आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
वर्षातून सहा महिने समुद्रावर आणि सहा महिने घरी असं मरीन इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या आणि समुद्रावर जाणाऱ्या लोकांचं लाईफस्टाईल कधी ना कधी तुम्ही ऐकलेलं, पाहिलेलं असेल.
सहा महिने घरी घालवायचे आणि उरलेले सहा महिने मस्त समुद्राच्या सानिध्यात उत्तम आणि निसर्गरम्य वातावरणात काढायचे म्हणजे कसलं मस्त आयुष्य! पण खरोखरंच हे असं महिनोन्महिने समुद्रावर काढणं मजेचं असतं का?
हे आयुष्य आनंदाचं असतं की तेदेखील त्रासाचं ठरू शकतं? आजूबाजूला दिवसेंदिवस फक्त आणि फक्त समुद्रच दिसतोय. आभाळाकडे आणि समुद्राकडे पाहून नुसत्या डोळ्यांना दिशेचा अंदाज येणं शक्यच नसतं. त्यासाठी मग कुठेतरी वेगवेगळ्या उपकरणांची गरज पडते; अशी साधारण परिस्थिती!
या सगळ्या स्थितीत डोकं शांत न राहण्यासाठी याव्यतिरिक्त इतरही काही कारण असू शकेल, असा विचार केलाय का कधी? असं एक कारण आहे. याहूनही भयावह. मन शांत राहणं तर दूर, माणूस चक्क हिंसेचा मार्ग स्वीकारू शकतो. याविषयीचा एक भयानक प्रयोग करण्यात आला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
१९७० च्या दशकात केला गेलेला हा प्रयोग, आजही चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय ठरतो. ‘हा प्रयोग नेमका काय होता?’, ‘त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?’, ‘तसं का घडलं होतं?’, ‘प्रयोग नक्की कशासाठी आणि कुणी केला होता?’ हे सगळं आज जाणून घेऊयात.
अशी सुचली या प्रयोगाची कल्पना –
बायोलॉजिकल अॅन्थ्रोपोलॉजी तज्ज्ञ असणाऱ्या सँटियागो जिनोव्ज नावाच्या मेक्सिकोमधील व्यक्तीने १९७३ साली हा एक प्रयोग केला होता. सेक्स आणि हिंसा यांचा परस्पर संबंध आहे का याविषयी संशोधन करण्यासाठी, मानवी भावभावना आणि स्वभाव यांचा अभ्यास करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता.
या प्रयोगाची कल्पना जिनोव्ज यांना सुचली त्याचं कारणदेखील तसं विचार करण्यासारखं होतं. १९७२ साली झालेल्या एका विमानाच्या अपहरण प्रसंगामुळे जिनोव्ज यांना या प्रयोगाची कल्पना सुचली होती.
घडलं असं की, १९७२ साली जिनोव्ज विमानाने प्रवास करत होते. हे विमान हायजॅक करण्यात आलं. मंटीरोहून मेक्सिकोकडे रवाना झालेलं हे विमान पाच सशस्त्र माणसांनी अपहृत केलं होतं.
काही राजकीय कैद्यांना सोडवण्यासाठी ही घटना घडली होती, असं म्हटलं जातं. यासाठी १०३ व्यक्तींचं अपहरण केलं गेलं. हिंसेच्या इतिहासावर आयोजित संमेलातून परतणाऱ्या जिनोव्ज यांना या प्रसंगातून एका प्रयोगाची कल्पना सुचली.
प्रयोगासाठी करण्यात आलेली तयारी –
शारीरिक संबंध न ठेवता येणं, सेक्सपासून दूर राहणं यामुळे माणूस हिंसक होऊ शकतो का, हे पाहण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. जिनोव्ज यांनी सुरुवातीला, बंदरावरील काही खलाश्यांचं निरीक्षण आणि अभ्यास केला.
–
- मानवजातीला काळिमा फासणारा रशियाचा भयंकर प्रयोग नेमका काय होता? जाणून घ्या!
- गंभीर जखम झाल्यावर जखमीला पूर्णतः शुद्धीत ठेवण्यामागे हे महत्वाचं कारण आहे
–
या अभ्यासातून त्यांच्या असं लक्षात आलं, की शारीरिक संबंध ठेवता न येणं हे त्यांच्यातील वाद आणि भांडणांचं महत्त्वाचं कारण ठरतं. हे या प्रयोगाचं पहिलं पाऊल ठरलं असं म्हणता येईल. त्यानंतर एका ब्रिटिश माणसाकडून एक खास बोट (राफ्ट) बनवून घेण्यात आली.
१२ बाय ७ मीटर आकाराच्या या बोटीचं नाव होतं, Acali. या शब्दाचा अर्थ पाण्यावरील घर असा होतो. बोटीवरील ५ आकर्षक महिला आणि ५ आकर्षक पुरुष आणि त्यांच्या बरोबर स्वतः जिनोव्ज अशी ११ माणसं तब्बल १०१ दिवसांसाठी समुद्रावर निघाली. या बोटीला इंजिन नव्हतं. शीड आणि वाऱ्याच्या साहाय्याने बोटीचा प्रवास होणार होता.
स्वीडिश महिला मारिया जोर्न्सटम हिला बोटीचा कप्तान बनवण्यात आलं. जवळपास सर्वच मुख्य जबाबदाऱ्या महिलांकडे होत्या. एक जपानी फोटोग्राफर, एक ख्रिस्ती पुजारी, एक इजरायली डॉक्टर, एक वेटर अशा विविध क्षेत्रातील लोक या बोटीवर होते.
प्रयोगात कुठलीही कमी राहणार नाही याची पुरेपूर काळजी जिनोव्ज यांनी घेतली होती.
एकांत मिळणार नाही अशी व्यवस्था –
या प्रवासात कुठल्याही दोन व्यक्तींना चुकूनही एकांत मिळू नये अशी सोय करण्यात आली होती. कारण प्रयोग यशस्वी होण्यासाठी हाच मुख्य भाग होता.
बोटीवर कुणालाही कुठल्याही प्रकारचं वाचन करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. एवढंच काय तर शौचालयाला जाण्याची नैसर्गिक क्रिया करण्यासाठी सुद्धा कुठलाही एकांत देण्यात येत नसे. यासाठी अशी व्यवस्था केली होती, की बोटीच्या प्रत्येक कोपऱ्यावरून ती व्यक्ती दिसायला हवी.
आता अशा या एकांत नसलेल्या बोटीवर शारीरिक संबंध ठेवणं अजिबातच शक्य नव्हतं हे वेगळं सांगायला नको. रात्रीचा अंधार हा एकच पर्याय सेक्सची हौस पूर्ण करण्यासाठी निवडता येणार होता.
अर्थात, रात्रीच्या वेळी सुद्धा दोन व्यक्ती जाग्या राहून सतत पहारा देत असत. म्हणजेच रात्रीच्या मिट्ट अंधारात सुद्धा संपूर्ण एकांत मिळणं शक्यच नव्हतं. या अशा परिस्थितीत समुद्रात उडी टाकणं किंवा वाट्याला आलंय ते जीवन मुकाट्याने जगणं हे दोनच पर्याय बोटीवरील लोकांसमोर होते.
…म्हणून मग प्रयोगाचं नावच बदललं!
सुरुवातील जिनोव्ज यांनी या प्रयोगाचं नाव पीस प्रोजेक्ट असं ठेवलं होतं, हिंसा-अहिंसेशी संबंध असणाऱ्या या प्रोजेक्टसाठी हे नाव योग्य होतं. बोटीच्या म्हणेजच राफ्टच्या acali या नावावरून या प्रोजेक्टला acali प्रोजेक्ट असंही संबोधलं जाऊ लागलं.
प्रत्यक्षात हा प्रयोग सुरु झाल्यावर मात्र उलटसुलट चर्चा आणि अफवांना उधाण आलं. या प्रयोगाचं पीस प्रोजेक्ट हे नाव जणू काही लोकांनी नाकारलं. या चर्चांचा परिणाम असा झाला, की पुढे हाच प्रयोग ‘सेक्स राफ्ट प्रोजेक्ट’ नावाने ओळखला जाऊ लागला.
तणाव आणि नकारात्मकता –
अर्थातच, ही सगळी नियमावली आणि व्यवस्था जिनोव्ज यांची होती. म्हणजेच त्या परिस्थितीमुळे घडणाऱ्या घटनांना सर्वस्वी ते जबाबदार होते असंही म्हणता येईल. बोटीवर उपस्थित असणाऱ्या प्रवाशांमध्ये फारसे वादंग घडले नाहीत. जी काही परिस्थिती उद्भवली होती, ती जिनोव्ज यांच्या नाकारात्मकतेमुळे निर्माण झाली होती.
बोटीवरील इतरांच्या मनात अनेकदा त्यांना समुद्रात फेकून देण्याचे विचारदेखील आले होते. मात्र हे विचार अमलात येणार नाहीत याची त्यांनी काळजी घेतली. हे असे विचार मनात येण्यामागे बोटीवरील जाचक बंधनातून सुटणे, हा महत्त्वाचा हेतू होता.
त्यांना नैसर्गिक मृत्यू आला असं भासावं अशाप्रकारे त्यांची हत्या करण्याचा विचार सुद्धा या प्रवाशांना येऊन गेला. मात्र असं कुठलंही चुकीचं पाऊल बोटीवरील कुठल्याही व्यक्तीने उचललं नाही.
कठीण स्थितीत सामंजस्य दाखवत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. मे महिन्यात प्रवासावर निघालेली ही बोट अखेर मेक्सिकोला परतली. बोटीवरील सगळ्या व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. त्यांच्या आरोग्याच्या विविध चाचण्या करण्यात आल्या.
या सगळ्या प्रयोगाचा विपरीत परिणाम जिनोव्ज यांच्यावरच झाला असं म्हटलं जातं. या प्रवासानंतर ते नैराश्याच्या गर्तेत होते. त्यांच्या युनिव्हर्सिटीने सुद्धा त्यांच्याशी त्यानंतर फारसा संपर्क साधला नाही, असंही आज मानलं जातं.
एकंदरीतच, हा प्रयोग त्यामागची योजना, विचार आणि प्रयोगाचा झालेला परिणाम या सगळ्या गोष्टींचा विचार करता, ११ जणांचा हा १०१ दिवसांचा खेळ फारच भयावह होता असं म्हणायला हवं. ‘सेक्स राफ्ट’ नावाने प्रसिद्ध असलेला हा प्रोजेक्ट आजही भल्याभल्यांचं डोकं भंडावून सोडतो.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.