Site icon InMarathi

‘२५१ रुपयांत स्मार्टफोन’ असं स्वप्नं दाखवणाऱ्या “या” कंपनीचं पुढे काय झालं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या आपण सगळेच एका गोष्टीशी सतत कनेक्टेड असतो ती म्हणजे इंटरनेट आणि स्मार्टफोन. अंबानी साहेबांच्या कृपेमुळे अत्यंत स्वस्त दरात फास्ट ४जी इंटरनेट उपलब्ध झालं आणि मोठमोठ्या कंपन्यांचे तीन तेरा वाजले.

BSNL सारख्या सरकारी कंपन्यांवर धंदा बंद करायची वेळ आली, तर वोडाफोन आणि आयडियासारख्या कंपन्यांनी एकत्र येऊन जिओला टक्कर देण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले, तरी जियोची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

२०१६ साली नोयडाच्या कंपनीने टेक्नॉलॉजीच्या विश्वात असाच एक भूकंप आणला होता, त्या कंपनीचं नाव होतं रींगिंग बेल्स! या कंपनीने सर्वात स्वस्त फोन म्हणजेच तब्बल २५१ रुपयात स्मार्टफोन बाजारात आणण्याची घोषणा केली होती.

सध्या जरी स्मार्टफोनचा सुळसुळाट झालाअसला तरी ४ वर्षांपूर्वी परिस्थिती जरा वेगळी होती, आजच्या एवढी स्पर्धा तेव्हा नव्हती, मोबाईल अगदीच सर्रास झाले होते पण इंटरनेटसारख्या सुविधांसोबत वापरला जाणार स्मार्टफोन ही तशी चंगळच होती.

अशा काळात एवढ्या कमी किंमतीत स्मार्टफोन देण्याची घोषणा केल्याने कित्येकांच्या भुवया उंचावल्या होत्या, हा स्मार्टफोन नेमका कसा असेल, त्यात नेमकी कोणती फिचर्स असतील याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती, शिवाय खरंच एवढ्या कमी किंमतीत हा फोन मिळू शकेल का? अशी शंकासुद्धा आली.

 

 

यावर कळस म्हणजे रींगिंग बेल्स या कंपनीने एक मोठा इव्हेंट करून हा फोन लॉंच केला, या फोनची डिटेल माहिती लोकांना सांगितली, शिवाय मोबाईलच्या ऑनलाइन बुकिंग संदर्भातसुद्धा माहिती दिली.

शिवाय या इव्हेंटमधून मेक इन इंडियासारखे स्लोगन्स वापरुन किंवा फोनला फ्रीडम २५१ नाव देऊन, तिरंग्याचा वापर करून असं भासवण्यात आलं की एक सरकारी स्कीम असून याला भारत सरकारचा पाठिंबा आहे.

कंपनीचे फाऊंडर मोहित गोयल यांनी खुद्द यासंदर्भात भाष्य केल्याने यावर बऱ्याच लोकांचा विश्वास बसला खरा, खरंतर यात नक्कीच काहीतरी काळंबेरं असण्याची शंका बऱ्याच लोकांनी व्यक्त केली होती, पण ज्या पद्धतीने या फोनची घोषणा झाली ते पाहता यात काहीच खोट काढता येणं तसं शक्य नव्हतं.

 

फ्रीडम २५१ फोनचं ऑनलाइन बुकिंग जसं सुरू झालं तसं त्यांची साईट ही सतत क्रॅश होत होती. बऱ्याच लोकांच्या बँकेतून पैसे डेबिट झाले पण त्याची कसलीच पोचपावती किंवा रीसीप्ट ग्राहकांना मिळत नव्हती, कित्येक लोकांच्या सिस्टिमवर साईटसुद्धा नीट दिसत नव्हती.

तेव्हाच consumer forum मध्ये ही कंपनी फ्रॉड असल्याच्या बऱ्याच तक्रारी नोंदवल्या गेल्या. काही दिवसांनी कंपनीने दावा केला की २५ लाख फोनचं बुकिंग झालं असून जून २०१६ पर्यंत ग्राहकांना फोन उपलब्ध करून दिला जाईल.

यापैकी काहीच घडलं नाही, काहींना फोन मिळाले तर काहींना नाही, यामुळे आणखीन गदारोळ वाढला. ही पाहता कंपनीने प्री-बुकिंग केलेल्या ग्राहकांचे पैसे परत करण्याचा निर्णय जाहीर केला.

 

 

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी हा मुद्दा उचलून धरला, तब्बल २०० करोडच्या या घोटाळ्यात कंपनीचे मालक मोहित गोयल आणि अशोक चढ्ढा यांच्याविरोधात फसवणूक आणि आयटी अॅक्टअंतर्गत तक्रार दाखल केली.

या सगळ्या प्रकरणात रींगिंग बेल्स या कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली, तेव्हा उच्च न्यायालयाने मोहित गोयलसह इतरही डायरेक्टरचे पासपोर्ट जप्त केले. कंपनीसमोरचे अडथळे काही केल्या कमी होत नव्हते, शिवाय कंपनीचे ऑफिस नोयडामधून हलवण्याचेसुद्धा प्रयत्न सुरू होते.

 

 

ज्या ग्राहकांना मोबाईल मिळालेला नाही, त्यांचे पैसे पेमेंट गेटवे मार्फत परत केल्याचे पुरावे खुद्द मोहित गोयल यांनी सादर केले, यानंतर काहीच दिवसांनी मोहित गोयल यांनी कंपनीतून निवृत्ती घेत कंपनीची धुरा आपल्या भावाच्या हाती सुपूर्त केली.

यानंत क्राइम ब्रांचने या प्रकरणात तपास करून कंपनीला क्लीन चीट दिली खरी पण मोहित गोयल यांच्या मार्गतले अडथळे संपायचं नाव घेत नव्हते. द्वारकामधल्या एका बलात्कार पीडित तरुणीला धमकावण्याचे आरोपसुद्धा मोहित यांच्यावर लागले, त्यांना अटक झाली आणि जामीनसुद्धा मिळाला.

यानंतर काहीच दिवसांनी ग्रेटर नोयडामधून पुन्हा मोहित गोयल यांना अटक करण्यात आली. ड्राय फ्रूट बिझनेसमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली गेली, आणि त्यासाठीच मोहित यांना अटक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

 

 

या स्कीमला Ponzi scheme हे नाव चिकटलं आणि अर्थातच रींगिंग बेल्स या कंपनीला त्यांचा गाशा गुंडाळावा लागला. स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रोनिक उत्पादनात व्यवहार करणाऱ्या या कंपनीला त्यांचा अति-आत्मविश्वास नडला हेच खरं!

स्वस्तात स्वस्त एंट्री लेवल स्मार्टफोन आजच्या काळातही कमीतकमी ५००० रुपयात येतो, तर ४ वर्षांपूर्वी २५० रुपयात फोन विकायच्या स्वप्नाला मूर्खपणाच म्हणावं लागेल, फोनमधल्या छोट्या छोट्या पार्ट्सची मिळून किंमत जरी काढली तरी ती यापेक्षा नक्कीच जास्त असेल.

हा अंदाज या कंपनीने कधीच लावला नाही का? का फक्त लोकांना लुबाडून त्यांचे पैसे लुटणे हाच यांचा मूळ हेतु होता यावर निष्कर्ष काढण्यात काही अर्थ नाही.

 

 

या सगळ्या प्रकारातून तुमच्या आमच्यासारख्या ग्राहकांनी एकच गोष्ट शिकायची ती म्हणजे कान, डोळे उघडे ठेवायचे आणि या अशा स्कीम्स भविष्यात आल्या तर त्यांची कसून चौकशी केल्याशिवाय त्यावाटेला जायचंच नाही!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version