Site icon InMarathi

संसारातून पळून गेल्याने विठोबा प्रसन्न होत नाही! : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २२

saint tukaram im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २१

===

मंडळी आंसगावात पोहोचली तेव्हा इतका उशीर झाला होता की घाईघाईत तयार होऊन नारायणाला कीर्तनाला उभे राहावे लागले. गर्दी तुफान होती. मंदिरात बसायला जागा नव्हती, बाहेर उभे राहायला. नारायणालाच कशीबशी वाट काढत जागेपर्यंत पोहोचावे लागले. साथीदार तयार होते. मागे टाळालाही गावातली मुले झांजा धरून तयार होती.

नारायणाने पूर्वरंगाला अभंग घेतला,

आवडीने भावे हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ||
नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे ||
सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही ||
जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे ||
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला ||

देहूच्या कीर्तनात नारायणाने हा अभंग ‘गायला’ घेतला होता. आज त्याने मनावर घेतले की आपला अभ्यास कमी असेल पण गाणे कमी आणि सांगणे जास्ती व्हायला हवे. तुकोबांचे आजपासूनच ऐकायचे. जमेल तितके जमेल. ते आपल्या मागे आहेत. आज अभंग गायचा नाही, तर, ‘सोडवायचा’.

मनात असा निश्चय धरून नारायण बोलू लागला,

मंडळी, एकनाथ महाराजांचे हे शब्द आहेत. सामान्य माणसाचे नव्हेत. ते म्हणतात,

 

आवडीने भावे हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।।

हरिचे नाम घ्या, त्याला तुमची चिंता आहे! आता कुणी म्हणेल की किती सोपे आहे हे! सहज जमेल. तर तसे नाही बरं. दिसतो इतका काही सोपा अभंग नाही हा. अनेकांना सोपा वाटतो. असाच एका माणसाला वाटला. त्याच्या गावात एक सत्पुरुष राहात होता. त्या सत्पुरुषाला हा म्हणाला,

हरिनाम घेतल्याने हरि सर्व चिंता वाहायला तयार असेल तर फारच छान झाले.

त्यावर तो सत्पुरुष म्हणाला,

अहो राव, सांगणे इतके सोपे असते तर संतांना अवघा जीव लोकांना समजावण्याच्या कामी लावावा लागला नसता. हरिनाम घ्या इतकेच सांगितलेले नाही तर आवडीने घ्यायला सांगितले आहे.

हे ऐकून तो माणूस म्हणतो,

जो नाम घेईल तो आवड असल्याखेरीज थोडाच घेईल? जे जे हरिनाम घेतात ते आवडीनेच घेतात.

यावर त्या सत्पुरुषाने काय सांगितले, ते मंडळी, लक्षपूर्वक ऐका. तो म्हणाला,

हरिनामाची आवड म्हणजे मला हे खायला आवडते, ते ल्यायला आवडते अशी अजून एक आवड समजता की काय तुम्ही? देहाला खूष करणाऱ्या सगळ्या आवडींचा त्याग केल्यावर मनात जो भाव उरतो, त्या भावे – हरिनाम घेतले तर ती हरिनामाची आवड. सगळे चित्त संसारात आणि हातात हरिनामाची माळ! हे हरिनाम घेणे नव्हे, ते हरिनाम घेण्याचे नाटक ते! एकभावाने, ज्याची एकच आवड उरली आहे त्याने हरिनाम घेतले तर हरि त्याची चिंता करतो असे एकनाथ महाराज म्हणतात…..बोला…पुंडलिक वरदा हरि विठ्ठल! पंढरीनाथ महाराज की जय!

हे ऐकल्यावर तो मनुष्य विचारतो,

हे तर फारच कठीण झाले! असे कुणाचे होईल? कसे होईल?

तो सत्पुरुष म्हणाला,

होईल बरे, होईल. एकनाथ महाराजांनी पुढच्याच कडव्यात सांगितलंय, आपल्या मनासारखे होत नाही म्हणून दुःख करायची तुला सवय आहे ती सोडायचा प्रयत्न कर. भगवंत सारे जाणतो हा विश्वास मनात धर. अरे, तो अवघे जग सांभाळतो. सकल जीवांचा तोच सांभाळ करतो. तो इतरांची काळजी करील आणि तुलाच सोडील(मोकलिल) असे होईलच कसे? तुझी आजची जी स्थिती आहे ती स्वीकारण्याचा तू आधी प्रयत्न कर आणि आधी आजच्या स्थितीला शोभेसे जगून दाखव. मग तू जे काही चांगला वाईट वागला असशील त्याला कशी फळे लागतात ते तुला तटस्थपणे पाहता येईल. तुझ्या बाबतीत जे काही घडते आहे ते तुझे प्रारब्ध आहे असे समज आणि शांत हो. जोवर शांत होत नाहीस तोवर तुझ्या मनासारखे व्हायचे नाही. शांत होण्यासाठी आवडीने भावे हरिनाम घेणे हाच मार्ग आहे. तेवढी एक आवड राखलीस की तुला असा अनुभव येईल की प्रारब्धाचे भोग आहेत तसेच आहेत पण त्यापासून आता मी अलिप्त झालो आहे, जणू, माझ्या प्रारब्धाचा नाश झाला आहे!
बोला…पुंडलिक वरदा हरि विठ्ठल! पंढरीनाथ महाराज की जय!

इतके ऐकूनही तो शंकेखोर मनुष्य म्हणतो,

जोवर असे म्हणणारा कुणी भेटत नाही, असे जगलेला कुणी भेटत नाही, तोवर एकनाथ महाराजांचे मी तरी खरे म्हणणार नाही!

तो जो सत्पुरुष होता तो खरेच सत्पुरुष होता. ह्याच्या अशा बोलण्याने तो रागावला नाही. म्हणाला,

बाबा रे, तू नशीबवान. तुकोबांच्या काळात जन्माला आलास. जा देहूला. त्यांना विचार. ते असेच जगतात आणि असेच बोलतात. खरेच, तुकोबाही एकनाथ महाराजांसारखेच म्हणतात,

 

माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभे ।।
विसरेना रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ।।
विसरतां हरि क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ।।
तुका ह्मणे माझ्या विठोबाचे पाये । संजीवनी आहे हृदयामाजी ।।

 

बघा, विषय तोच आहे, जरा वेगळ्या भाषेत मांडला आहे इतकंच. तुकोबा म्हणतात, माझी चिंता सर्व आहे विठोबासी. तो माझी काळजी करतो. आणि मी ही त्याचे पाय सोडत नाही! खरे तर असे आहे तुकोबा त्याचे पाय कधीच सोडत नाहीत आणि म्हणून त्यांची सर्व चिंता तो वाहतो. क्रम असा आहे बरं. तुकोबांनी त्याचे पाय धरले म्हणून त्यांचा भार विठोबाने घेतला असा क्रम आहे. पाय धरणे आणि हरिनाम घेणे ह्याचा अर्थ एकच हो. सतत त्याची आठवण राहणे म्हणजे हरिनाम घेणे. म्हणजेच त्याला धरून राहणे. आणि विचार करा, आपल्याला कसली आठवण असते? आपल्याला आठवण असते संसारातील क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींची. सुनेने दही विरजलं की नाही, विरजण जास्ती तर पडले नसेल ना ही सासूला काळजी! (हंशा) तर उद्या सासू जास्तीचं दळायला काढील का ही सुनेला चिंता!( पुन्हा हंशा) बोला…पुंडलिक वरदा हरि विठ्ठल! पंढरीनाथ महाराज की जय!

 

इतक्या साध्यासाध्या गोष्टीत मन गुंतलं तर विठोबाची आठवण यायची कधी? विठोबा म्हणतो, तुला माझी आठवण नाही ना? मग ठीक आहे, तूच वाहा तुझ्या संसाराचा भार! माणसालाही वाटतं, मी वाहीन माझं ओझं. मला विठोबा हवा कशाला? मग माणूस काय करतो, आपला भार वाढवत जातो. किती वाढवतो? तर न पेलेल इतका वाढवतो. कंबरेत वाकून चालता येईनासं झालं की तो तक्रार करायला लागतो, म्हणायला लागतो, जगात देव आहे की नाही? पाहा, म्हणजे, भार वाढवला याने आणि तो पेलायचा देवाने! मग हा संतांना शरण जातो आणि विचारतो, हे पेलत नाही हो, काय करू? संत म्हणतात, ते खांद्यावरचे ओझे फेक आधी! तर हा म्हणतो, तसं कसं? ते तर माझं आहे! व्वा रे व्वा! ते तुझं आहे काय? आणि तू रे कोणाचा आहेस? तिकडे नदीवर पोचवायची वेळ आली की जाशील ना चालत?(हंशा) की चार लोकांना त्याही स्थितीत हांक मारशील?(अजून हंशा) बोला…पुंडलिक वरदा हरि विठ्ठल! पंढरीनाथ महाराज की जय!

 

तर मंडळी, आपण हसलो खरं पण ती वेळ रडायची असते नाही? माझं माझं करीत वाढवलेला हा संसार सोडून जाताना किती दुःख होत असेल नाही? त्यापेक्षा संसार आत्ताच सोडून दिलेला काय वाईट? सोडायचा म्हणजे घरातून पळून जायचं नाही हो! नाहीतर इथला एक मनुष्य तुकोबांकडे तक्रार घेऊन जाईल की तुमच्या नारायणाने घर सोडायला सांगितलं म्हणून आलो!(हंशा) तर तुकोबा म्हणतील, आधी घरी जा आणि नीट संसार कर! अहो, संसारातून पळून गेल्याने विठोबा प्रसन्न होत नाही! संसार करताना त्याची आठवण ठेवली की मग तो प्रसन्न होतो! आणि आठवण कशाने राहते तर संसाराचे हे ओझे माझे नाही असा भाव मनात धरल्याने होते. तसा भाव उपजावा म्हणून हरिनाम घ्यायचे. मग तो आपली चिंता तो वाहतो.
एकनाथ महाराजांनी विश्वास दिला आहे ना?

 

आवडीने भावे हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ||
नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे ||
सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही ||
जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे ||
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला ||

नारायणाने पूर्वरंग असा संपविला.

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version