सूर्यवंशीप्रमाणे पोलिसी खाक्या दाखवणारे हे सिनेमे देखील आवर्जून पहा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय सिनेमाने आजवर अनेक विषयांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले आहे. समाजातील वाईट प्रवृत्ती आणि आणि वास्तवाचे चित्रण करत लोकांना मनोरंजनाच्या माध्यमातून शिक्षित केले आहे. समाजात घडणार्या अनेक चांगल्या वाईट घटनांना चित्रपटाच्या माध्यमातून व्यासपीठ देत लोकांमधील जागरूकता वाढवण्यात हातभार लावला आहे. यांमध्ये पोलिस यंत्रणा आणि त्याच्या संदर्भातील काही विशेष घटना यांवर ही अनेक सिनेमे प्रदर्शीत झाले.
ज्यांमध्ये पोलीसातील माणूसपणापासून, परिस्थितीने हतबल झालेल्या आणि शेवटी आपल्या विवेकबुद्धीला साथ देत दुष्टाना शिक्षा करणार्या नायकापर्यंत पोलिसातल्या माणूस पणाच्या छटा या सिनेमांनी आपल्याला दाखवल्या.
रोहित शेट्टी हा एक असाच निर्माता दिग्दर्शक आहे ज्याने ‘पोलिस स्टोरीज’ जशा की ‘सिंघम, सिंघम रिटर्न्स, सिंबा आणि नुकताच प्रदर्शित झालेला सूर्यवंशी’ यांच्या माध्यमातून या पोलिसांचे भावविश्व तमाम पब्लिक पुढे उलगडले आहे.
या चित्रपटांच्या आधीही काही चित्रपट प्रदर्शित आणि यशस्वी झाले होते जे असेच ‘पोलिस स्टोरी’ होते. त्यातील काही चित्रपटांनी पोलिसांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन काही प्रमाणात बदलला आणि पोलिसातील माणूस आपल्याला दाखवला. या लेखातून आपण अशाच काही चित्रपटांची झलक पाहणार आहोत. चला तर मग पाहूया एक झलक.
सूर्यवंशी किंवा सिंघम यांसारख्या कॉप-एज-प्रोटागोनिस्ट थीम असलेल्या कथा हिन्दी सिनेमात याआधी फारशा वापरल्या गेल्या नव्हत्या. व्ही. शांताराम यांचे ‘आदमी व दो आंखे बारह हाथ’ हे चित्रपट किंवा देव आनंद यांचा ‘CID’चित्रपट असो, यात केवळ दुष्ट आणि सुष्ट असा सरळ सामना दाखवला गेला होता. यात खरा बदल घडत गेला दीवार, अंधा कानून आणि सुपरडूपर हिट झालेला अंग्री यंग मॅन अमिताभ बच्चन याचा ‘जंजीर’ ! यानंतरच हिंदी सिनेमाला पोलीस स्टोरी गवसली. त्यातीलच काही चित्रपट तुमच्या माहितीसाठी…
–
१. जंजीर ( १९७३ ) :
हा बहुधा मुख्य प्रवाहातील पहिला हिंदी चित्रपट होता जिथे नायक खाकी वर्दीमध्ये दिसला होता. सेठ धरम दयाल तेजा (अजित) आणि त्याच्या बदमाशांच्या टोळीच्या विरोधात दाखवलेल्या या नायकाने कोणतीही ‘सुपर पॉवर’ न वापरता आपल्या सामान्यपणातले असामान्यत्व दाखवले होते.
लहानपणी आईवडिलांच्या झालेल्या मृत्युचा बदला घेण्यासाठी एक तरुण पोलिस बनतो आणि वाटेतले सगळे अडथळे धैर्याने बाजूला करत आपल्या आई वडिलांच्या मृत्युचा बदला घेतो. त्या काळात या चित्रपटाचे संवाद आणि कथा यांनी प्रेक्षकांवर जादू केली होती. प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने सिनेमाच्या नायकाला ‘एंग्रि यंग मॅन’ चे कोंदण दिले जे पुढे येणार्या चित्रपटांसाठी एक आदर्श ठरले.
२. अर्धसत्य ( १९८३ ) :
चित्रपटांच्या आभासी जगापेक्षा वास्तवाच्या जवळ जाणारा नायक आणि त्याची व्यवस्थेविरुद्धची लढाई दाखवणारा गोविंद निहलानी यांचा ‘अर्धसत्य’ हा चित्रपट एक क्लासिक मेकिंग आहे.
या चित्रपतातील नायक हा पोलिस असला तरी त्या पत्राला काही नकारात्मक छटांनी सजवले गेले आहे. ओम पुरी या अभिनेत्याने हे पात्र बखुबी उभे केले आहे. छळलेल्या बालपणाच्या जखमा तो वागवतो, त्याला गुन्हेगारी आणि गुन्हेगारांबद्दल स्पष्ट तिरस्कार आहे आणि तो त्याच्या तत्त्वांशी तडजोड करण्यास तयार नाही. तो एका सेकंदात रागाच्या भरात हिंसक होतो, परंतु दुसर्या क्षणी तो कमालीचा असुरक्षित आणि असहाय्य असल्याचे दाखवले जाते. पोलिस खात्यातील वास्तविकता या चित्रपटाने प्रेक्षकांसमोर उभी केली होती.
३. तेजस्विनी ( १९९४ ) :
१९९४ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट मैलाचा दगड ठरला होता. अंधा कानून आणि फूल बने अंगारे अशा महिला पोलिस अधिकार्यांवर आधारित कथा तेजस्विनीची अजिबात नव्हती. तेजस्विनी (विजयाशांती) ठरवून अन्याय आणि गुन्हेगारीचा अंत करण्यासाठी पोलिस अधिकारी बनते. पोलिस सेवेच्या ब्रीदवाक्यासह, तेजस्विनी जुगाराच्या अड्ड्यात शिरते, मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जप्त करते, मालिका बलात्कार करणाऱ्यांना पकडते आणि शेवटी शत्रू लाला खुराना (अमरीश पुरी) ला त्याच्या वाईट कृत्यांसाठी शिक्षा ही देते.
महिला पोलिस अधिकार्याचे मानसिक खंबीर पात्र विजयाशांती ने या सिनेमात रंगवले आहे. ती महिला किंवा पुरुष कोणीही असो कायदा सर्वांना समान आहे हे दाखवून देते. एन. चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट वेगळ्या कथानकामुळे लक्षात राहतो.
४. यशवंत ( १९९७ ) :
यशवंतची भूमिका अक्षरश: जगलेल्या आणि नाना पाटेकर यांच्या अभिनयाने सजलेल्या या उत्कृष्ट चित्रपटाशिवाय कोणत्याही पोलिस चित्रपटांची यादी पूर्ण होणार नाही. हा चित्रपट म्हणजे सतत सात्विक संताप होणार्या एका प्रामाणिक पोलिस अधिकार्याची कथा आहे, तो एक कट्टर पोलीस आहे आणि कधीही गुंडांना सहजासहजी सोडत नाही.
यशवंतने आपले अनेक फॅन फॉलोअर कमावले आणि यशवंतचे डायलॉग आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. नाना पटेकर यांच्या काही अजरामर भूमिकांपैकी एक म्हणजे ‘यशवंत’ होय.
५. शूल ( १९९९ ) :
जंजीर मधील अमिताभ प्रमाणे ‘शूल’ मध्ये मनोज वाजपेयी यांनी साकारलेला पोलिस अधिकारी तेवढाच तडफदार होता. गावातील स्थानिक आमदार आणि त्याच्या गुंडांना न घाबरता त्यांना कायद्यानुसार वागायला लावणे आणि तिथे सर्वत्र कायदा व सुव्यवस्था स्थापन करणे हेच त्याचे ध्येय असते. असे करताना आपल्या वरीष्ठाची आज्ञा मोडावी लागली तरी तो ती मोडतो.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सहजसुंदर अभिनयाने मनोज वाजपेयी यांनी प्रेक्षकांना रोमांचित केले आहे. एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी कसा असावा याचा वस्तूपाठ वाजपेयी आपल्या अभिनयातून उभा करतात.
६. सरफरोश ( १९९९ ) :
स्थानिक गुंडांशी लढता लढता डायरेक्ट आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटाशी पंगा घेणारा एसीपी अजय राठोड या चित्रपटात आमिर खान याने साकारला आहे. देशभक्तीची भावना जात, धर्म, पंथ यांच्या पलिकडची असते. हे या चित्रपटातून दाखवले गेले.
साध्या गरीब आदिवासींना वेठीस धरून त्यांच्याकडून घातपाती कारवाया करून घेणारे शत्रू देशाचे छुपे एजंट आणि त्यांना मदत करणारे नेते व सो कॉल्ड पेज थ्री कल्चरवले यांचेही चित्रण या सिनेमातून दिसून आले. एरवी अजिबात पोलिस अधिकारी म्हणून न शोभणारा आमिर यात एक शिस्तशीर, प्रभावी पोलिस अधिकार्याच्या रूपात प्रभाव टाकण्यात यशस्वी झाला आहे.
७. मिशन काश्मीर (२०००) :
इलाका (१९८९), कुरुक्षेत्र (२०००), दस (२००५), एकलव्य: द रॉयल गार्ड (२००७) आणि जिला गाझियाबाद (२०१३) यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये संजय दत्तने खाकी वर्दी घातली आहे. पण विधू विनोद चोप्राच्या मिशन कश्मीर (२०००) मध्ये त्याने साकारलेली पोलिसाची भूमिका खरोखरच वेगळी होती. भावना आणि कर्तव्य यातील कसरत संजय दत्त यांनी प्रभावीपणे दाखवली आहे.
आपला देश की आपला मुलगा? ( दत्तक ) या प्रश्नात अडकलेला पोलिस अधिकारी आणि आपल्या मुलाला समजावणारा आणि देशविरोधी कारवाया करण्यापासून रोखणारा बाप दत्त यांनी कसदारपणे साकारला आहे. ह्रितिक, जॅकी श्रॉफ, संजय दत्त यांच्या अभिनयाची जुगलबंदी या सिनेमात पाहायला मिळते.
–
- मुंबई पोलीस ‘सब इन्स्पेक्टर’ असा बनला पडद्यावरचा, “जानी ऽऽऽ”
- तुमच्याविरुद्ध खोटा FIR दाखल झाला तर काय कराल? घाबरण्यापेक्षा हे वाचा…
–
८. गंगाजल ( २००३ ) :
प्रकाश झा दिग्दर्शित आणि अजय देवगण अभिनीत चित्रपट गंगाजल हा एक उत्कृष्ट सिनेमा आहे. आज ही या सिनेमाचे अनेक चाहते आहेत. हा सिनेमा म्हणजे सो कॉल्ड समाजव्यवस्थेवर घातलेला घणाघाती घाव आहे. पोलिसातील माणूसपणाची कथा मांडताना पोखरलेला समाज आणि कायद्यातील पळवाटा यांच्या मदतीने समाजातील वाईट प्रवृत्ती कशा डोईजड होतात आणि मग चेतलेल्या एका ठिणगीने पेटून उठलेला समाजच या प्रवृत्तींना कसं संपावतो याचे चित्रण या सिनेमात आले आहे. अतिशय क्लासिक असा हा सिनेमा आवर्जून पाहावा असा आहे.
९. अब तक छप्पन ( २००४ ) :
पोलीस आणि अंडरवल्ड यांच्यातले धागेदोरे, पोलीस खात्यातील राजकरण यावर बेतलेला अब तर्क छप्पन आजही अनेकांच्या पसंतीचा आहे, यात नाना पाटेकरांनी केलेला एन्काऊंटर स्पेशालिस्ट साधू आगाशे आजही अनेकांच्या लक्षात आहे.
१०. मर्दानी ( २०१४ ) :
प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात ‘ह्यूमन ट्रैफिकिंग’ हा विषय हाताळण्यात आला होता. जो एक ज्वलंत विषय होता. राणी मुखर्जी हिने या सिनेमात एका तडफदार पोलिस अधिकार्याची भूमिका निभावली होती जी आपल्या वैयक्तिक जीवनाला आपल्या कर्तव्याच्या आड कधीच येवू देत नाही. प्रदीप सरकार यांची कथा सांगण्याची हातोटी आणि राणी मुखर्जीचा अभिनय यांमुळे हा सिनेमा मस्ट वॉच असा झाला आहे.
याखेरीज तलाश, आर्टिकल 15, मोहरा, कर्मा, खाकी, आन-मेन अँट वर्क यांसारखे पोलिसी चित्रपट देखील पहावेत असे आहेत. रोहित शेट्टीचा सूर्यवंशी हा कॉप-एज-प्रोटागोनिस्ट टाईपचा सिनेमा आला मात्र आधीचे पोलीस स्टोरी सांगणारे काही सिनेमे नक्की पहावेत असेच आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.