' ‘चुडैल’: ५० वर्ष काश्मीरला सांभाळणाऱ्या राणीच्या नावानेही शत्रूचा थरकाप उडायचा! – InMarathi

‘चुडैल’: ५० वर्ष काश्मीरला सांभाळणाऱ्या राणीच्या नावानेही शत्रूचा थरकाप उडायचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘कंगना राणावत आणि वाद’ हे एक समीकरण आहे हे आता आता आपल्या सर्वांना माहीतच आहे. ‘ती सतत कोणते तरी वादग्रस्त विधानं ट्विट करत असते आणि चर्चेत रहात असते’ हे तिच्या मार्केटिंग टीमचं कौशल्य म्हणावं लागेल.

आजूबाजूला इतके वाद सुरू असतांनाही कंगना आपल्या मिळालेला रोल आपलं १००% देऊन करत असते यात कोणाचंही दुमत नसावं. हेच कारण आहे की, तिला केंद्रस्थानी ठेवून सध्या कित्येक सिनेमांची सध्या निर्मिती सुरु आहे, ज्यापैकी काही सिनेमांची ती स्वतः निर्माती सुद्धा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘मणिकर्णिका’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट नायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली ही अभिनेत्री आता पुन्हा चर्चेत आहे, पण यावेळी कोणत्या विधानामुळे नाही तर तिच्या आगामी सिनेमा ‘दिद्दा – द क्वीन ऑफ काश्मीर’ या सिनेमासाठी. कोण आहे ही ‘दिद्दा’? काश्मीरच्या इतिहासात तिचं काय कर्तृत्व आहे ? जाणून घेऊयात.

 

queen didda inmarathi

 

१० व्या शतकात काश्मीरच्या इतिहासात आपल्या पाऊलखुणा असलेल्या या राणीचा सध्या अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल मध्ये जन्म झाला होता.

जन्माने अपंग असलेल्या दिद्दाचा तिच्या आई वडिलांनी लहानपणीच त्याग केला होता. मोलकरीण असलेल्या एका व्यक्तीने दिद्दाला लहानपणी आपलं दूध पाजवून वाढवलं होतं.

१० व्या शतकात काश्मीर मध्ये ‘क्षेमगुप्त’ या हिंदू राजाचं राज्य होतं. ‘आखेट’ येथील एका तहाच्या दरम्यान राजा क्क्षेमगुप्त यांची दिद्दावर नजर पडली होती. त्यांची मैत्री झाली आणि लवकरच दिद्दा आणि क्षेमगुप्त हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. लवकरच त्यांचं लग्न झालं. दिद्दा आणि क्षेमगुप्त यांची प्रेमकथा ही त्यावेळच्या अविभक्त भारतात चांगलीच गाजली होती.

‘दिदक्षेम’ या नावाने ही जोडी ओळखली जायची. असं सांगितलं जातं, की राजा क्षेमगुप्त हा दिद्दा यांच्या सौंदर्य आणि राजकीय प्रशासनाच्या ज्ञानाने इतका प्रभावित होता, की तो कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी दिद्दा सोबत चर्चा करायचा. हे त्या काळात खूप दुर्मिळ होतं.

इतकंच नाही तर, राजा क्षेमगुप्त याने एक नाणं प्रसिद्ध केलं होतं ज्यावर ‘दीद्दा क्षेमगुप्त देव’ हे नाव लिहिण्यात आलं होतं. १० व्या शतकात एखाद्या राजाने आपल्या नावाआधी आपल्या पत्नीचं नाव लिहिणं ही फार मोठी गोष्ट मानली जायची. असा विचार करणारा क्षेमगुप्त हा तेव्हा भारतातील एकमेव राजा होता.

 

queen didda inamrathi1

 

क्षेमगुप्त या राजाचं ९५८ या वर्षी एका शिकारीच्या वेळी निधन झालं होतं. तिथून पुढे दिद्दाची काश्मीरवासीयांना निपुण राणी म्हणून ओळख झाली होती. दिद्दा ही पुरोगामी विचारांची व्यक्ती आहे हे समाजाला तेव्हाच कळलं, जेव्हा तिने क्षेमगुप्त राजासाठी सती न जाण्याचा निर्णय घेतला.

सती जाण्यासाठी दिद्दावर खूप सामाजिक, राजकीय दबाव टाकण्यात आला होता. पण, हा दबाव पूर्णपणे परतवून लावत दिद्दाने जगण्याचा, राणी होऊन राज्य करण्याचा निर्णय घेतला होता. आपला मुलगा अभिमयू याचा सांभाळ करणे आणि त्याचा राज्याभिषेक होईपर्यंत आपण राज्य करण्याचा दिद्दाने निर्णय घेतला होता.

अभिमयूचा राज्याभिषेक झाल्यानंतर दिद्दाने बाहुबलीच्या आई शिवगामी प्रमाणे राज्याचं ‘संरक्षक’ म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता.

दिद्दाला संरक्षक म्हणून काम करत असतांना तिला कित्येक राजकीय स्पर्धा, वादांना सामोरं जावं लागलं होतं. लोकांमध्ये दिद्दावर असलेला विश्वास हा दिवसागणिक वाढत चालला होता.

राज्यावर मजबूत पकड असलेल्या दिद्दाबद्दल एका लेखकाने असं लिहून ठेवलं आहे की, “क्षेमगुप्त जिवंत असेपर्यंत जिला सगळे गाय समजत होते, तिने आपल्या कर्तृत्वाने हनुमानाप्रमाणे सेतू बांधण्याचं काम करून दाखवलं होतं.”

 

queen didda inamrathi2

 

दिद्दाचं १००३ या वर्षी निधन झालं, पण त्यांनी तयार केलेल्या सैन्याने आपलं काम थांबवलं नव्हतं. ५० वर्ष काश्मीरची राणी म्हणून प्रशासन करून त्यांनी मृत्यूपूर्वी आपल्या सैन्याचा कारभार ‘समग्रमराज’ या राजाकडे सोपवला होता.

१०१५ साली मोहम्मद गजनवी या मुघल राजाने काश्मीरवर हल्ला केला होता. दिद्दा यांच्या प्रशिक्षणात तयार झालेल्या सैन्याने हा हल्ला यशस्वीपणे परतवून लावला होता. दिद्दा यांचं सैन्य घोडदळ, पायदळ, शस्त्रास्त्र अशा सर्वच बाबतीत उजवं असल्याने राजा ‘समग्रमराज’ने मोहम्मद गजनवीला काश्मीरच्या बाहेर हाकलून लावलं होतं.

काश्मीरच्या राणी दिद्दा यांनी आपल्या हयातीत सुद्धा मोहम्मद गजनवी याचा एका हल्ल्यात विजय मिळवला होता. या युद्धाच्या वेळी शत्रूकडे ४५,००० सैनिक होते तर दिद्दा यांच्या सैन्यात केवळ ५०० सैनिक होते. या लढाईत ‘गुरीला’ प्रकारच्या हल्ल्याचा वापर करून राणी दिद्दा आणि त्यांच्या सैन्याने सर्वांनाच चकित केलं होतं.

भारतीय इतिहासातील ‘दिद्दा’ या अभिमानास्पद राणीबद्दल वाचणं, तिच्यावरील सिनेमा बघणं हे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास निर्माता कमल जैन आणि कंगना राणावत यांनी व्यक्त केला आहे.

तत्कालीन भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीने दिद्दा यांना ‘चुडेल रानी’, ‘काश्मीर की लंगडी रानी’ असे नाव ठेवून त्यांचं कर्तृत्व समोर न येऊ देण्याची पूर्ण व्यवस्था करून ठेवली होती. पण, सध्याचा सिनेमा अशा लोकांची दखल घेत आहे ही चांगली गोष्ट आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?