आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
प्रत्येक सणाशी कोणती ना कोणती परंपरा जोडलेली असते. या परंपरेचे काही चांगले पैलू असतात तर काही वाईट पैलू असतात. दिवाळीत जुगार खेळणेही याच परंपरेचा वाईट पैलू आहे. दिवाळीमध्ये भगवान शंकर आणि पार्वती देवी जुगार खेळले होते असे म्हटले जाते तेव्हापासून ही परंपरा या सणाशी जोडली गेली आहे. परंतु भगवान शंकर आणि पार्वती देवीने जुगार खेळल्याचा कोणताही पक्का पुरावा कोणत्याही ग्रंथामध्ये नाही आहे.
जुगार एक असा खेळ आहे ज्यामुळे माणसेच काय तर देवसुद्धा कितीतरी वेळा संकटात सापडले होते. जुगार हा समाजासाठी हानिकारक मानला गेला आहे, तरीही आजही लोकांची त्याचाविषयीची ओढ कमी झालेली नाही. पैसे लावून पत्ते खेळणे भारतात नवीन नाही आहे, पण काळानुसार त्या मध्ये वेगवेगळे बदल झाले आहेत. जुगार आज पण खेळला जातो आणि पूर्वीही खेळला जाई. आज आपण काळानुसार जुगारांमध्ये झालेल्या बदलांबद्दल जाणून घेणार आहोत.
राजा नलने आपले सर्वकाही गमावले होते.
महाभारतामध्ये राजा नल आणि दमयंतीची गोष्ट येते. दोघांमध्ये खूप प्रेम होते .नल चक्रवर्ती सम्राट होते. एकदा ते नातेवाईकांसोबत जुगार खेळण्यास बसले. सोन्याच्या मोहोरांवर डाव लावले गेले. राजा नलचे नातेवाईक कपटी होते. त्यांनी राजा नलकडून सर्व खजाना, राजपाट, राजवाडा, सैन्य सर्वकाही जिंकून घेतले. राजा नलची परिस्थिती अशी झाली होती की, त्यांना स्वतःचे अंग झाकण्यासाठीही कपडेही उरले नाहीत. जुगारामुळे पूर्ण जगात ओळखला जाणारा राजा रंक बनला, नंतर त्यांना आपले साम्राज्य पुन्हा मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले.
बलरामसुद्धा हरले होते जुगारात
श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या पुत्राचा विवाह रुक्मिणीचा भाऊ रुक्मीच्या मुलीशी झाला होता. हा तोच रुक्मी ज्याला श्रीकृष्णाने रुक्मिणी हरणावेळी युद्धामध्ये हरवले होते आणि कुरूप करून सोडले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी रुक्मीने बलरामाला जुगार खेळण्याचे आमंत्रण दिले. बलरामांचा स्वभाव शांत असल्याने त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला, परंतु रुक्मीने कपटाने त्यांना हरवले व भर मंडपात त्यांचा अपमान केला. त्यामुळे बलराम खूप क्रोधीत झाले आणि त्यांनी रुक्मीचा वध केला. त्यामुळे पूर्ण लग्न मंडपात हाहाकार माजला. ह्यामुळे एक लक्षात येते की चांगल्या कार्यात सुद्धा जुगरामुळे वाईट घडू शकते.
कसे बदलत गेले जुगाराचे स्वरूप???
चौरस
सर्वात पहिल्यांदा दगड आणि लाकडाच्या गोटीने चौरस खेळले जायचे. याला चौरस हे नाव त्याच्या आकारामुळे पडले. हा चार भागांचा होता आणि त्यात १६ रकाने होते. अशाप्रकारे सर्व मिळून ६४ रकाने संपूर्ण चौरसात होते. पहिल्या काळात याला फक्त मनोरंजनासाठी खेळले जाई. याच्यासाठी सफेद रंगाचे फासे बनवले जात आणि त्यात एक ते सहा अंक लिहिले जात असत.
चौपड
चौरसचाच दुसरा भाग चौपड होता. यामध्ये कपड्यावर ६४ रकाने बनवून खेळले जाई. लाकडाच्या कवड्या आणि लाकडाचाच घन या खेळात वापरले जाऊ लागले. यामध्येच पहिल्यांदा गाई, धान्य, सोन्याची मोहरे डावावर लावली जाऊ लागली.
जुगाराचे दूत
कालांतराने चौपड हा प्रकार बंद झाला, नंतर ४८ रकान्याचा नवीन खेळ सुरु झाला यामध्ये लोक सरळ-सरळ प्रत्येक डावावर आपली संपत्ती लावू लागले. ह्यावेळी हा खेळ घरापर्यंत मर्यादित राहिला नसून तो बाजारात आला होता. बाजारात विविध प्रकारची राजाज्ञा असलेली जुगारांची दुकाने चालवण्यात येऊ लागली. या ठिकाणी जुगार घराचे मालक दोन लोकांना कमिशनवर जुगार खेळण्यासाठी धन आणि जागा उपलब्ध करून देत असत. यांना आपण जगातील पहिले कॅसिनो म्हणून शकतो.
पत्त्यांचा जुगार
आता पत्त्यांचा जुगार खेळला जातो. कितीतरी भागांमध्ये दिवाळीच्या रात्री जुगार खेळला जातो. ह्याला काही लोक शुभ आणि लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत मानतात, परंतु धर्मग्रंथांमध्ये सांगितले गेले आही की जुगार एक व्यसन आहे आणि तिथे लक्ष्मी राहत नाही.
असा आहे हा जुगाराचा प्रवास!!!
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi