' उरलेलं वरण- ताक, अंड्याची टरफलं टाकाऊ नाहीत, झाडांसाठी करा ‘असा’ उपयोग – InMarathi

उरलेलं वरण- ताक, अंड्याची टरफलं टाकाऊ नाहीत, झाडांसाठी करा ‘असा’ उपयोग

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बागकामाची आवड असते. बागकामाची आवड असलेले लोक त्यांच्या झाडांची अगदी बाळाप्रमाणे काळजी घेतात. आपल्या घरात एखाद दुसरे झाड असतेच.

अंगण असले, की बागकामाची आवड अगदी मनापासून जोपासता येते, पण जरी आपण फ्लॅटमध्ये राहत असलो तरीही खिडकीजवळच्या लहानश्या जागेत, बाल्कनीमध्ये आपण एखाद दुसरी कुंडी ठेवतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बागकाम केल्याचे मुख्य फायदे म्हणजे झाडांमुळे तुमच्या घरातील व आजूबाजूची हवा शुद्ध राहण्यास मदत होते. बागकाम केल्याने मनावरील ताणतणाव कमी होतो.

 

basil plant inmarathi2

 

 

बागकाम केल्याने कचरा व्यवस्थापन करण्यास देखील मदत होते. एरवी आपल्याला कचरा व्यवस्थापनाची काहीही माहिती नसते, पण जर तुम्ही ओला कचरा घरीच साठवून त्याचे खत तयार केले, तर झाडांना त्याचा फायदा होईलच, शिवाय तुम्ही पर्यावरणाचे रक्षण करण्याचे पुण्य देखील कमवाल.

स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्याचा वापर करून आपण घरच्या घरी झाडांना आवश्यक ते पोषण देऊ शकतो. नियमितपणे तुम्ही हे खत झाडांना घातले तर तुमची झाडे नक्कीच टवटवीत व निरोगी राहतील. चला तर मग बघूया स्वयंपाकघरातील कुठले पदार्थ आपण झाडांना घालू शकतो.

अंड्यांची टरफले

 

eggshell inmarathi

 

आपण अंडी कुठल्याही स्वरूपात खाल्ली तरी त्यांची टरफले कचऱ्यात टाकून देतो, पण अंड्यांच्या टरफलांमध्ये कॅल्शियम असते. त्यामुळे झाडांसाठी अंड्यांची टरफले ही कॅल्शियमचा चांगला स्रोत ठरू शकतात. झाडांच्या उत्तम व निरोगी वाढीसाठी कॅल्शियम खूप आवश्यक आहे.

ही टरफले झाडांना घालण्याची एक पद्धत आहे. प्रथम अंड्यांची टरफले गोळा करून त्यांची मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक पूड करून घ्या. ही पूड सगळ्या झाडांच्या मातीमध्ये किंवा कुंड्यांमध्ये मिसळा. याचे प्रमाण प्रत्येक झाडासाठी दोन चमचे असे ठेवा.

जर तुम्ही घरी कंपोस्ट खत तयार करत असाल तर ही पावडर कंपोस्ट मध्ये देखील वापरता येईल.

ताक

 

buttermilk InMarathi

 

बऱ्याचदा दही खूप आंबट होते त्यामुळे त्याचे ताक आंबट व कडवट चवीचे होते जे आपण पिण्यास योग्य राहत नाही. हे ताक आपण कुठल्या पदार्थात वापरले तर त्या पदार्थाची चव बिघडते. असे ताक टाकून देण्यापेक्षा ते जर झाडांना दिले तर त्याचा झाडांना खूप फायदा होऊ शकतो.

आपण जसे ताक पितो तसेच जर ते कुंडीत ओतले तर त्याने झाड खराब होते. त्यामुळे ते तसे न टाकता त्यात दीडपट पाणी घालून मग ते पाणी झाडांना घातले तर झाडाला त्याचा फायदा होईल.

ताक व पाण्याचे मिश्रण झाडाला घातल्यानंतर झाडाची माती खुरपणीने थोडी उकरून घ्या. यामुळे झाडाची चांगली वाढ होण्यास मदत होते.

उरलेले वरण

 

dal inmarathi

 

आपल्याकडे अंदाज चुकला की काही वेळा नुसतेच वरण उरते. अशावेळेला उरलेले वरण टाकून देण्यात येते, पण ते टाकून न देता झाडांना दिले तर झाड तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल.

आपल्याला जसे वरणातून पौष्टिक घटक मिळतात तसेच झाडांना देखील पौष्टिक घटकांची गरज असते. ते पौष्टिक घटक त्यांना वरणातून मिळू शकतात. जेवढे वरण आहे त्यापेक्षा दुप्पट पाणी त्यात घाला आणि हे मिश्रण झाडांना घाला.

हे मिश्रण झाडांना घातल्यानंतर झाडांच्या मुळाशी असलेली माती थोडी उकरा. ह्यामुळे झाडांची चांगली वाढ होईल.

कांद्याची टरफले

 

onion peels inmarathi

 

कांदा जवळपास प्रत्येकच घरात खाल्ला जातो. कांद्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅंगनीज असे अनेक पौष्टीक घटक असतात. हे सगळे घटक झाडांच्या वाढीसाठी देखील आवश्यक असतात.

कांदा चिरल्यानंतर त्याची टरफले व साल बाजूला काढून ते एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. जर एखादा कांदा काळा पडला असेल तर तो ही फेकून न देता झाडांसाठी वापरता येतो.

कांद्याची सालं, टरफलं किंवा काळा पडलेला कांदा एका हवाबंद डब्यात भरा आणि या डब्यात पाणी भरा. दोन ते तीन दिवस तो डबा तसाच झाकून ठेवा.

दोन-तीन दिवसांत कांद्याच्या सालीतील पोषक घटक पाण्यात मिसळतात. त्यानंतर ते पाणी गाळून घेऊन त्यात तेवढेच पाणी मिसळा आणि हे पाणी थोडे थोडे झाडांच्या मुळाशी घाला. यामुळे झाडांची अगदी भरभरून वाढ होण्यास मदत होईल.

नारळाचे पाणी

 

coconut inmarathi

 

नारळपाणी जसे आपल्यासाठी अमृत आहे तसेच ते झाडांसाठी देखील चांगले आहे. नारळाच्या पाण्यात भरपूर खनिजे व पोषक घटक असतात. हे पोषक घटक झाडांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये (मायक्रोन्यूट्रिअन्टस) म्हणून काम करू शकतात, कारण बऱ्याचदा कुंडीच्या मातीत ते आढळत नाहीत.

नारळाचे पाणी झाडांसाठी एक उत्कृष्ट टॉनिक आहे. ५ लिटर पाण्यात १०० मिली हे प्रमाण वापरून नारळपाण्याचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण झाडांवर मधून मधून शिंपडा. सर्व प्रकारची फुलझाडे, शोभेची झाडे, पालेभाज्या व फळभाज्या ह्या झाडांसाठी तुम्ही हे टॉनिक वापरू शकता.

याशिवाय ऍस्पिरिनच्या गोळ्या, मॅग्नेशियम सल्फेट (एप्सम सॉल्ट), मध या पदार्थांचा वापर देखील आपण झाडांच्या निरोगी वाढीसाठी करू शकतो.

झाडांची काळजी घेण्यासाठी बाजारच्या वस्तूंची गरज नाही. आपल्या घरगुती स्वयंपाकघरातील वस्तू वापरून सुद्धा आपण आपल्या झाडांची चांगली काळजी घेऊ शकतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?