आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पुणे तेथे काय उणे असे आपण नेहमी म्हणतो. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखली जाणारी ही पुण्यनगरी अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याचे चितळे, खोचक पुणेरी पाट्या, पुण्यातील ऐतिहासिक वास्तू , पुणेकरांची १ ते ४ वामकुक्षी अश्या अनेक गोष्टींसाठी पुणे प्रसिद्ध आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
बाहेरून पुण्यात येणाऱ्या लोकांना आणखी एका गोष्टीची गंमत वाटते ती म्हणजे ‘मोदी मारुती, भिकारदास मारुती, सोन्या मारुती, खुन्या मुरलीधर या नावांची! या अशा विचित्र नावांची देवळे पुण्यात आहेत. पुण्याबाहेरच्यांना या नावांना नेमका काय इतिहास आहे याची नक्कीच उत्सुकता वाटते.
खरं म्हणजे ऐतिहासिक काळापासून पुण्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुण्याला अनन्यसाधारण महत्व मिळाले आहे. ऐतिहासिक काळापासून याठिकाणी माणसांची वस्ती असल्यामुळे पुण्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
पेशव्यांच्या काळापासूनच पुण्यात अनेक देवळांची स्थापना करण्यात आली. पेशव्यांनी पुण्यात गणपती, मारुती, विठोबा व श्रीकृष्ण ह्यांची देवळे स्थापन केली. ही देवळे आजही आपण बघू शकतो. आजूबाजूला काय आहे, तिथे पूर्वी काय घडले ह्यानुसार देवळांची नावे ठरली. त्यापैकी एक नाव म्हणजे ‘खुन्या मुरलीधर’ होय.
सदाशिव पेठेत पुणे विद्यार्थी गृहाच्या जवळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या चौकातच असलेल्या खुन्या मुरलीधर या देवळाबाबतीत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. हे देऊळ १७९७ साली उत्तर पेशवाईत रघुनाथ सदाशिव उर्फ नाना गद्रे ह्यांनी स्थापन केले आहे. या मंदिरात गेलो की १२३६ सदाशिव पेठ, पुणे ४११०१० ही पाटी दिसते आणि रेखीव चिरेबंदी दिंडी आपल्या नजरेत भरते.
मंदिराचे बांधकाम खूप जुने असल्यामुळे काळाच्या ओघात बरीच पडझड झालेली आहे. तरीही मंदिर टिकवून ठेवण्यासाठी देवळाला अनेक टेकू दिलेले आहेत. मंदिरात शिरल्यावर चौकाच्या डावीकडे बघितल्यास मुख्य मंदिर दिसते. दगडी चिरेबंदी बांधकाम, जुन्या पद्धतीचे चुन्याचे शिखर आणि प्रशस्त लाकडी सभामंडप हे आपल्याला इतिहासात घेऊन जातात.
मंदिराचा गाभारा काळ्या पाषाणातून तयार करण्यात आला आहे. देवळात स्थापन केलेल्या श्रीकृष्ण आणि राधा यांच्या संगमरवरी मूर्तींचे मनमोहक रूप बघत राहावे असे आहे. देवळाच्या बांधकामाला शेकडो वर्षे झाली तरीही सुरुच्या लाकडाचे रेखीव खांब व कमानी ह्यामुळे आजही देवळाची शोभा वाढते इतके ते विलोभनीय आहे. देवळात अनेक पेशवेकालीन चित्र देखील बघायला मिळतात.
ज्यावेळी हे देऊळ बांधले तेव्हा बाजीराव दुसरे हे पेशवाईच्या गादीवर होते. दुसऱ्या बाजीरावांचे बालपण हे नजरकैदेत गेले असल्याने त्यांना नजरकैदेत टाकणाऱ्यांवर त्यांचा राग होता. सवाई माधवरावांचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याने वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी दुसऱ्या बाजीरावांवर पेशवेपदाची जबाबदारी आली.
—
- … आणि पुण्याच्या रस्त्यावर दिसली ‘चेटकीण’! दिलीप प्रभावळकरांचा धमाल किस्सा
- पुण्यातील १७ पेठा, प्रत्येक नावामागचा स्वतंत्र इतिहास माहित करून घ्यायलाच हवा!
—
गादीवर येताच त्यांनी त्यांच्या वडिलांना म्हणजेच राघोबादादांना नजरकैदेत ठेवणाऱ्या सर्व सरदारांविरुद्ध कारवाई करून त्यांना शिक्षा देण्यास सुरुवात केली.
पेशवाईच्या काळात सावकार हे पेशव्यांना सर्व मोहिमांसाठी आर्थिक मदत पुरवत असत. त्यामुळे पेशवे व सावकार यांच्यात चांगले संबंध होते. यामागे अनेक आर्थिक व राजकीय कारणे होती. नाना गद्रे हे सुद्धा पेशव्यांच्या जवळ असलेले सावकर होते. त्यांचे व नाना फडणवीस ह्यांचे चांगले संबंध होते, पण दुसऱ्या बाजीरावांचा मात्र नाना फडणवीसांवर राग होता आणि त्यामुळेच नाना गद्रेंबद्दलही पेशव्यांच्या मनात आकस होता.
नाना गद्रेंना एक दृष्टांत झाल्यामुळे त्यांनी श्रीकृष्णाचे देऊळ बांधण्याचा निर्णय घेतला. सदाशिव पेठेत असलेल्या त्यांच्या मालकीच्या जागेत त्यांनी श्रीकृष्णाचे मंदिर बांधण्याचे ठरवले.
मूर्ती घडवणे, देवळाचे बांधकाम अशी सगळी कामे सुरु झाली तेव्हा हे दुसऱ्या बाजीरावांच्या कानावर गेले. त्यांनी देवळातील मूर्ती आवडल्यामुळे ती देण्याची मागणी गद्रेंकडे केली. तेव्हा पेचात सापडलेल्या गद्रेंनी पेशव्यांना तशाच दुसऱ्या मूर्ती बनवून घेण्याचे सुचवले, पण दुसऱ्या बाजीरावांनी त्याच मूर्तींची मागणी केली.
सत्तेपुढे कुणाचे काही चालत नाही हे जाणून घेऊन गद्रेंनी देवळात प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढण्यासाठी आलेल्या त्र्यंबकेश्वरातील विद्वान नारायण भट खरे यांच्यापुढे ही समस्या मांडली. तेव्हा खरेंनी रातोरात देवळात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून घेण्याचा सल्ला गद्रेंना दिला.
मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा कार्यक्रम सुरु झाला. हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून गद्रेंच्या पदरी असलेले गारदी देवळाच्या बाहेर पहाऱ्यासाठी उभे राहिले, पण ही बातमी दुसऱ्या बाजीरावांपर्यंत पोचण्यास किती वेळ लागणार होता?
दुसऱ्या बाजीरावांनी चिडून त्यावेळी पुण्यात असलेल्या ब्रिटिश फौजेची मदत घेतली आणि देवळात सैन्य घुसवले.
नाना गद्रेंच्या सैन्याने ब्रिटिश सैन्याला विरोध केला. या धुमश्चक्रीत जवळजवळ ५० ते १०० सैनिकांचा मृत्यू झाला. देवळात जणू रक्ताचा अभिषेक झाला. तेव्हापासून ह्या देवळाला खुन्या मुरलीधर असे नाव पडले असे म्हणतात.
या देवळाबाबतीत प्रचलित असलेली दुसरी आख्यायिका क्रांतिकारक चापेकर बंधूंशी निगडित आहे. त्या आधी आद्य क्रांतिकारण वासुदेव बळवंत फडके हेदेखील याच देवळाच्या आवारात त्यांच्या गुप्त बैठका घेत असत.
खुन्या मुरलीधराच्या जवळच नृसिंह मंदिर आहे. या दोन्ही देवळांच्या मधील मोकळ्या आवारात फडके आणि त्यांचे साथीदार रात्री टेंभे पेटवून कवायती करत असत.
१८९७ साली चापेकर बंधूंनी क्रूर ब्रिटिश अधिकारी रँड याच्या वधाचा कट याच देवळाच्या आवारात केला अशी आख्यायिका आहे.
खुन्या मुरलीधराच्या समोरच पूर्वी एक महादेवाचे मंदिर देखील होते. त्या मंदिराचे व्यवस्थापन बघणाऱ्या द्रविडांचे खुन्या मुरलीधर मंदिरात सुद्धा येणे जाणे होते. त्यामुळे चापेकरांच्या कटाची त्यांना कल्पना होती. त्यांनीच चापेकरांबद्दल ब्रिटिशांना सांगितले आणि त्यामुळे चापेकर बंधूंना अटक झाली आणि मग त्यांना फाशी झाली.
त्यांनी जर ब्रिटिशांना सांगितले नसते तर चापेकर बंधू पकडले गेलेच नसते. म्हणूनच चापेकरांच्या दुसऱ्या भावाने याच खुन्या मुरलीधर मंदिराच्या परिसरात द्रविडांना गाठून त्यांना जीवे मारले. म्हणून देखील या देवळाला खुन्या मुरलीधर असे नाव पडले असे म्हणतात.
तर असा हा खुन्या मुरलीधर मंदिराच्या नावाच्या मागचा इतिहास म्हणा किंवा आख्यायिका म्हणा! पेशवाईतील वास्तुकलेचा नमुना म्हणून आणि हेरिटेज साईट म्हणून पुण्यात गेल्यास एकदा तरी या खुन्या मुरलीधराचे दर्शन नक्कीच घ्यायला हवे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.