Site icon InMarathi

“जय भीम बघितला आणि त्यानंतर मला २ दिवस झोप लागली नाही!” एक वेगळाच अनुभव

jai bhim 3 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : विभावरी बीडवे

===

जय भीम तमिळ पिक्चर बघितला आणि दोन दिवस झोप नाही! तमिळनाडूतील कडलोर जिल्ह्यातील इरुलर जनजाती समाज. इथल्या पारधी समाजासारखाच! ब्रिटीश काळापासून गुन्हेगारी समाज म्हणून शिक्का माथी लागलेला. मोल मजुरीची कामं करून जगताहेत. गावातल्या सरपंचाच्या घरी चोरी होते आणि संशयित म्हणून राजकन्नू, त्याची गरोदर पत्नी आणि सर्वच कुटुंबाला विनाचौकशी कस्टडीत घेतलं जातं.

पोलीस कस्टडीत त्यांना बेदम मारहाण, हिंसाचार होतो. मात्र आरोपी कस्टडीतून निसटतात असा भास निर्माण केला जातो. तत्पूर्वी बायकांना कस्टडीतून सोडून दिलं आहे आणि राजकन्नूची पत्नी सेन्गिनी, चंद्रु या जनहित याचिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या वकीलापर्यंत पोहोचली आहे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चंद्रु हेबिअस कॉर्पस याचिका दाखल करतो आणि सत्याचा एक एक पट न्यायालयासमोर उलगडत जातो. व्यवस्थेची आणि त्यातील माणसांच्या पाशवीपणाचं सत्य उघड होतं. सत्य – जे अजिबात अमान्य करण्यासारखं नाही. तरी चंद्रुसारखी, कमिशनर सारखी, अहवाल देणाऱ्या डॉक्टरसारखी चांगली माणसं भेटत राहतात.

अखेरीस न्यायालय निकालही न्यायपूर्ण देते. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या पिक्चरमधील चंद्रु वकील हे पुढे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि व्यवस्थेवरचा विश्वास त्या कृतीतून पक्का झाला. आजही जनजाती, उपेक्षित, वंचित ह्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची कल्पना आपल्याला येत नाही.

 

 

न्यायालयीन लढ्यासाठी ते साक्षर नसतात, पैसा नसतो, ते sofist नसतात. त्यांच्या साध्यासुध्या जीवनाहून ही कॉम्प्लेक्स्ड सिस्टीम अत्यंत वेगळी. ते त्यात तग धरू शकत नाहीत.

तरीही या सर्वांना जागं करण्याचं काम केलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. (खरंतर त्यांनी आपल्याला जागं करण्याचं काम केलं!) त्यामुळे भीमाचा उल्लेख पिक्चरमध्ये फारसा न येताही पिक्चरला नाव दिलंय ‘जय भीम’ ही एक अत्यंत आशादायी अशी गोष्ट आहे.

कारण पिक्चरचा नायक आहे कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता. पिक्चरमध्ये लाल झेंडे घेऊन एक मोर्चाही काढला गेला आहे, पत्रकंही वाटली गेली आहेत. मात्र हे सर्वच अत्यंत विरोधाभासी आहे. कम्युनिजमचा एकूण फोलपणा लक्षात आणून द्यावा या हेतूने हा विरोधाभास मुद्दाम ठेवला आहे की काय असे वाटावे इतका तो मजेशीर आहे.

कारण तसे मोर्चांमुळे काही घडत नाही. पुन्हा नायक हा इथल्या व्यवस्थेवर, कायदा आणि न्यायपद्धतीवर पूर्णतः विश्वास असणारा आहे, त्यामुळेच तो विविध संशोधन करून, भावनिक आवाहन करून लढत राहतो. ही गोष्ट कम्युनिजमच्या पूर्णतः विरोधात आहे. कथेतील न्याय हा पूर्णपणे व्यवस्थेच्याच मार्गाने मिळतो.

सत्य कथेतील चंद्रु वकीलही आता स्वतः मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. त्यांनीही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा आणि व्यवस्थेचाच मार्ग निवडला आहे. त्यामुळे कितीही लाल झेंडे दाखवले आणि कितीही वेळा लाल सलाम केले तरी अंतिमतः जय भीम हेच खरे हे एकतर मुद्दाम केले असावे किंवा हे उमगण्याचा मानसिक परिवर्तनाचा हा प्रवास खरा असावा.

स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्क्सवादाच्या अत्यंत विरोधात होते. त्यांनी २० नोव्हेंबर १९५६ रोजी काठमांडू इथे झालेल्या आपल्या ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या भाषणात त्याचा योग्य समाचार घेतला आहे. दलितांना इस्लाम आणि साम्यवादाकडे न वळण्याविषयी त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे.

 

 

साम्यवादाला अपेक्षित समता ही कामगार वर्गाच्या हुकुमशाहीतून अर्थात बळातून येणारी होती. या बळाचा वापर करून निर्माण झालेली कामगारांची हुकुमशाही कधी संपेल आणि तिची जागा काय घेईल, तिच्याऐवजी कोणते शासन असेल याचं उत्तर साम्यवादाकडे नव्हतं आणि ते बुद्धाकडे होतं, ते म्हणजे प्रजासत्ताक शासनपद्धती. याचाच अर्थ साम्यवाद जिथे उत्तर देऊ शकत नाही, तिथे धर्म उत्तर देतो कारण धर्म हा जीवनमार्ग दाखवतो.

समतेची संकल्पना बाबासाहेबांची अशी वरवरची नव्हती तर ते त्याच्या तत्त्वाप्रमाणे ते पोहोचले होते. माणसाचे मन, स्वभाव हा नैतिकतेने बदलण्याचा, दुःखनिर्मूलनाचा आणि सामाजिक समतेचा मार्ग म्हणून ते धर्माकडे – बौद्ध धर्माकडे बघत होते.

जय भीम म्हणताना, भीमाचा जयजयकार करताना ही साम्यवादाची अव्यवहारी समता संपते. शीर्षक देताना विचार असाच असावा, निदान तो असा वाटत तरी आहे.

पिक्चर बघितला त्याच दिवशी गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री मिळाली हा किती छान योगायोग! गिरीश प्रभूणेंनी भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून पारधी समाजासाठी काम केलं. पालावरचं जिणं ह्या लेखनातून त्याचे अनेक रिपोर्ताज वाचकांपर्यंत पोहोचले.

 

 

पुढे ‘यमगरवाडी’ हा प्रकल्प उभा राहिला. यमगरवाडीची गोष्ट हे त्यावरचं रवींद्र गोळे ह्यांनी लिहिलेलं पुस्तक. त्यांनी लिहिलेलं ‘आयाबाया’ हे पुस्तक ही असेच या वाड्यावस्त्यांमधील महिलांच्या success stories वर आहे.

जय भीम मध्ये अन्याय झाल्यावर न्यायासाठी लढण्याची कथा आहे. पण न्यायालयेही किती पुरी पडणार? ह्या जमातींनी सक्षमपणे आपल्या पायावर उभं राहणं, त्यांच्यावर लागलेला गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मिटावा, मुलांना शिक्षण मिळावं ह्यासाठी यमगरवाडीचा प्रकल्प जोरात सुरु झाला. अपराध्यान्प्रमाणेच डोंबारी, कोल्हाटी, नंदीवाले, मरीआईवाले, लमाणी अशा २०-२२ जमातींमध्ये काम सुरु आहे.

शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, पक्की घरे, शेती, त्यांच्या ज्ञानाच्या आधारावर शिक्षण अशा अनेक उपक्रमांचा शेकडो कुटुंबाना लाभ झाला. तिकडे वयमच्या जव्हार प्रकल्पातही जनजातींना शासकीय योजना आणि त्याचा लाभ घेऊन सक्षम होणं ह्याबद्दल सहाय्य केलं जातं. शाश्वत विकासाची अशी अनेक कामं चालू आहेत.

या सगळ्या संघपरिवारातील संघटना आहेत, ज्या तळागाळातील लोकांचं जिणं समरस होऊन बघतात आणि त्यावर कार्यरत राहतात. तिथे सरकारला सहाय्य केले जाते, व्यवस्थेत सुधार घडवून आणले जातात. ते लाल सलाम देत नाहीत, तर जय भीम विचारानेच कृतीशील राहतात.

 

 

गिरीश प्रभूणेंचा पद्मश्रीने गौरव होताना बघून फार समाधान वाटलं. पिक्चर तर आवडलाच! आणि सर्वांनी बघायलाच हवा असा. अनुकंपा, करुणा ही माणसाला माणूस करणारी मूल्य आहेत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version