' “शिवसेनेचे हात नसतात, पाय असतात”; प्रत्येक मराठी मनाचा ठाव घेणारा महानायक – InMarathi

“शिवसेनेचे हात नसतात, पाय असतात”; प्रत्येक मराठी मनाचा ठाव घेणारा महानायक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

लेखिका: रमा दत्तात्रय गर्गे

===

मुलाखत घेणारा विचारत होता,

“बॉम्बस्फोट होतात! दंगली होतात! मग त्यामध्ये शिवसेनेचा हात असत नाही का?”

त्यावर मुलाखत देणारा म्हणतो,

“दंगलीत शिवसेनेचे हात नाही, तर पाय असतात!”

असे थेट उत्तर देणारा, सामान्य जनतेच्या हृदयावर राज्य करणारा हा कलंदर माणूस म्हणजे, बाळासाहेब ठाकरे होत!

Balasaheb Thackeray graphic inmarathi

 

बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकारांच्या घरात जन्माला आले. प्रबोधनकार ठाकरे इतिहास, नाट्य, पत्रकारिता, संपादन, समाजसुधारणा, संशोधन, पटकथालेखन अशा क्षेत्रात ठसा उमटवणारे आणि उत्कृष्ट वक्तृत्व असलेले भाषा कोविद होते. विचारवंत होते!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

मात्र त्यांचा हा मुलगा मनस्वी व्यंगचित्रकार निघाला!

balasaheb thakrey google search collage marathipizza

बाळासाहेबांची मोहिनी सर्वसामान्य माणसावर का पडली असेल याचा मी अनेकदा विचार करते. त्या त्या वेळी मला एक गोष्ट लक्षात येते.

माणसाचं मन नेहमी स्वतःशी बोलत असतं.

वेगवेगळ्या प्रकारे!

आणि वागताना मात्र व्यवहाराला धरून, फायद्याचं वागत असतं. तेच मन जर प्रकटपणे बोलू लागलं तर? तेव्हा ती व्यक्ती आपला प्रतिनिधी वाटू लागेल…!

बाळासाहेब ठाकरे मनात येईल ते बोलू शकत. जे बोलत त्याची जबाबदारी ते घेत असत. मग ती वक्तव्ये दक्षिणेकडच्या लोकांसाठी असोत कि उत्तरेकडच्या…!

balasaheb-inmarathi

मराठी माणसाला मनातल्या मनात हे कळत होतं की दक्षिणेकडचे लोक शिक्षणाच्या जोरावर आणि
यूपी गुजराती हे लोक मेहनतीच्या जोरावर पुढे जात आहेत.

पण तरीही मनातल्या मनात वाटायचं की “काय ही माणसं. आमच्याच राज्यात येऊन आम्हाला त्रास देतात.”

मग जेव्हा हीच गोष्ट लुंगी-पुंगी अशा भाषेत एखादं नेतृत्व बोलू लागतं तेव्हा ते आपल्याच मनाचे पडसाद वाटतात.

बाळासाहेबांनी मनुष्याची ही नस अचूक ओळखली होती! म्हणूनच त्यांनी नामांतराला विरोध केला, मंडल आयोगाला विरोध केला, मुस्लिमांना विरोध केला, तरी देखील त्यांच्या शिवसेनेत ओबीसी दलित मुस्लिम आदिवासी आदी शिवसैनिकांची भरपूर संख्या होती.

कारण त्या सैनिकांची बाळासाहेब ठाकरे बोलतात त्या वक्तव्याशी नव्हे तर बाळासाहेब ठाकऱ्यांशी बांधिलकी होती!

balasaheb-thakrey-inmarathi
anielpezarkar.wordpress.com

वैचारिक बैठक,तात्विक मांडणी असे काही नाही. मनाचे मनाशी नाते!

या कलंदर माणसाला सुरुवातीला चिडवले गेले. तुझी शिवसेना ही “वसंत सेना” आहे,असे म्हटले गेले. वसंतराव नाईकांच्या छत्रछायेखाली तुम्ही वाढत आहात असे म्हटले गेले. तेव्हा प्रतिवाद नाहीच. चिडवणाऱ्यांनी तोंडात बोटे घालावी असे काहीसे बाळासाहेबांनी करून दाखवले.

वसंतराव नाईक करत तसाच पोशाख करून ते अनेक दिवस ते वावरले.

आम्हाला राजकारण नाही तर समाजकारण करायचे आहे. त्याचे प्रमाण 80::20 असे आहे, हे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत असत.

जाहीरपणे त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर टीका केली, अशा सर्वांशी व्यक्तिगत आयुष्यात त्यांच्या अत्यंत प्रेमाचे सलोख्याचे संबंध होते. तेही लपून-छपून नाही.

sanjay-balasaheb-inmarathi
starsunfolded.com

कुठलीच गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवून केली नाही. जे आहे ते, ते मोकळेपणाने बोलत गेले. समर्थकांबरोबरच विरोधकांवर ही त्यांनी प्रेम केलं. आणि हवे त्याला हवे तिथे हवे तसे बोलूनही घेतले.

शिवसेना कधी मराठी बाण्यासाठी लढली. तर कधी हिंदुत्ववादासाठी लढली.भैया लोकांच्या गाड्या उलथवून टाकून शिव वडापाव स्थापित करण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला. रस्त्यावर नमाज चालू असतील तर तेथे महाआरत्या केल्या.

बाबरी ढाचा पाडल्यानंतर अभिमानाने त्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली.

बॉम्बस्फोटानंतरच्या दंगलीविषयी अत्यंत भडक वक्तव्य करून देखील त्यांना हात लावण्याचे धाडस शासनाला झाले नाही. त्यांचे बॉलिवूड मध्ये,राजकारणात सगळीकडे सबंध होते. आणि अगम्य परस्पर विरोधी वर्तन असूनही त्यांचे समर्थक त्यांना देव मानत होते!!

कोणत्या चौकटीत बसवायचे या मनुष्याला??

खरेतर बाळासाहेब कसे होते हे शोधणे, म्हणजे मानवी मनाचा शोध घेतल्यासारखे आहे!!

ते मानवी मनासारखे होते.

भावभावना, विचार, संवेदनशीलता, निष्ठुरता, करुणा, दया, मैत्री, प्रेम, आस्था, आपुलकी…सर्वकाही भरभरून नांदणारं स्वच्छ पारदर्शक नितळ मन!

या मनाला जशा कोणत्याही संविधानाच्या आणि घटनेच्या चौकटी रोखू शकत नाहीत तसेच बाळासाहेबांच्या मनाच्या प्रकट हुंकरालाही कोणतीही शक्ती रोखू शकली नाही…इतके ते स्वाभाविक होते…!

म्हणूनच त्यांची अंत्ययात्रा देखील अभूतपूर्व निघाली. आजही समर्थकांबरोबरच विरोधकही त्यांच्या आठवणीने गहिवरतात!! यातच त्यांचे मोठेपण सामावलेले आहे.

balasaheb thackeray cut outs mumbai inmarathi
indiatoday.in

बाळासाहेबांना खरं तर ही उपमा आवडली नसती. परंतु तरीही ती देण्याचा मोह मला आवरत नाही .

बाळासाहेब पाणीपुरी सारखे होते. एकाचवेळी तिखट आंबट गोड खारट.

पाण्यासारखे मृदु आणि पुरीच्या आवरणासारखे कठोर…खाताना चरचरीत आनंद मिळतो. गोड चव झणझणीत तिखटपणात मिसळून जाते.

आंबट खारट चव जिभेवर तृप्ती आणते. आणि त्याचवेळी डोळ्यातून पाणीही येते.

पण पुन:पुन्हा खावीही वाटते…

अशी भैया कडची पाणीपुरी म्हणजे बाळासाहेबांचे मन होते…व्यक्तित्व होते!

बाळासाहेब म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे बाळासाहेब!!

१२ नोव्हेंबर २०१२ रोजी जेव्हा त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणलं, तेव्हापासून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील माणूस सकाळ संध्याकाळ बाळासाहेबांच्या तब्येतीची माहिती करून घेत होता. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी काळाने घाला घातला. आणि हे प्रकटमन काळाच्या पडद्याआड गेले.

पण मराठी माणूस जोवर आहे आणि जिथे आहे, बाळासाहेबांची, त्यांच्या कलंदरपणाची, त्यांच्या दिलदारपणाची, त्यांच्या भडकपणाची, त्यांच्या सर्वसमावेशक स्वभावाची आठवण करतच राहणार, यात शंकाच नाही.

बाळासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?