Site icon InMarathi

‘त्यांचे’ कधीही न पाहिलेले विश्व रेखाटणारा चित्रपट : नानू अवनल्ला….अवलू !

naanu-avanalla-avalu-marathipizza00jpg

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

चित्रपट: नानू अवनल्ला…. अवलू

दिग्दर्शक: बी एस लिंगदेवरू

आर जी पिक्चर्स प्रस्तुति

रिलीज: मे 2015

===

‘नानू अवनल्ला अवलू’ हा बी एस लिंगदेवरू दिग्दर्शित सिनेमा यावर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधे (PIFF) पहायचा योग आला. कन्नड सिनेमा असल्यामुळे त्याचं नाव, कथा, कलाकार, विषय, ट्रेलर याविषयी पुसटशी देखील कल्पना नव्हती. PIFF चा फायदा हा की असे विविध विषयावरचे, निरनिराळ्या देशांमधले आणि इतर भाषांमधले सिनेमे आपल्याला एका जागी पहायला मिळतात. ओपन माइंडसेट आणि पेशन्स ठेऊन सिनेमे पाहणं मात्र गरजेचं असतं.

filmipop.com

कर्नाटक राज्यातल्या एका छोट्या गावात सिनेमाच्या कथेला प्रारंभ होतो. मधेश हा मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आणि त्याचं भावविश्व हा सिनेमाचा फोकस एरिया. मात्र हा मधेश चारचौघांसारखा नॉर्मल मुलगा नसतो. त्याचं चालणं, बोलणं, एकंदर देहबोली ही बायकी वळणाची असते. बायकी पेहराव, नट्टापट्टा याची मधेशला आवड असते. मोठ्या बहिणीच्या आगेमागे घुटमळणे, तिचे ड्रेस घालून, नटून आरशात पाहणे, मोठं वय झालं तरी बहिणीच्या जवळ झोपणे इत्यादी गोष्टी तो नकळत करतो. ही त्याची वेगळी आवड त्याच्या वर्गातली मुलं, त्याचे शिक्षक, त्याच्या कुटुंबातील व्यक्ति, त्याचा जवळचा मित्र या सर्वांच्या कधी ना कधी लक्षात येतात. पण मधेश असा का वागतो? त्याच्या आवडीनिवडी अशा का? हे मात्र उमगत नाही.

काॅलेजमधे जाण्याइतका मोठा झाल्यावरही मधेशला मुलींमधे फारसं स्वारस्य नसतं. किंबहुना तो मुलांकडेच आकर्षित होतो. त्याच्या जवळच्या मित्रास, कधीही सोडून न जाण्याची विनंती करतो. आपलं शरीर पुरूषाचं असलं, आपण जन्मानं जरी पुरुष असलो तरी आपलं मन हे स्त्रीचं आहे याची मधेशला खात्री पटते. पण हे असं का? यावर उपाय काय हे मात्र कळत नाही.

मधल्या काळात मधेशची बहिण लग्न होऊन बंगलोरला जाते. यामुळे आलेला एकटेपणा, स्त्री /पुरूष डायलेमा आणि हे सर्व शेअर करायला कोणीच नसल्यामुळे तो कॉलेजच्या पदवी परीक्षेत परीक्षेत नापास होतो. यामुळे रागाच्या भरात वडील त्याला नाही नाही ते सुनावतात. मुलगा होऊ दे म्हणून आपण प्रार्थना करतो आणि झालेला मुलगा जर असा असेल तर याचा उपयोग काय? असा व्यथित सवाल, वडील त्यांच्या मित्रांना करतात.

youtube.com

याला डॉक्टरला दाखव, देवीच्या पायावर वहा असे सल्ले मित्र देतात. मधेश मात्र या सगळ्याला वैतागून बंगलोरला बहिणीकडे रहायला जायचं ठरवतो. आई वडील नाईलाजाने तयार होतात आणि त्याची काही पैसे देऊन पाठवणी करतात. बहिणीचा नवरा मधेशला ऑफिस बॉय ची नोकरी लावून देतो. दिवसा नोकरी आणि संध्याकाळी काॅलेज असा दिनक्रम सुरू होतो. बसने जा-ये करताना मधेशची त्याच्या सारख्याच एका व्यक्तिशी ओळख होते. त्याच्यामार्फत त्याची एका ग्रूपशी ओळख होते. त्या ग्रूप मधल्या व्यक्ति आठवड्यातून एका गुप्त ठिकाणी जमून, बायकांसारखी वेशभूषा करून नाच, गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रम करत असतात.

आयुष्यात आलेल्या या नविन व्यक्ति, आठवड्यातून एकदा का होईना पण मनसोक्त स्त्रीसारखं वागा-बोलायला मिळणं, छोट्या गावातल्या नजरा आणि बंधनं जाऊन त्याऐवजी मिळणारा शहरी एकांत या सर्व बदलामुळे मुळे मधेश सुखावतो. आता त्याला खात्री पटते की, आपलं शरीर जरी पुरुषाचं असलं तरी मनाने आपण स्त्री आहोत. आपण स्त्री सारखंच जगायला हवं आणि आपल्याला हा हक्क मिळायला हवा हे तो मनोमन ठरवतो. नव्या मित्राला बोलूनही दाखवतो. मित्र त्याला सांगतो की हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही. समाजात आपल्या सारख्यांना उजळ माथ्याने वावरणं शक्य नाही. मधेश मात्र स्त्रीत्वाचा हक्क मिळवण्यासाठी हटून बसतो.

तृतीयपंथीयांमधे मध्ये महत्वाचं स्थान असणारी एक वयस्क व्यक्ती मधेशला सांगते, की हा हक्क जर मिळवायचा असेल तर भीक मागणे अथवा वेश्याव्यवसाय हे दोनच रस्ते आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे भारताच्या राज्यघटनेमधे मधे तृतीयपंथीयांचा नसलेला उल्लेख आणि समाजातून त्यांच्याप्रती असलेला तिरस्कारयुक्त अनादर! हे सर्व एेकूनही मधेश त्याच्या मूळ निर्णयावर ठाम राहतो. त्याची रवानगी आता थेट पुण्यात – बुधवार पेठेत होते.

तृतीयपंथीय समाजातल्या चालीरिती, नविन मेंबरचे स्वागत करण्याची पद्धत, पेठेतले दैनंदिन जीवन, त्यातले बारकावे, हँडीकॅमने घेतलेले शूटिंग या गोष्टी दिग्दर्शकाची ताकद वारंवार दाखवून देतात. पुरुषाचे स्त्री मधे रूपांतरण (अर्थात castration) करण्यासाठी, या शस्त्रक्रियेसाठी लागणारा पैसा हा त्या व्यक्तीला स्वतः भीक मागून मिळवावा लागतो. आता हा रिवाज पाळण्यासाठी मधेशला, विद्या हे नाव घ्यावे लागते. बऱ्याचशा धंद्याच्या क्लुप्त्या शिकाव्या लागतात. लोकांच्या नजरा, टिंगल तर कधी अपमान सहन करत भीक मागावी लागते. एकदाची शस्त्रक्रियेसाठी लागणारी रक्कम जमते आणि विद्या (मधेश), त्याची मैत्रीण आणि पेठेत त्याला निवारा देणारी आक्का, ‘कडप्पा’ या गावी रवाना होतात.

youtube.com

Castration जिथे होतं तिथलं रुग्णालयाचं वातावरण भीषण उभं केलंय. ते वातावरण, या शस्त्रक्रियेमधे जीव गमावण्याची भीती, शस्त्रक्रिया झाल्यावरची पेशंट्सची स्थिती हे सर्व पाहताना अंगावर शहारा आल्याखेरीस रहात नाही. आपण चांगल्या घरात जन्मलो, नॉर्मल पुरूष अथवा स्त्री म्हणून जन्मलो हे आपलं खरोखर भाग्य आहे, हे वाटल्याखेरीस रहात नाही. Castration झाल्यानंतरही आयुष्याची फरपट थांबत नाही. विद्याच्या पेठेतल्या मैत्रीणीला इच्छेविरूद्ध तिथल्या नेतामंडळी आणि अशा अनेक लोकांबरोबर संग करावा लागतो. हे पाहून अतिशय व्याकूळतेने विद्या, आक्काकडे हे सर्व सोडून जाऊ द्यायची विनंती करते.

मी एम् ए केलंय मग मला चांगली नोकरी मिळू शकेल असं सांगते. आक्काही मोठ्या मनाने जायची परवानगी देते आणि अडचण आल्यास पुन्हा हक्काने इथं ये असं सांगते. विद्या नोकरीसाठी जोमाने प्रयत्न करते. बऱ्याच ठिकाणी नकाराचा सामना केल्यावर गावी परत जातो. त्याचं हे पूर्ण स्त्री-रूप पाहून घरचे त्याला जवळ करायला नकार देतात. या अपमानाने विद्या बाहेर जाऊन आपलं नाव करून दाखवायचा निग्रह करते.

वास्तव जीवनात, स्माईली विद्या असे नाव धारण करणाऱ्या तृतीयपंथीय व्यक्तिची ही खरीखुरी कहाणी आहे. या विद्याने स्वतः अभिनेत्री दिग्दर्शक म्हणून अनेक नाटक, सिनेमे मिळून चारशेएक कामे केली. अनेक तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहामधे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि निसर्गाच्या जन्मजात असणाऱ्या शापाला न-जुमानता समाजात एक मानाचं स्थान मिळवलं. विद्या आणि तिच्यासारख्या लोकांच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय संविधानात 2014 साली तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विशेष तरतूद करण्यात आली. आता गरज आहे, ती आपण आपल्या विचारांत सुधारणा करण्याची. संचारी विजय या गुणी अभिनेत्याने विद्या /मधेशची अत्यंत अवघड अशी भूमिका साकारली आहे. त्याच्या पात्रावर आणि समर्थ अभिनयावर नानू अवनल्ला… चा डोलारा उभा राहिलाय.

nnavetticadgoes2themovies.blogspot.in

दिग्दर्शक बी एस लिंगदेवरूंचा 2003 च्या ‘मौनी’ नंतरचा हा दुसरा चित्रपट. इतका वेगळा विषय निवडून, त्याची अत्यंत सेन्सिटिव्ह पद्धतीने मांडणी करून सुमार एकशेपाच मिनिटांचा सिनेमा बनवणे आणि तो प्रेक्षकाशी सहज होणं हे अत्यंत अवघड असं शिवधनुष्य त्यांनी सहज पेललंय. न समजणारी भाषा असूनही केवळ इंग्रजी सबटायटल्स, ताकदीची दृष्यभाषा आणि अभिनयाच्या जोरावर हा सिनेमा कनेक्ट होतो आणि तृतीयपंथीयांची तळमळ प्रेक्षकाला भिडवतो यातच नानू…च्या संपूर्ण टीमचं यश आहे.

‘नानू अवनल्ला अवलू’ याच नावाने पुस्तक देखील उपलब्ध आहे.
‘नानू अवनल्ला अवलू’ न चुकता एकदा तरी अनुभवण्यासारखा सिनेमा आहे. शक्य असल्यास आपल्या नेहमीच्या आवडीनिवडीच्या चाकोरीबाहेर पडून जरूर पहा.

सिनेमाचा ट्रेलर येथे पाहू शकता

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version