Site icon InMarathi

गो हत्या बंदी ते गाईच्या वासराचा निर्घृण खून – लोकशाहीची हरवलेली मूल्यं

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कोणी काय खावे हा बिलकुल 100% ज्याचा त्याचा हक्क आहे. कोणाच्या थाळीत काय असावे हे कोणी तिर्हाईत, अक्षरशः सरकारने देखील ठरवू नये. प्रत्येकाला खाण्या-पिण्याचे मूलभूत स्वातंत्र्य हे मिळालेच पाहिजे.

भाजप प्रणित रालोआ सरकारने गोमांसबंदीचा एक कायदा निर्धारित केलाय. तो योग्य नाहीच. भारतात कोट्यवधी लोक राहतात जे हिंदू नाहीत किंवा गोमांस भक्षण करतात. जे त्यांचे स्वातंत्र्य आहे…

पण हे करताना गायीला पवित्र मानणाऱ्या, गायीत ३३ कोटी (कोटी म्हणजे प्रकार…करोड नव्हे) देव आहेत अशी श्रद्धा बाळगणाऱ्यांना, माता मानणाऱ्याना लोकांना हिणवण्याचा तुम्हाला अजिबात हक्क नाही. प्रत्येक श्रद्धाळू गौरक्षक बनून मारामारी करत नाही. श्रद्धा जोवर लादली जात नाही किंवा इतराना त्रासदायक ठरत नाही तोपर्यंत ती आक्षेपार्ह नाही! लोक गायीला देव मानतील अगर आई मानतील, जोवर तुम्हाला ते मानण्याची सक्ती केली जात नाही तोवर तुम्हाला ह्या श्रद्धेवर आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही. हेटाळणी आणि अवहेलना करण्याचं तर बिलकुलच काही कारण आणि हक्क नाही!

आणि जे लोक गायीला पवित्र वगैरे मानतात त्यांनी इतराना पवित्र माना म्हणून जबरदस्ती करण्यात मतलब नाही. शीख लोक सिगरेट पीत नाहीत म्हणून पंजाबात सिगरेट मिळत नाही असं नाही. मुस्लिम दारू पीत नाहीत म्हणून काश्मिरात दारूच मिळत नाही असे नाही. त्याचप्रमाणे तुमच्या श्रद्धेचा आदर तो पर्यंतच जोवर तुम्ही ती लोकांवर लादत नाही!

ज्याला गोमांस खायचे आहे त्याने ते आनंदाने खावे. गोमांस खाण्याचे फायदे, गायीला पवित्र मानणे कसे हास्यास्पद वगैरे पॅम्फ्लेट वाटत फिरू नये. तसेच ज्याला गाय माता वाटत असेल त्याने माता मानावे. इतरांनी देखील माताच मानावे आणि तुम्हाला हवे तेच करावे हा हलकटपणा करू नये.

परवा केरळमध्ये काँग्रेस पक्षाच्या काही युवा कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात एक गाय (गायीचे वासरू?…ज्याला ndtv ने आधी बैल आणि नंतर म्हैस बनवले) कापली! का? तर सरकारच्या गोमांस बंदीच्या निर्णयाला विरोध. हा तद्दन मूर्खपणा आहे. नीचपणा आहे! गाय कापून खाणे हे स्वातंत्र्य असले तरी रस्त्यात कॅमेऱ्यासमोर त्या गोष्टीचा इव्हेंट करणे नैतिकदृष्ट्या चूक आहे. निव्वळ ‘आम्ही किती टोकाला जाऊन विरोध करू शकतो’ हे दाखवून भाजपला खिजवण्याच्या नादात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा पाशवीपणा केलेला आहे.

ANI

“गौरक्षकांच्या हिंसेवर मौन बाळगणाऱ्यांनी काही बोलायचे नाही’, “मूलभूत स्वातंत्र्य हिरावून घेतल्याने लोक अशी रिऍक्शन देतात” असे लंगडे लॉजिक काही स्वयंघोषित बुद्धिवादी करताना दिसून येतायत. भारतात ९० कोटी हिंदू राहतात. २० कोटी मुस्लिम. उद्या एखाद्या गोष्टीला मूलभूत हक्कांचे हनन म्हणून प्रत्येक समाज रस्त्यावर उतरून नीच गोष्टी करायला लागला तर?

बरं, प्रत्येक हिंदू भाजपसमर्थकच असतो का? असला तरी तो गौरक्षकच असायला हवा का? ह्या न्यायाने प्रत्येक काँग्रेससमर्थक भ्रष्टाचार समर्थक असतो का? नाही! निश्चितच नसतो.

“गाय रस्त्यात काय आणि कत्तलखान्यात काय, मरणारच.” – असा एक तर्क दिला जातोय. पण प्रत्येक गोष्ट करण्याची, राबवण्याची एक पद्धत असते लोकशाहीत. मूलभूत हक्कांप्रमाणेच मूलभूत कर्तव्य देखील असतात. कायदा व सुव्यवस्था पाळणे हे त्यापैकी एक. त्याचप्रकारे इतरांच्या श्रद्धेचा आदर करणे हे ही आणखी एक कर्तव्य आहे.

एखाद्या खुनी अतिरेक्याला देखील आपण जेलच्या चार भिंतीत फाशी देतो. रस्त्यावर टांगत नाही. रस्त्यावर टांगला काय आणि जेलमध्ये टांगला काय, अतिरेकी मरणारच आहे – पण त्यात लोकशाहीत राहणारे ह्या न्यायाने आपले चारित्र्य आपण दाखवत असतो. इथे अतिरेकी आणि गाय ही तुलना करण्याचा प्रयत्न नाही, इथे मॉरल व्हॅल्यूजची तुलना आहे. बहुसंख्य हिंदूंच्या – जे गौरक्षक नाहीत, हिंसेचे समर्थक नाहीत, इतकेच काय भाजपला मत देखील देत नाहीत – त्यांच्या श्रद्धेवर केवळ भाजपला विरोध म्हणून आघात करणे कितपत योग्य आहे? एखादा जीव गरज, भूक, न्याय इत्यादींसारख्या गोष्टींमुळे एक विशिष्ट पद्ध्तीने संपवणे म्हणजे मानवी पद्धत. तोच जीव केवळ विरोधाचा आक्रस्ताळेपणा करत कॅमेऱ्यासमोर इतरांना खिजवत एखादा इव्हेंट करून संपवणे ही पाशवी पद्धत आहे. ह्या पाशवी पद्धतीला उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणणे तर उच्च कोटींचा निर्बुद्धपणा म्हणावा लागेल!

बाबरी मस्जिद पाडली म्हणून मुंबईत स्फोट घडवणे ही दाऊदची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणावी का? स्वतंत्र हवंय म्हणणारे काश्मिरी अलगाववादी पंडितांचा जीव घेतात त्याला भारत सरकारच्या विरोधातली उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणता येईल का? नाही! हा नृशंसपणा आहे, क्रौर्य आहे, नीच पातळीचा पाशवीपणा आहे. ह्याचे समर्थन करणे तितकाच मोठा हलकटपणा आहे. एखाद्या सरकारचा, व्यवस्थेचा विरोध ते सरकार आणि ती व्यवस्था बदलून करता येतो. ही अशी पाशवी कृत्ये करून नाही.

देशात कुठल्याही गोष्टीवर वादविवाद, चर्चा जरूर व्हाव्यात पण विरोधी गटाच्या श्रद्धांची हेटाळणी- कुचेष्टा करून काहीही साध्य होणार नाही. काँग्रेस पक्षाच्या “त्या” युवा कार्यकर्त्यांनी २०१९ निवडणुकांसाठी मोदींच्या वतीने जय्यत तयारी केली हे मात्र खरे!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version