साऊथ आफ्रिकेतील संशोधकांनी ओमिक्रोन व्हायरस शोधला कसा?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
२०२० साली एक संकट जगाच्या दिशेने घोंगावत आलं आणि सगळीच उलथापालथ झाली. ‘न भूतो न भविष्यति’ अशा या संकटाशी दोन हात करण्याचे प्रयत्न सर्वच स्तरावर झाले. आधी टेस्ट मग व्हॅक्सीन अशा वेगवेगळ्या पर्यायांनी कोरोनाला हरवण्याचे प्रयत्न काहीसे यशस्वी होत असल्याची जाणीव मागील काही महिन्यांपासून झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सारं काही आलबेल होईल या नव्या आशेसह २०२२ सालाची सुरुवात करण्याची तयारी सुरु झाली मात्र मध्येच माशी शिंकली आणि पुन्हा परिस्थिती जास्त बिकट झाली.
साऊथ आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जग जास्त धास्तावले, बंधनं अधिक कडक झाली आणि अनिश्चिततेत वाढ झाली.
मात्र हा ओमिक्रॉन नेमका कुणाला आणि कसा सापडला? हा नवा व्हेरियंट असून जास्त घातक आहे याचा पहिल्यांदा सुगावा लागलाा कसा? ही बाब आजही अनेकांना ठाऊक नाही,
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
तो भयावह अनुभव
दिवस होता १९ नोव्हेंबरचा! साऊथ आफ्रिकेच्या एका नामांकित खाजगी लॅबमध्ये रकेल वियना या नेहमीप्रमाणेच कोरोनाच्या काही नमुन्यांचे परिक्षण करत होत्या. मागील दीड वर्षापासून याच कामाची त्यांच्यावर जबाबदारी असल्याने शिताफीने त्या काम करत होत्या.
मात्र एकामागून एक येणाऱ्या ८ नमुन्यांमध्ये त्यांना काहीतरी वेगळेपण जाणवले. कदाचित नजरचुकीने काहीतरी गोंधळ होत असावा असा अंदाज बांधत त्यांनी पुन्हा एकदा याचे नव्याने परिक्षण केले. मात्र पुन्हा त्यांना या ८ नमुन्यांमध्ये वेगळेच म्युटेशन जाणवले.
या नमुन्यांमध्ये स्पाईट प्रोटिन या घटकाचे प्रमाण अधिक असल्याने यामुळे विषाणुचा प्रसार जलद होण्याची भिती असते. नेमकी हीच भिती या काही नमुन्यांबाबत खरी ठरली आणि रकेल वियना यांना घाम फुटला.
कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून आजपर्यंत म्हणे दिड वर्षांच्या कालावधीत कधीही न पाहिलेले हे म्युटेशन आपण प्रत्यक्ष बघत आहोत. दुर्दैवाने ही बाब खरी असेल तर या ८ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अनेकांमध्ये याचा प्रसार सुरु झाला असेल, त्यामुळे याचे निदान होण्यापुर्वीच आफ्रिकेत या विषाणुच्या नव्या म्युटेशनचा फैलाव वाढला असणार या धास्तीने त्यांनी तातडीने जोहान्सबर्ग येथिल नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ कम्युनिकेबल डिजीज या संस्थेशी संपर्क साधला.
रकेल यांच्या या हुशारीमुळेच वेळीच ही बाब तज्ञांपर्यंत पोहोचली. ही माहिती ऐकून संस्थेतील तज्ञांनीही भिती व्यक्त केली. त्यांनी तातडीने हे नमुने जोहान्सबर्ग येथे मागण्याची व्यवस्था केली.
या ८ नमुन्यांवर जोहान्सबर्ग येथिल खास प्रयोगशाळेत अनेक चाचण्या करण्यात आल्या.
ही चुक तर नाही?..
या प्रकारचे भयावह म्युटेशन यापुर्वी कधीही पाहण्यात आले नव्हते. त्यामुळे कदाचित ही आपल्याच चाचणीतील चुक असावी असाही अंदाज तज्ञांनी बांधला. त्यामुळे वारंवार या नमुन्यांची चाचणी केली गेली. मात्र दुर्दैवाने प्रत्येक चाचणीत तोच निकाल येत राहिला.
या चाचण्या होईपर्यंत २४ नोव्हेंबरची सकाळ उजाडली होती. अखेर अनेक तज्ञांच्या प्रयत्नांची शिकस्त, प्रगत तंत्रज्ञान यांच्या निकषांवर कोरोनाचा हा नवा अवतार असल्याचे सिद्ध झाले.
तज्ञांची भिती खरी ठरली. साऊथ आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या आक्राळविक्राळ रुपाचा जन्म झाला होता. अर्थात तोपर्यंत साऊथ आफ्रिकेतील विविध भागांतून रुग्णसंख्या वाढणयाच्या केसेस समोर आल्याने झपाट्याने होणारी ही वाढ नव्या म्युटेशनमुळेच असल्यालाही पुरावा मिळाला.
अखेर २५ नोव्हेंबर रोजी साऊथ आफ्रिकेने या नव्या म्युटेशनची जगाला माहिती दिली आणि मग त्यानंतर प्रत्येक देशाचे धाबे दणाणले.
घातक नाही, पण सावधानता हवी
ज्या तज्ञांनी या नव्या प्रकाराचा सखोल अभ्यास केला त्यांनी सांगितले, की हा नवा प्रकार फोफावतोय, वेगाने पसरतोय, त्यामुळे रुग्णसंख्या वाढेल, मात्र तरिही त्याचा जीवाला धोका नाही.
नव्या लक्षणांचा विचार करता यात कोणतीही जीवघेणी लक्षणंही दिसत नाहीत. मात्र मास्क, सुरक्षित अंतर आणि मुख्य म्हणजे पूर्ण लसीकरण गरजेचे आहे. तसेच कोणतीही लक्षणं आढळल्यास दिरंगाई न करता चाचणी करून घ्या असा सल्लाही देण्यात आला आहे.
नव्या व्हेरियंटमुळे जगाने पुन्हा बंधनांचा फास आवळला आहे. त्यामुळे जगाची विस्कटलेली घडी पुन्हा कधी बसणार? हे येणारा काळच ठरवेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.