सरकार – NDTV युद्धाचा पुढचा अध्याय सुरू झालाय का?
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
NDTV आणि भारतीय जनता पार्टी यांमधील खडागंजी आपल्यासाठी काही नवीन नाही. भाजपा सरकार विरोधात आणि पक्षा विरोधात वारंवार बातम्या देण्यामुळे आणि काही कॉंग्रेस नेत्यांचे NDTV शी असलेल्या संबंधामुळे बहुतेकांचे हेच मत दिसून येते की NDTV ही एकपक्षी असून भाजपा विरोधी आहे. आता मध्यंतरीचं उदाहरण घ्या, NDTV ने उरी हल्ल्याचं काही फुटेज थेट आपल्या वाहिनीवर प्रसारित करून वाद ओढवून घेतला होता. तेव्हा असं कृत्य म्हणजे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणार आहे असा पवित्र घेऊन भाजप सरकारने NDTV वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रकरणाच्या वेळी देखील NDTV आणि भारतीय जनता पार्टी मधील वाद चव्हाट्यावर आला. दोन्हींकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. ते प्रकरण निवळून अजूनही जास्त काळ लोटला नाही तर आता पुन्हा एकदा NDTV आणि भाजपामधील नव्या युद्धाला तोंड फुटले आहे. याला निमित्त ठरलेत – सीबीआयने NDTV चे सहसंस्थापक प्रनोय रॉय यांच्या घरावर टाकलेले छापे!
सीबीआयने येथवर न थांबता प्रनोय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांच्या विरोधात बँक फ्रॉडची केस दाखल केली आहे. आयसीआयसीआय बँकेला झालेल्या ४८ करोड रुपयांच्या तोट्यामध्ये प्रनोय रॉय, त्यांची पत्नी राधिका रॉय आणि इतर सहकाऱ्यांचा हात असल्याचा समावेश सीबीआयला आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी ही पाऊले उचलल्याचे सांगितले गेले.
ही घटना घडल्या घडल्या लगेच NDTV ने खोट्या आरोपांखाली प्रनोय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांना गोवण्यात येत असल्याचे सांगून आम्हाला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे जाहीर केले आणि अप्रत्यक्षरित्या भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. या मानहानीकारक कृत्याविरोधात आपण कायदेशीर लढाई लढून या मागे असणाऱ्या व्यक्तींना धडा शिकवू असा थेट इशारा NDTV तर्फे देण्यात आला आहे.
Business Standard चे प्रसिद्ध स्तंभकार अजय शुक्ला यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध करत यामागे केंद्रशासित भाजपा सरकार असल्याचे म्हटले आहे.
NDTV च्या अँकर आणि पत्रकार निधी राझदान यांनी देखील ही घटना म्हणजे मिडीयाच्या स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे म्हटले आहे.
The Indian Express चे संपादक प्रवीण स्वामी यांनी देखील प्रनोय रॉय यांना पाठींबा देत सदर घटना चुकीची असल्याचे मत मांडले.
अश्याच प्रकारे NDTV समर्थक आणि पत्रकार क्षेत्रातील इतर बड्या प्रसिद्ध व्यक्तींनी ही घटना म्हणजे हुकुमशाही असल्याचे म्हणत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजप सरकारलाच लक्ष्य केले आहे.
तर दुसऱ्या बाजूला भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मात्र सीबीआयच्या छापेमारीला समर्थन दिले आहे. त्यांनी सांगितले की, “कायद्याची भीती असणे गरजेचे आहे, आणि तुम्ही कोणी का असेना कायदा हा सर्वांसाठी समान आहे.”
तर अश्याप्रकारे NDTV विरुद्ध भाजप या युद्धाचे रणशिंग पुन्हा एकदा फुंकले गेले असून येणाऱ्या काळात या युद्धाचे चांगलेच पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi