Site icon InMarathi

वीर दासच्या ‘२ भारताच्या’ थिअरीमागची ‘खरी’ मानसिकता दाखवणारं परखड मत

vir das 2 indias inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

“आपला देश अजूनही कसा आणि किती मागासलेला आहे?” हे आपल्याच देशातली काही बुद्धिजीवी लोकं बेंबीच्या देठापासून ओरडून केवढा हलकल्लोळ माजवतात हे आपण कालच्या वीर दासच्या मोनोलॉगमधून पाहिलंच असेल.

बरं परदेशात जाऊन तिथल्या डॉलर्सच्या तुकड्यांवर नोकरी करणाऱ्या, मिनिरल वॉटरच्याच आधीन गेलेल्या सो कॉल्ड भारतीयांसमोर एक मोठा मोनोलॉग सादर करणाऱ्या या बुद्धिजीवी माणसाविषयी तर माझ्या मनात काडीचा आदर नाही.

 

 

नामदेव ढसाळ, सादत हसन मंटो यांच्यापासून अगदी मंगेश पाडगावकरांपर्यंत कित्येक कवींनी देशाच्या व्यवस्थेवर टीका टिप्पणी केली, वेळ पडेल तेव्हा सरकारला अतिशय गंभीर शब्दात खडेबोल सूनवायलासुद्धा यांनी पुढेमागे पाहीले नाही, पण ते सगळं त्यांनी या देशात राहून केलं.

त्यासाठी त्यांना केनडि सेंटरची किंवा तत्सम परदेशातल्या प्लॅटफॉर्मची गरज कधीच भासली नाही, वीरदासच्या त्या मोनोलॉगवर सगळ्याच स्तरातून टीका झाली, काहींनी त्याच्या या मोनोलॉगवर सडकून टीका केली, तर काहींनी त्याच्या या व्यक्तव्याचे गोडवे गायले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज इंटरनेटच्या माध्यमातून आपण साऱ्या जगाशी कनेक्टेड आहोत त्यामुळे आपल्या देशाची दखल जगभरात घेतली जाते, आणि त्यावरूनच देशाची एक प्रतिमा तयार होते हे सत्य आपण मान्य करायलाच हवं.

वीर दासने हा एक स्टँड अप कॉमेडीयन आणि बॉलीवूड अॅक्टर आहे, ज्याने केनडी सेंटरमध्ये एक कविता किंवा मोनोलॉग सादर केला ज्यात त्याने २ भारताचा उल्लेख केला, यातून त्याने अप्रत्यक्षपणे भारतीय समाजव्यवस्था, सरकारी यंत्रणा आणि समाजाची मानसिकता यावर ताशेरे ओढले.

 

 

यातले काही मुद्दे आपल्याला पटण्यासारखे असले तरी त्यातून नक्कीच आपल्या देशाची वेगळी प्रतिमा तयार झाली आहे आणि हे सत्य नाकारून चालणार नाही, कारण भले यातून देशाची चांगली बाजू जरी मांडली असली तरी त्याबरोबरच देशातले प्रॉब्लेमसुद्धा मांडले आहेत.

मुळात देशातले प्रॉब्लेम्स कवितेतून किंवा इतर कोणत्या कलाकृतीतून सादर करायला कोणाचाच आक्षेप नाही, पण आपण कोणत्या ठिकाणी आहोत, कोणासमोर बोलतोय काय बोलतोय याचं भान प्रत्येकालाच असायला हवं, मग तो सामान्य माणूस असो किंवा मोठा सेलिब्रिटी!

सध्या ग्लोबलायझेशनमुळे कोणतीच माहिती लपून राहात नाही, आज भारतात किती प्रॉब्लेम्स आहेत, पेट्रोल किती महागलं आहे, देशात किती बलात्कार होत आहेत, मॅचमध्ये भारत जिंकतोय का पाकिस्तान हे सगळं जगातल्या कानाकोपऱ्यात माहीत असतं.

 

 

हे असले प्रॉब्लेम कवितेतून मांडून, भारताची २ चित्रं निर्माण करणाऱ्या या कलाकारांची मला मात्र कीव करावीशी वाटते, आज जसं वीर दासने परदेशात जाऊन आपल्या देशाच्या समस्या जगापुढे मांडल्या, तसंच किती परदेशी कलाकारांनी भारतात येऊन त्यांच्या देशाबद्दल गाऱ्हाणी गायली आहेत?

त्यांच्या देशात काहीच प्रॉब्लेम नाहीत का? तिथे सगळं आलबेल सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का? बरं हे सगळं वीर दासने भारतात राहून जरी केलं असतं तरी त्याच्या या परफॉर्मन्सचं कौतुक करता आलं असतं, पण त्यावरही त्याने टीका टिप्पणी करत भारतातल्या स्टँड अप कॉमेडीयन्सचा आवाज दाबला जातोय असा आरोप केला.

खरंतर आपल्या देशात स्टँड अप कॉमेडीच्या नावावर आपल्या संस्कृतीला किंवा आपल्या श्रद्धास्थानांना जेवढं टार्गेट केलं जातं तेवढं कोणत्याच देशात केलं जात नाही, तरी आपल्या देशातल्या सहिष्णूतेबद्दलसुद्धा टीका करायला वीर दास विसरला नाही.

आपल्या देशातली युवा पिढी ७० वर्षांच्या म्हाताऱ्या राजकारण्यांचे १५० वर्षं जुने सल्ले ऐकते असं वीरदासचं म्हणणं आहे, पण या देशातल्या सक्रिय राजकारणात योगदान द्यावं असं त्याला कधीच वाटलं नसावं का? राजकरणाबद्दल फक्त कलाकृतीतून व्यक्त होणंच पुरेसं नसतं तर त्यासाठी त्या दलदलीत प्रत्यक्ष उतरावंदेखील लागतं!

 

हे सगळे मुद्दे मांडताना वीर दास देशातल्या शेतकऱ्यांबद्दलसुद्धा बोलतो, पण गेले कित्येक महिने देशात चाललेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाबद्दल त्याला कितपत माहिती असेल हे शंका त्याच्या लाईफस्टाईलकडे बघून येतेच.

आलिशान गाडीतून फिरून, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून आपल्याला फक्त बाहेरच्या लोकांच्या समस्या दिसतात, पण त्यांची जाणीव तेव्हाच होते जेव्हा आपण स्वतः त्याच्या लेवलवर येऊन विचार करतो.

त्यामुळे हे असे मुद्दे कवितेतून किंवा कलाकृतीतून मांडणं फार सोप्पं असतं पण आपण मांडलेल्या समस्यांवर काहीतरी मार्ग काढून त्या समस्या दूर करण्यातच खरा पुरुषार्थ असतो, हे बहुदा वीर दास सोयीस्कररित्या विसरला असावा.

सोशल मीडियावर दोन गटात विभागल्या गेलेल्या बॉलिवूडबद्दल वीर दासने टिप्पणी केली, पण याच बॉलिवूडच्या सध्याच्या उद्योगांबद्दल त्याने इतके दिवस का मौन पाळलं होतं हे फक्त त्यालाच ठाऊक!

 

 

बरं एवढ्यावरच बोलून थांबेल तर तो वीर दास कसला, त्याने क्रिकेटसारख्या खेळाला सुद्धा जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, त्याच्या टिप्पणीप्रमाणे जेव्हा आपण ‘ग्रीन’बरोबर खेळतो तेव्हा आपला रंग ‘ब्लु’ असतो पण जेव्हा ‘ग्रीन’ जिंकतो तेव्हा अचानकपणे आपला ‘ब्लु’ रंग बदलून ‘ऑरेंज’ होतो.

खरंतर त्याच्या या मोनोलॉगमधली इतर वाक्यांपेक्षा कित्येक पटीने भयंकर हे वाक्य होतं. या वाक्यातून वीर दास भारतासारख्या देशाला कम्युनल हा टॅग लावू पाहतो. तिथेच तो एक भारतीय म्हणून खटकतो.

ब्लु रंग ऑरेंज होतो याचा वेगळा अर्थ सांगायची खरंच गरज आहे असं मला तरी वाटत नाही. खरंतर ज्या देशाकडून फक्त भारतालाच नव्हे तर साऱ्या जगाला अतिरेकी कारवायांमुळे आतोनात नुकसान झाले अशा देशासोबत आजही भारत क्रिकेट खेळायला नाही म्हणत नाही यात आपला मोठेपणा दिसून येतो.

 

 

खेळातली हार जीत आणि त्यामागची ईर्षा ही तेवढ्यापुरतीच असते आणि ती प्रत्येक देशात बघायला मिळते, पण याचा अर्थ असा बिलकुल नसतो की पाकिस्तान जिंकल्यावर प्रत्येक भारतीयाची तळपायाची आग मस्तकात जाते.

उलट भारताने जगातल्या प्रत्येक खेळात जेवढी खिलाडूवृत्ती दाखवली आहे तेवढी क्वचितच कोणत्या देशाने दाखवली असेल आणि याचे दाखले आजही आपल्यासमोर आहेत.

बाकी वीर दास त्याच्या या मोनोलॉगमध्ये कितीही योग्य मुद्द्यांवर बोलला असला तरी त्याने मांडलेल्या ‘ग्रीन – ऑरेंज – ब्ल्यू’ या थिअरीमुळे तो जास्त डोक्यात गेला. एक अभिनेता किंवा एक स्टँड अप कॉमेडीयन म्हणून मी त्याचा चाहता असलो नसलो तरी एक भारतीय म्हणून त्याने केलेल्या या व्यक्तव्यामुळे तो एक भारतीय म्हणून मनातून साफ उतरला!

 

भारत हा कसा चांगला देश आहे याचं सर्टिफिकेट वीर दाससारख्या माणसाने द्यावं एवढी वेळ अजून या देशावर आलेली नाही हे त्याने ध्यानात ठेवावं, भले तो जिथून आलाय तिथे त्याला २ प्रकारचे भारत दिसले असतील, पण या अशा बाबतीत भारत हा सदैव एकजूट आहे आणि राहील!

जय हिंद!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version