यांच्याकडे शिक्षणासाठी पुरेसे पैसेही नव्हते त्यामुळे पुढचं शिक्षण घेणं त्यांना शक्यच नव्हतं.
दहावीपर्यंतच त्यांचं शिक्षण होऊ शकलं. दहावीत त्यांनी फर्स्ट क्लास मिळवला. पण घरखर्चासाठी आपल्याकडूनही हातभार लागावा म्हणून त्यांनी आठवीत असल्यापासून त्यांच्या आईला ‘कच्छी एम्ब्रॉयडरी’च्या कामात मदत करायला सुरुवात केली. हे करत करतच त्या सर्जनशील झाल्या.
—
- कतरीनाला मिळाला नकार ,आणि मग ती सलमान जवळ जाऊन ढसाढसा रडली….
- हत्तींची ऑडिशन? आशुतोष गोवारीकरांचं ‘परफेक्शन’ दाखवणारा रंजक किस्सा
—
त्यांनी मेहेंदीचं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. घरात काही कार्यक्रम असतील तर नातेवाईकांच्या किंवा मैत्रिणींच्या हातांवर मेहेंदी काढायला त्यांनी सुरुवात केली. त्यात त्या एम्ब्रॉयडरीच्या डिझाईन्सही काढायच्या, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या मेहेंदीच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली ती १९८० साली जेव्हा त्यांच्या एका फॅमिली डॉक्टरच्या लग्नात तिच्या हातांवर मेहेंदी काढण्याची संधी त्यांना मिळाली तेव्हा.
तिथेच त्यांनी पहिल्यांदा ८० च्या दशकातली बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री पूनम ढिल्लोन हिला पाहिलं. त्यांनी तिच्या एका हातावर काढलेली मेहेंदी तिला अतिशय आवडल्यामुळे तिने त्यांना तिच्या दुसऱ्या हातावरही मेहेंदी काढायला सांगितली आणि अशा प्रकारे त्यांना त्यांची पहिलीवहिली बॉलिवूड क्लायंट मिळाली.
वीणा यांचा प्रवास इतका सरळ झालेला नव्हता. पुढचं शिक्षण घेऊ न शकलेल्या वीणा आधी त्यांच्या वडिलांच्या मित्राच्या मेडिकल फॅक्टरीत कामाला जात होत्या. ८ ते ६ नोकरी करूनही दिवसाला तिथे त्यांना फक्त ६ रुपयेच मिळत होते, पण पूनम ढिल्लोनच्या हातांवर मेहेंदी काढल्यानंतर त्यांना एक वेगळीच किक मिळाली आणि आपण पूनम ढिल्लोनच्या हातांवर मेहेंदी काढलीये अशी माऊथ पब्लिसिटी केल्यानंतर आजूबाजूच्या कॉलन्यांमधून एकेक करून त्यांना क्लायंट्स मिळायला सुरुवात झाली.
आपण फॅक्टरीतली नोकरी सोडून दिली आहे हे त्यांनी सुरुवातीला वडिलांपासून लपवून ठेवलं होतं. पण त्यांच्या आईचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. घरी यायला उशीर होऊ लागला तेव्हा मात्र त्यांना वडिलांना हे सांगावं लागलं. जिथे त्यांना आधी दिवसाला फक्त ६ रुपये मिळत होते तिथे त्यांना आता एका हाताचे १० रुपये मिळत आहेत त्यामुळे आपली मुलगी चांगलं कमावते आहे असं सांगून त्यांच्या आईने त्यांच्या वडिलांचं मन वळवलं आणि हे काम आपल्या मुलीला करू द्यावं यासाठी त्यांना राजी केलं.
वेगवेगळ्या विवाहसोहळ्यांमध्ये वीणा यांची मेहेंदी लोक बघू लागले आणि त्यांना मुंबईत कामं मिळणं उत्तरोत्तर वाढत गेलं. एका सिप्पी कुटुंबाच्या लग्नसोहळ्यात त्यांना नीतू सिंग भेटली आणि तिथेच फराह खान यांनी त्यांना त्यांच्या हातांवर मेहेंदी काढण्याची संधी दिली. नंतर मग फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्यासाठी आणि लागोलाग अंबानींच्या लग्नसोहळ्यातही त्यांना मेहेंदी काढण्यासाठी बोलावलं गेलं.
फाल्गुनी पाठकच्या गाण्यातली त्यांनी काढलेली मेहेंदी करण जोहरने बघितली आणि तिथेच त्यांना ‘केथ्रीजी’ मधल्या करीना कपूरच्या ‘बोले चुडिया’ या गाण्यासाठी तिच्या हातांवर मेहेंदी काढण्याची संधी दिली. तेव्हापासून त्यांच्यातले व्यावसायिक संबंध अधिकाधिक घट्ट होत गेले.
खरंतर करण जोहरनेच त्यांना पहिल्यांदा ‘बॉलिवूड मेहेंदी क्वीन’ असं म्हटलं होतं आणि त्याच्यामुळेच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त फिरायची संधी मिळाली आणि ‘वायआरएफ’ सारख्या मोठमोठ्या ब्रॅण्ड्ससाठी मेहेंदी काढायला बोलावलं जाऊ लागलं.
नुकत्याच पार पडलेल्या कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नसोहळ्यात वीणा यांनीच मेहेंदी काढलेली होती. २००६ साली कतरीना जेव्हा ‘हमको दिवाना कर गये’ चं शूटिंग करत होती तेव्हाही त्यांनी तिच्या हातावर मेहेंदी काढली होती. यापूर्वी वीणा यांनी इटलीत दीपिका पदुकोणचं लग्न झालं होतं तिथे तिच्या हातांवर, वरूण धवनची बायको नताशा दलालच्या हातांवर, सोनम कपूर आणि काजल अग्रवाल यांच्या हातांवरही मेहेंदी काढलेली आहे.
अंबानींच्या लग्नसोहळ्यात त्यांनी मेहेंदी काढली असली, तरी खऱ्या अर्थाने त्या प्रकाशात आल्या ते ऱ्हितिक रोशन- सुझान खानच्या लग्नात त्यांनी सुझान खानच्या हातांवर मेहेंदी काढली तेव्हा. केवळ बॉलिवूड लग्नसोहळ्यांमध्येच मेहेंदी काढण्यापुरतं त्यांचं मेहेंदी काढण्याचं काम सीमित नसून त्यांनी ‘कभी ख़ुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’, ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात वेगवेगळ्या कलाकारांच्या हातांवर मेहेंदी काढलेली आहे.
‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटातलया ‘चन्ना मेरेया’ या गाण्यात रणबीर कपूरच्या हातांवर आपण जी मेहेंदी बघितली तीसुद्धा वीणा नागदा यांनीच काढलेली आहे. याखेरीज वीणा यांनी आलिया भट्ट, अनन्या पांडे यांसारख्या वेगवेगळ्या बॉलिवूड कलाकारांच्या हातांवर मेहेंदी काढलेली आहे.
तब्बल ३८ वर्षांच्या मेहेंदीच्या व्यावसायिक कारकिर्दीविषयी वीणा नागदा अतिशय खुश आणि समाधानी आहेत. या व्यवसायानेच अनेक सोनेरी दिवस आपल्या आयुष्यात आणले, मोठमोठ्या सिनेकलाकारांना भेटताआलं, आपल्याला साऊथ मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचं घर घेता आलं, उच्चशिक्षणासाठी मुलांना परदेशात पाठवता आलं याविषयी त्या खूप कृतज्ञ आहेत.
त्यांना त्यांचा सगळा प्रवास अतिशय स्वप्नवत वाटतो. तुम्ही किती मनापासून, प्रामाणिकपणे आणि कष्ट घेऊन काम करता यावर सगळं अवलंबून आहे असं त्या मानतात. तुम्ही जर प्रामाणिकपणे मेहनत केली नाहीत, तुमच्या कामाप्रती तुम्हाला आदर नसेल तर तुम्ही प्रगती करू शकत नाही असा त्यांना ठाम विश्वास आहे.
त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या मुली या कलेत इतक्या निपुण झाल्या आहेत, की सगळ्या दृष्टीनेच त्या मुलींच्या आईवडिलांना त्यांचा अभिमान वाटतो. कामाचा ताण नसतो तेव्हा त्या मेहेंदीचे वर्ग घेतात आणि आपल्या मुलांसाठी वेळ देतात.
कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्याची इच्छा असणाऱ्या कुणालाही वीणा यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. कुठलाही व्यवसाय छोटा किंवा मोठा नाही तर आपल्या मेहनतीने आणि कामाप्रतीच्या निष्ठेने आपण तो छोटा किंवा मोठा करत असतो हेच आपल्याला यांच्या प्रवासाकडे बघून लक्षात येतं.
झोकून देऊन काम केलं आणि कष्ट करायची तयारी असेल तर आपलयालाही असं घवघवीत यश मिळवण्याचं स्वप्न सत्यात उतरवणं अशक्य नाही अशी प्रेरणा वीणा नागदा आपल्याला देतात.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.