जगभरात प्रसिद्ध असलेल्या मोनॉपॉली या बैठ्या खेळाच्या जन्मदात्रीवरील अन्यायाची कहाणी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणी नवा व्यापार नावाचा खेळ खेळला असेल. मुलं जेव्हा ल्यूडो, सापशिडी खेळत तेव्हा मोठ्या भावंडांना नवा व्यापार खेळताना बघत असत. खेळाच्या बोर्डवर असणारी मुंबईतील विविध ठिकाणांची नावे व चित्रे, नोटा, फासे यामुळे नवा व्यापारविषयी एक विशेष आकर्षण आधीच तयार होई.
मुळात हा खेळ अमेरिकेत मोनॉपॉली या नावाने जन्माला आला. १९०६साली पार्कर ब्रदर्स नावाच्या खेळांच्या कंपनीने हा खेळ प्रथम व्यावसायिकरित्या मोठ्या प्रमाणात बाजारात आणला. फिलाडेल्फिया शहरातील चार्लस् डॅरो या फिरत्या विक्रेत्याकडून हा खेळ जरी पार्कर ब्रदर्स कंपनीने विकत घेतला असला तरी हा खेळ त्याच्या कल्पनेतून साकारला नव्हता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
१९०३साली एलिझाबेथ मॅगी या तरुणीने हा खेळ तयार केला होता. तिने त्याचे पेटंटही घेतले होते. पण त्यानंतर सुमारे तीस वर्षांनी चार्लस् डॅरोने या खेळाच्या दर्शनी आकर्षकतेत काही थोडेफार बदल करून तो स्वतःच् तयार केल्याच्या बतावणीसह पार्कर ब्रदर्स कंपनीला विकला.
या व्यवहारातून त्याने भरपूर पैसे व प्रसिद्धी मिळवली. पण खेळाच्या मूळ निर्मातीला तिचे श्रेय आणि रास्त पैसे यांपासून कायम वंचित ठेवण्यात आले. मेरी पिलॉन या अमेरिकन पत्रकार, लेखिकेच्या ‘द मोनॉपॉलिस्ट’ या पुस्तकामध्ये या अन्यायाची कहाणी वाचता येते.
१८६६मध्ये इलिनॉईस या ग्रामीण प्रांतात जन्मलेल्या एलिझाबेथचे वडील जेम्स मॅगी हे रिपब्लिकन पक्षाचे खंदे सदस्य आणि अब्राहम लिंकन यांचे सहकारी होते. ते राजकीय वकील, प्रभावशाली वृत्तपत्र संपादक आणि स्त्रीवादी विचारवंत होते.
जमीनदार व धनदांडग्यांनी संपत्ती व जमिनींचे केंद्रीकरण करण्याला त्यांचा विरोध होता. साहजिकच मेरीवर आपल्या वडीलांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. वडिलांनी भेट दिलेल्या हेन्री जॉर्ज लिखित ‘प्रोग्रेस ॲन्ड पॉवर्टी’ या पुस्तकातील मते तिच्या मनावर ठसली होती.
तरूण झाल्यावर लग्नाच्या बंधनात अडकण्या ऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविण्याला महत्त्व देणाऱ्या एलिझाबेथने वॉशिंग्टन डि.सी. येथे जाऊन स्टेनोग्राफरची नोकरी पत्करली. कविता व लघुकथा लिहिण्याबरोबरच छोट्याछोट्या प्रहसनांमध्ये ती काम करत असे. तसेच फावल्या वेळात ती एक खास बोर्डगेमसुद्धा (एक प्रकारचा बैठा खेळ) तयार करत असे. या खेळाचे नाव तिने ‘लॅन्डलॉर्डस् गेम’ असे ठेवले होते. त्याकाळी ॲन्ड्र्यू कार्नेजी, जॉन रॉकफेलर अशा अब्जाधिशांचा मोठा बोलबाला होता.
१९०३साली तिने या खेळाचे स्वामित्वसुद्धा (पेटंट) सरकारदरबारी नोंदवले होते. स्पर्धात्मक असा मोनॉपॉली आणि समतावादी असा ॲन्टी मोनॉपॉली असे या खेळाचे दोन प्रकार तिने तयार केले होते.
मोनॉपॉली खेळात जिंकणारा स्वतःची खेळातील मालमत्ता व संपत्ती वाढवून प्रतिस्पर्ध्यांना कंगाल करत असे तर ॲन्टी मोनॉपॉली खेळात संपत्ती निर्माण झाली की सर्व स्पर्धकांना तिचा वाटा मिळत असे. एलिझाबेथला अपेक्षित नव्हते की मोनॉपॉली या खेळाचे चाहते वाढत जाऊन तोच लोकप्रिय होईल.
हळूहळू घराघरांमधून, महाविद्यालयांमधून हा खेळ खेळला जाऊ लागला. सुमारे तीन दशकांनी म्हणजे १९३२साली चार्लस् टॉड या व्यावसायिकाने त्याच्या चार्लस डॉरो या मित्राला हा खेळ खेळण्यासाठी सपत्नीक आमंत्रण दिलं. हा खेळ त्यांना इतका आवडला की टॉडने त्यांना स्वतंत्र संच तयार करून दिला. मग डॉरो याने आपल्या इतर मित्रांना या खेळाची ओळख करून दिली.
सर्वांनाच या खेळाचे वेड लागले. त्यावेळी डॉरोची आर्थिक स्थिती बिकट होती. जागतिक मंदीमुळे एकूणच अमेरिकेतील औद्योगिक विश्व डळमळलेले होते. डॉरोच्या मनात एक कल्पना आली. त्याने टॉडकडे या खेळाच्या लिखित नियमावलीची प्रत मागितली.
जेव्हा अशी नियमावली त्याला मिळाली नाही तेव्हा त्याने या खेळाच्या दर्शनी गोष्टींमध्ये थोडेफार फेरफार केले. त्याचे नियम लिहून काढले आणि हा खेळ स्वतः तयार केलेला असे भासवून पार्कर ब्रदर्स या खेळ निर्मात्या कंपनीला विकला.
पार्कर ब्रदर्सनी मोठ्या प्रमाणात या खेळाच्या संचांचे उत्पादन आणि प्रचार केला. कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी एलिझाबेथ मॅगीकडून तिचे पेटंट फक्त ५०० डॉलर्स इतक्या नाममात्र किंमत देऊन विकत घेतले.
विकल्या जाणाऱ्या संचावर तिला कोणत्याही प्रकारची रॉयल्टी देण्यात आली नाही. जेव्हा बाजारात तिचा खेळ वेगळ्या नावाने व तिच्या उल्लेखाशिवाय आलेला बघितला तेव्हा एलिझाबेथला झालेल्या फसवणुकीची कल्पना आली.
तिने त्याबद्दल टिकाही केली पण पार्कर ब्रदर्स आणि चार्लस डॉरो यांनी सर्व फसवणूक करताना सर्व कायदेशीर खबरदारी घेतली होती. त्यामुळे तिला विशेष काही करता आले नाही. चार्लस डॉरोला आयुष्यभर या खेळामुळे विपूल संपत्ती मिळाली.
पार्कर ब्रदर्स कंपनीनेही प्रचंड नफा मिळवला. एलिझाबेथ मात्र वयाच्या ८१व्या वर्षी तिने तयार केलेल्या खेळाची लोकप्रियता बघत पण त्याचे जनकत्व दुसऱ्याने चोरल्याची खंत बाळगत निधन पावली.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.