Site icon InMarathi

“शिवाजी महाराज आपल्या घरी आले होते, मी त्यांना जेवू घातलंय…” भाबड्या आईची गोड आठवण

shivaji maharaj inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : डॉ. चंद्रशेखर दाभाडकर

===

माझी आई तिच्या शेवटच्या काळात माझ्याकडे महाडला होती. आमच्यापेक्षा माझ्या लहान मुलाची, केदारची आणि तिची छान गट्टी जमली होती . तिच्या म्हातारपणातही आम्हाला तिचा धाक वाटायचा. पण केदार शाळेतून आला की आधी तिच्याकडे जायचा आणि घट्ट मिठी मारायचा आणि शाळेतल्या गोष्टी तिला सांगायचा. शेवटी शेवटी तिला विस्मरण झाले होते पण भूतकाळातील गोष्टी, अगदी तिच्या लहानपणाच्या गोष्टी तिला चांगल्याच आठवयच्या.

त्याने एकदा त्याच्या पुस्तकातली का इतर कुठे ऐकलेली इतिहासातील शिवाजी महाराजांची गोष्ट तिला सांगितली आणि ती म्हणाली ‘शिवाजी महाराज खूप वर्षांपूर्वी आपल्या घरी आले होते, दहा दिवस घरी राहिले, मी त्यांना माझ्या हाताने स्वयंपाक करून जेवू घातले आहे’.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

शिवाजी महाराजांचा विषय निघाला की ते हेच म्हणायची आणि आमची करमणूक व्हायची. पण माझे हे कोडे बरेच दिवस सुटले नाही.

नंतर काही दिवसांनी माझ्या एक गोष्ट लक्षात आली. माझे मोठे बंधू श्री. सुधीर दाभाडकर अ.भा.वि.प चे कार्यकर्ते, संघटक. त्यांच्याच माध्यमातून आमच्या गावी शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांनी व्याख्यानमाला ठेवली होती आणि कर्मधर्म संयोगाने त्यांची राहण्याची व्यवस्था आमच्या घरी होती.

त्या जुन्या काळातले ते आमचे ते जुने घर, जुन्या प्रकारचे न्हाणीघर, जुन्या काळातला पाणी तापवावयाचा बंब, खाली मांडी घालून जेवण्याची पद्धत, फारशा टेबल खुर्च्या नसलेली व्यवस्था, एखादा कॉट…. पण त्या काळात त्यांनी ते स्वीकारलं आणि चक्क दहा दिवस त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा आम्हा सर्व भावंडाना आणि कुटुंबाला सहवास लाभला !

मी तेंव्हा तिसरी, चौथीत असेन. एवढा मोठा माणूस आमच्या घरी राहतोय हे तेंव्हा कांहीच कळत नव्हते. आम्ही त्यांना एखाद्या सामान्य पाहुण्यासारखेच वागवीत असू. पण त्यांची सगळी व्याख्याने कानात, डोळ्यात प्राण आणून आम्ही सगळ्या भावंडांनी ऐकली होती.

 

 

आईच्या हातचेच घरचे पण दररोज गोडधोड जेवण त्यांना असावयाचे. हल्लीच्या काळात एखादा वक्ता आला तर तो कुणाच्या घरी राहील आणि घरचे जेवण घेईल ही कल्पना सहन होत नाही.

ते ब. मो. पुरंदरे आईच्या डोक्यात कधीतरी शिवाजी महाराज म्हणून शिरले असावेत.

घरी असताना त्यांनी एकदा मला गमतीने उंच कपाटावर ठेवलेले मला चांगलेच आठवते. त्या आमच्या लहानपणीच्या सवयीने मी वही समोर करून संदेश मागितला आणि त्यांनी संदेश दिला ‘खूप खेळा, खूप अभ्यास करा, खूप आनंदात राहा आणि खूप मोठे व्हा!’. आणि खाली त्यांची झोकदार सही! कुठे असेल ती वही आता? ती वही नसली तरी ती आठवण मनात कुठे तरी कोरली गेली आहे.

महाड येथील रक्तपेढीच्या उद्घाटनाला ते आले होते तेंव्हा तर वेगळाच किस्सा घडला. ते वेळेचे आणि शिस्तीचे उद्भोक्ते! त्यांचे व्याख्यानाही एक मिनिटं उशिरा सुरू होत नसे. उद्घाटनाची वेळ ५ वाजताची. साडेचारच्या दरम्यान ते रक्तपेढीत आले. खालच्या रोडवरच्या मंडपात माईक, स्पीकर, स्टेज अशी तयारी चालू होती.

चहा, पाणी गप्पा याच्या नादात पाच कधी वाजले कळाले नाही. आणि बरोबर पाच वाजता ताडकन उठून ते व्यासपीठावर पोहोचले आणि त्यांच्या लकबीने कुर्निसात घालून व्यासपीठावर स्थानापन्न झाले.

 

 

पुढे निमंत्रित आठ दहाच! त्यांच्या मागे आम्ही धावतपळत स्टेजवर! कसातरी कार्यक्रम सुरू केला आणि त्यांच्या भाषणापर्यंत मंडपात पुरेशी उपस्थिती झाली!

आज त्यांच्या जाण्याने आणि आणि त्या निमित्ताने आलेल्या या अनेक आठवणीने आणि माझ्या आईच्या आठवणीने डोळे भरून आले. एक ऋषितुल्य माणूस गेला आणि निःसीम शिवभक्त तारा निखळला .

साश्रु श्रद्धांजली !!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version