असं नेमकं काय घडलंय की नॉर्थ कोरियात चक्क ११ दिवस हसण्यावर बंदी आली
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हुकूमशहा म्हटलं की हिटलर, मुसोलिनी, केमाल पाशा अशी इतिहासाच्या पुस्तकातील काही नावं आठवतात. इतिहासाचा अभ्यास करताना या हुकूमशहांचा छळ नको वाटायचा ना? अर्थात, हल्लीच्या काळात बहुतांश देशांमध्ये लोकशाही अस्तित्वात आहे. पण अजूनही काही देशांमध्ये हुकूमशहा पाहायला मिळतात.
अगदी विसाव्या शतकात सुद्धा पाहायला मिळालेले किंवा अजूनही अस्तित्वात असलेले हुकूमशहा म्हटले तर ईदी अमीन, सद्दाम हुसेन, किम जोंग उन अशी काही नावं आठवतात. किम जोंग उन म्हणजे उत्तर कोरियाचा हुकूमशहा. याचे अनेक किस्से, त्याच्याविषयीच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. या हुकूमशहाचं नाव आणि कारनामे ऐकले असतील, तर उत्तर कोरिया म्हणजे काय चीज आहे, हे तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल.
या देशातल्या नागरिकांना चक्क इंटरनेट वापरण्यासाठी बंदी आहे. एवढंच नाही, तर काही विशिष्ट प्रकारच्या हेअरस्टाईल्स करणं, स्किनी जीन्स वापरणं, नाक टोचणं अशाही काही गोष्टी करण्याची मुभा उत्तर कोरियातील नागरिकांना नाही. आता हे सगळं कमी की काय, म्हणून उत्तर कोरियातील लोकांसाठी एक नवा नियम घालण्यात आला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
या देशातील नागरिकांना ११ दिवसांसाठी ३ गोष्टी करण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. या तीन गोष्टी म्हणजे, हसणं, शपिंग करणं आणि दारूपिणं. तसं पाहिलं तर मद्यपानावर बंदी घालण्याचा निर्णय वाईट नसला आणि शॉपिंगवर ११ दिवस बंदी घातली तरी फारसा फरक पडणार नसला, तरी हसण्यावर बंदी घालणं म्हणजे जरा जास्तच झालं नाही? यामागचं कारण कळलं, तर तुम्हाला हसू येईल हे मात्र नक्की!
हसण्यावर बंदी आहे कारण…
उत्तर कोरियात १७ डिसेंबरपासून हसणं, दारू पिणं आणि कुठल्याही प्रकारचा आनंद व्यक्त करणं यावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचं कारण आहे, शोक व्यक्त करणं! शोक व्यक्त करणं ही काही वाईट गोष्ट नव्हे, मात्र १० वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीच्या निधनाचा शोक म्हणून चक्क ११ दिवस, न हसता राहायचं, तेदेखील संपूर्ण देशातील नागरिकांनी; ही गोष्ट काहीशी विचित्र आहे, असं म्हणायला हवं.
ही बंदी शुक्रवार १७ डिसेंबरपासून घालण्यात आली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याचे वडील, म्हणजेच उत्तर कोरियावर १७ वर्षं राज्य करणारे, किम घराण्यातील दुसरे हुकूमशहा किम जोंग इल यांचा दहा वर्षांपूर्वी म्हणजेच १७ डिसेंबर २०११ रोजी मृत्यू झाला होता. वडिलांच्या दहाव्या समृत्यूदिनानिमित्त किम जोंग उन यांनी हा आगळावेगळा फतवा काढला आहे. पुढील ११ दिवस शोक कालावधी म्हणून घोषित करण्यात आले असून, या कालावधीत नागरिकांना केवळ शोक व्यक्त करण्यास परवानगी आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
ही बंदी कमी की काय म्हणून…
दहाव्या स्मृतिदिनानिमित्त शोक व्यक्त करण्यासाठी हसण्यावर बंदी घालणं हाच एक अतिशय हास्यास्पद आणि अमानुष निर्णय ठरतो. एखाद्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दुःख होणारच नाही, त्या व्यक्तीची आठवण येणारच नाही, हे जरी चूक असलं, तरीही हे दुःख दहा वर्षं उलटून गेल्यावरही तेवढंच राहणार नाही, हेदेखील तितकंच खरं आहे.
दहा वर्षांपूर्वी मृत झालेल्या आपल्या वडिलांच्या मृत्यूचा शोक आजही संपूर्ण देशाला व्हायला हवा, अशी अपेक्षा करणारा किम जोंग उन या ११ दिवसांच्या कालावधीत स्वर्गवासी होणाऱ्या व्यक्तींच्या आणि त्यांच्या कुटूंबियांच्या बाबतीत मात्र अमानुषपणे वागणार आहे. नागरिकांवर घालण्यात आलेली हसण्यावरील बंदी कमी की काय, म्हणून ‘एखाद्या व्यक्तीचा शोक कालावधी दरम्यान मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटूंबियांनी मोठ्याने रडू नये’ असाही फतवा काढण्यात आला आहे.
दहा वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या किम जोंग इल यांच्या मृत्यूचं दुःख व्यक्त करत असताना, आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीचा मृतदेह मात्र या मृतांच्या नातेवाईकांना ११ दिवस संपेपर्यंत घराबाहेर काढता येणार नाही. कारण, शोक कालावधी संपेपर्यंत इतर कुठल्याही व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्याची आणि तो मृतदेह घराबाहेर नेण्याची परवानगी किम जोंग उन यांच्याकडून नाकारण्यात आली आहे.
असंही म्हटलं जातं, की याआधीच्या काळात अशाप्रकारच्या बंदी न पाळू शकलेल्या लोकांना गुन्हेगार ठरवण्यात आलं आहे. काही व्यक्तींना तर अटक करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांना त्यानंतर कुणीही पाहिलेलं नाही.
उत्तर कोरियामधील ही भीषण परिस्थिती, हुकूमशाही मनोवृत्तीचा परिणाम पाहिला, की लोकशाहीचं महत्त्व अधिक कळून येतं. भारतातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उभ्या करणाऱ्या व्यक्ती सुद्धा पाहायला मिळतात. मात्र भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, आणि म्हणूनच ‘विविधतेत एकता’ राखत भारत देश टिकून आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.