Site icon InMarathi

अभिनयाच्या प्रेमापोटी तिने सोडली बँकेतली नोकरी आणि बॉलीवूडला मिळाली प्रेमळ ‘आई’

rima lagoo feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

९० च्या दशकात हिंदी चित्रपटांत नायक नायिकांची आई म्हणून नावारूपाला येणाऱ्या रीमा लागू ह्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने रुपेरी पडदाच नव्हे तर रंगभूमी आणि मालिका देखील गाजवल्या आहेत.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका साकारल्या आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्यांनी गुजराती नाटके, कन्नड आणि भोजपुरी चित्रपटांतून देखील काम केले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

   

त्यांनी आई म्हणून काम करण्यास सुरुवात करण्याआधी बॉलिवूडमधील आईची प्रतिमा ही टिपिकल गरीब स्वभावाची, सोशिक, पांढरी साडी नेसलेली रडत आयुष्य काढणारी अशीच होती, पण वय लहान असतानाही आईची भूमिका उत्तम प्रकारे वठवणाऱ्या रीमा लागूंनी बॉलिवूडमधील आईची प्रतिमाच बदलून टाकली.

त्यांनी एक मॉडर्न, ग्लॅमरस, हसतमुख पण सोज्वळ, सात्विक, मुलांची जवळची मैत्रीण असलेली आई पडद्यावर उभी केली.

 

 

रीमा लागू म्हणजेच पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे यांचा जन्म मुंबईतील गिरगांव येथे २१ जून १९५८ रोजी झाला. सुमारे चार दशके इतका काळ आपल्या अभिनयाने गाजवणाऱ्या रीमा लागूंनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात एका मराठी चित्रपटातून केली. त्यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आई मंदाकिनी भडभडे यांच्याकडून मिळाला.

त्यांचे प्राथमिक शिक्षण गिरगावातील शाळांमध्ये झाले. बालपणापासूनच त्यांचे अभिनयक्षेत्राशी नाते जोडले गेले. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असली तरी त्यांच्या आईची इच्छा होती, की त्यांनी आधी शिक्षणाला प्राधान्य द्यावे. म्हणूनच त्यांच्या आईने त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्यात पाठवले.

पुण्यातील प्रसिद्ध हुजूरपागा शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. तिथेही त्यांनी त्यांच्या कलेची चुणूक दाखवल्यामुळे आठव्या इयत्तेतच त्यांना आंतरशालेय नाट्यस्पर्धेतून अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यांनी शालेय जीवनात मराठी आणि हिंदी नाटकांतून भूमिका केल्या. त्यांच्या उत्तम अभिनयाची तेथे नोंद घेतली गेली.

त्यांची लक्षात राहण्यासारखी नाटके म्हणजे “वीज म्हणाली धरतीला” आणि “काबुलीवाला” ही आहेत. त्यांचे काबुलीवाला मधील काम बघून तर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहायचे नाही. गंमत म्हणजे शाळेत असताना त्यांना नाटकातील पुरुष व्यक्तिरेखा रंगवाव्या लागत असत.

 

 

शाळेच्या अखेरच्या वर्षी त्यांनी नटसम्राट या प्रसिद्ध नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका साकारली होती. १९७४ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर रीमा लागूंनी मुंबईत विल्सन महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. आणि तिथेही त्यांचा नाट्यप्रवास सुरूच राहिला.

त्या “ती फुलराणी” या नाटकात भूमिका करू लागल्या. तसेच श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीतही काम करण्याची संधी त्यांना मिळाली. ती जाहिरात बरीच गाजली आणि त्यामुळे अभिनय क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

शिक्षण झाल्यानंतर त्यांनी बँकेत काम करण्यास सुरुवात केली. बँकेत काम करताना अभिनेते विवेक लागू यांच्याशी त्यांची ओळख झाली. विवेक लागू हे देखील त्याच बँकेत नोकरी करत होते.

दोघेही उत्तम रंगकर्मी असल्याने त्यांची एकमेकांशी मैत्री झाली. नंतर त्यांनी एकमेकांशी लग्न केले व नयन भडभडेंची रीमा लागू झाली.

बँकेतली नोकरी आणि अभिनयातील कारकीर्द या दोन्हींचा तोल एकत्र सांभाळणे अवघड झाल्याने त्यांनी बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णपणे अभिनयाकडे लक्ष केंद्रित केले.

 

 

नंतर काही कारणांमुळे विवेक लागू व रीमा लागू विभक्त झाले. विभक्त झाल्यानंतर देखील त्यांनी रीमा लागू हीच ओळख कायम ठेवली. मुलगी मृण्मयी लागूची जबाबदारी रीमा लागूंनी घेतली.

१९८०-९० च्या दशकात त्यांनी आमिर खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, करिष्मा कपूर, जुही चावला यांसारख्या अभिनेत्यांची आई पडद्यावर साकारली.

कयामत से कयामत तक, मैने प्यार किया, वास्तव, साजन, हम आपके है कौन, कुछ कुछ होता है, हम साथ साथ है, जुडवा, निश्चय, हीना, कल हो ना हो अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून आईची भूमिका केली आहे. त्यांच्या खानदान, तू तू मैं मैं , श्रीमान श्रीमती या मालिका देखील लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतल्या.

के दिल अभी भरा नही, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, सविता दामोदर परांजपे, शांतेचं  कार्ट चालू आहे, सासू माझी ढासू, सौजन्याची ऐशी तैशी, पुरुष, बुलंद, घर तिघांचं हवं, छाप काटा, ती फुलराणी ही त्यांची काही गाजलेली मराठी नाटकं, तर अरे संसार संसार, आपलं घर, आईशप्पथ, जिवलगा, बिनधास्त, सिंहासन, हा माझा मार्ग एकला, शुभ मंगल सावधान, धूसर हे आणि इतर अनेक त्यांचे मराठी चित्रपट आहेत.

१९९३ साली संजय दत्त आणि श्रीदेवी यांच्या भूमिका असलेल्या गुमराह या चित्रपटात रीमा  श्रीदेवीच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्यात त्यांचा जबरदस्त अभिनय बघून श्रीदेवीला प्रेक्षकांवर रीमा लागूंचीच जादू चालेल ही भीती वाटल्याने तिने दिग्दर्शक महेश भट्ट आणि निर्माते यश जौहर यांना रीमाचे सीन कट करण्यास सांगितले.

 

 

खरं तर यश जौहर यांना रीमांचे सीन कट करायचे नव्हते, पण नाईलाज म्हणून त्यांना रीमा लागूंचे सीन कट करावे लागले. याचे त्यांना वाईट वाटले आणि त्यांनी रीमा लागूंना वचन दिले, की त्यांच्या सगळ्या चित्रपटांत रीमाच आईची भूमिका साकारतील. आणि तसेच झाले. रीमा लागूंनी सुद्धा त्या सगळ्या भूमिकांचे सोने केले.

वास्तव चित्रपटाचे शूटिंग करताना जेव्हा संजय दत्तची आईच त्याला शेवटी गोळी मारते, त्या सीनचे रीमा लागूंना खूप टेन्शन आले होते. एकतर ती बंदूक जड होती आणि ती उचलताना रीमांना त्रास होत होता. तरीही त्यांनी तो सीन इतका सुंदर अभिनीत केला, की तो बघताना प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येते इतकी त्यांच्या अभिनयाची ताकद होती.

१८ मे रोजी २०१७ रोजी नामकरण या मालिकेचे शूटिंग करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. संध्याकाळी त्या घरी परतल्या आणि मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले असता त्यांचे कार्डियाक अरेस्टने अकाली निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय केवळ ५८ वर्षे होते.

आपल्या कारकिर्दीत ९० हुन अधिक चित्रपट, जाहिराती व अनेक मालिकांमध्ये भूमिका केलेल्या रीमा लागूंची कमतरता आजही जाणवते. आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात त्यांचा हसतमुख चेहरा आणि त्यांच्या भूमिकांच्या आठवणी ताज्या आहेत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :   

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version