' बऱ्याचशा रोगांचा, साथीच्या आजारांचा उगम आफ्रिका खंडामध्येच का होतो? – InMarathi

बऱ्याचशा रोगांचा, साथीच्या आजारांचा उगम आफ्रिका खंडामध्येच का होतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या वर्षांत साथीच्या अनेक रोगांनी जगभरातील लोकांच्या तोंडचे पाणी पळवले. चिकुनगुनिया, सार्स, इबोला, एचवन एनवन स्वाईन फ्ल्यू आणि आता कोरोनाव्हायरसने जगभरात सगळीकडेच मृत्यूचे थैमान घातले.

दर वर्षी कुठला ना कुठला साथीचा आजार पसरतो. बऱ्याचदा तो आपल्या देशात पसरत नसेलही. पण आशिया आणि आफ्रिका खंडातच साथीच्या रोगांचे आजार प्रमाण खूप जास्त आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपण इतिहासात डोकावले तर आफ्रिकेत अनेक संसर्गजन्य रोग उदयास आले आहेत असे आपल्याला दिसून येते. त्यांपैकी काही रोग हे नव्याने शोधलेल्या सूक्ष्मजीवांशी संबंधित आहेत जसे की रिकेटसिया फेलिस आणि ट्रॉफेरीमा व्हिपली इत्यादी आणि इतर काही रोग आपल्याला ज्ञात आहेत.

 

sars virus inmarathi
NPR

 

काही ऐतिहासिक रोग म्हणजे प्लेग आणि कॉलरा ह्यांच्याही अनेकदा साथी पसरल्या होत्या.गेल्या काही वर्षांत इबोला विषाणू, झिका विषाणू आणि चिकुनगुनिया विषाणू ह्यांचाही उद्रेक झालेला आपण अनुभवला आहे. पण बऱ्याच साथीच्या रोगांचे मूळ आफ्रिकेतच का आढळून येते?

संसर्गजन्य रोगांचा सार्वजनिक आरोग्यावर मोठा भार पडतो परंतु ह्या जीवघेण्या रोगांची साथ आली की त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होतो.

 

hantavirus inmarathi

 

या साथीच्या रोगांचे मूळ हे सामान्यतः सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती तसेच स्थानिक वातावरण यांच्यात आढळते. उष्णकटिबंधीय वातावरण असलेल्या आणि कमी-अक्षांश असलेल्या भूभागात वसलेल्या आफ्रिकेतील विकसनशील देशांना, वन्यजीव झुऑनोटिक आणि वेक्टर-जनित उद्भवणार्या संसर्गजन्य रोगांचा मोठा धोका आहे.

अनेक अभ्यासाअंती तज्ज्ञांना असे आढळून आले आहे की एकूणच संसर्गजन्य रोगांपैकी ६० टक्के रोग हे Zoonoses आहेत म्हणजेच ते प्राण्यांकडून माणसांमध्ये संक्रमित होतात आणि त्यापैकी ७२% रोग हे वन्यजीवांकडून माणसांमध्ये संक्रमित होतात.

हे असे जीवघेणे रोग पसरण्याची सूक्ष्मजीवांचे पटापट होणारे अडाप्टेशन आणि उत्परिवर्तन (म्युटेशन), ह्या सूक्ष्मजीवांविरुद्ध मानवी शरीरात नसलेली प्रतिकारशक्ती , हवामान व वातावरणातील होणारे बदल, झपाट्याने बदलणारी इकोसिस्टिम, मानवी लोकसंख्येचा उद्रेक आणि बेशिस्त वर्तन, आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय प्रवास, सार्वजनिक आरोग्याविषयी असलेली उदासीनता , गरिबी आणि सामाजिक असमानता, युद्ध आणि दुष्काळ, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव अशी अनेक कारणे देता येतील.

 

africa 1 inmarathi

 

गेल्या २० वर्षांत विविध प्रकारच्या कोरोनाव्हायरसचाच तब्बल तीन वेळा झालेला उद्रेक आपण बघतोच आहोत. चिंतेची बाब म्हणजे म्हणजे या तीन साथींमधील अंतर खूप कमी आहे. आशिया आणि आफ्रिकेत अधिक रोग उद्भवण्याचे एक कारण म्हणजे मानवी लोकसंख्येतील अभूतपूर्व बदल व लोकसंख्येचा झालेला उद्रेक होय.

संपूर्ण आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात जलद शहरीकरण होत आहे, जगातील ६० टक्के लोकसंख्या ह्या दोन खंडांमध्ये वास्तव्याला आहे. जागतिक बँकेच्या मते, २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात सुमारे २०० दशलक्ष लोक पूर्व आशियातील शहरी भागात राहण्यास गेले.

इतक्या प्रचंड प्रमाणात लोकांचे स्थलांतर होणे म्हणजे निवासी क्षेत्रे निर्माण करण्यासाठी वनजमीन नष्ट केली जाते. वन्य प्राण्यांना वास्तव्याला जागाच उरत नाही. आणि मग त्यांना शहरे आणि शहरांच्या जवळ जाण्यास भाग पाडले जाते. वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने त्यांना अपरिहार्यपणे पाळीव प्राणी आणि मानवी लोकसंख्येचा सामना करावा लागतो.

 

population inmarathi

या वन्य प्राण्यांमध्ये अनेकदा विषाणू असतात; उदाहरणार्थ ज्या वटवाघुळामुळे कोरोनाव्हायरस पसरला ते वटवाघुळ शेकडो प्रकारचे सूक्ष्मजीव त्यांच्या शरीरात बाळगून असतात. आणि ह्या सूक्ष्मजीवांमुळे माणसांना संक्रमण होते.

शहरीकरण हे एक दुष्टचक्र आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात जंगलतोड होते, आणि नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने शेवटी भक्षकांचा नाश होतो. या  भक्षकांचे प्रमुख अन्न म्हणजे उंदीर सदृश प्राणी होत.

हे भक्षक फूड चेन मधून नष्ट झाल्याने किंवा त्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने उंदिरसदृश प्राण्यांच्या लोकसंख्येचा स्फोट होतो. आणि त्यामुळे प्राण्यांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका निर्माण होतो. हा प्रकार गेली अनेक वर्षे आफ्रिका आणि आशिया खंडात सुरु आहे.

आफ्रिका व आशिया खंडातील उष्णकटिबंधीय वातावरणात जैवविविधता समृद्ध आहे. या  प्रदेशात रोगास कारणीभूत सूक्ष्मजीवांचे प्रमाण देखील भरपूर आहे. त्यामुळे नवनवीन रोग उदयाला येतात आणि त्यांच्या साथी पसरतात.

 

climate inmarathi

 

या शिवाय या दोन्ही खंडात शेती व पशुपालन हे मुख्य व्यवसाय आहेत. असे असले तरीही शेती व पशुपालनासाठी लोकांकडे आवश्यक त्या सोयी नाहीत. सतत डुकरे, गुरेढोरे ह्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे ह्या प्राण्यांना असलेल्या रोगांचे संक्रमण होऊ शकते. हे लोक एकमेकांच्या देखील जवळच्या संपर्कात आल्याने रोगांच्या साथी सगळीकडे पसरतात.

आशिया व आफ्रिकेत प्राण्यांचे बाजार भरतात. हे बाजार अत्यंत गजबलेल्या ठिकाणी असतात. ह्या ठिकाणांहून सुद्धा अनेक रोग पसरतात. तसेच आफ्रिकेत प्राण्यांची शिकार करणे आणि नंतर मांस कापणे हे अनेक लोक करतात. बुशमीट साठी शिकार केल्याने इकोसिस्टिम धोक्यात येते शिवाय त्या प्राण्यांपासून रोग देखील संक्रमित होतात.

 

africa inmarathi

 

ही अशी कारणे आहेत ज्यामुळे आशिया व आफ्रिका खंडातून जीवघेणे साथीचे आजार पसरतात. या साथींना वेळीच आळा घातला गेला नाही तर काय होते हे आपण गेली दोन अडीच वर्षे बघतोच आहोत.

जंगलतोड रोखण्यासाठी आणि वन्यप्राणी व मानव यांना एकमेकांपासून शक्य तितके लांब ठेवण्यासाठी रचनात्मक संवर्धन धोरणांची नितांत गरज आहे. आणि या भयंकर रोगांच्या उदयावर लक्ष ठेवण्यासाठी एक सर्वसमावेशक जागतिक पाळत ठेवणारी प्रणाली तयार करणे ही काळाची गरज आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?