मराठी इंडस्ट्रीच्या फेडररची ओळख तुम्हाला अजूनही पटली नसेल तर हे वाचाच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक – स्वागत पाटणकर
—
हे नाटक बघताना प्रेक्षक हसून लोळायला लागतो. साधारण १५ वर्षांपूर्वी अशी जाहिरात असलेलं एक नाटक रंगभूमीवर आलं होतं.
जितू जोशी होता त्यात, बाकी सगळे अनोखळी. जितूचपण पहिल वगैरे व्यावसायिक नाटक असेल कदाचित. आपण तेव्हा भारत नाट्य मंदिर बाहेर पडिकच असायचो, म्हणलं चला तसाही वेळ आहेच आपल्याकडे, तर जरा नवीन लोकांना प्रोत्साहन देऊ, अशा पुणेरी तोऱ्यात तिकिट्स काढली आणि गेलो.
नाटक सुरु होताच एक ५-१० मिनिटात हास्याचे फवारे उडायला लागले. पुण्यात जसं हॉटेलचे रेट्स वाढत जातात तसाच प्रेक्षागृहात हसण्याचा आवाज वाढतच जात होता.
कमरेखालचे विनोद, द्विअर्थी डायलॉग्स, आचरटपणा हे असलं काहीही न करता हे नाटक आम्हाला सलग २-३ तास हसवत होतं.
मनातल्या मनात गुदगुल्या, मार्मिक विनोद, निखळ हास्य स्मित हास्य, जोरतजोरात हसणं ह्याचा स्लो कुकिंगसारखा इफेक्ट होऊन शेवटच्या अर्धा तासात दुखलेल्या गालांसकट एका सीनमध्ये ऍक्च्युली लोळायला लागलो.
हसण्याला इंग्लिशमध्ये लोळ (lol) का म्हणतात हे आय गेस तेव्हा मला कळलं. नाटक होतं, परेश मोकाशी दिग्दर्शित “मुक्कामपोस्ट बोंबीलवाडी”
परेश मोकाशी!!! माणसानी किती गुणी असावं, किती कष्टाळू, किती ‘बाप’ असूनही किती साधं असावं, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे परेश मोकाशी! मला तर अनेक वेळा परेश म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्री मधला “रॉजर फेडररच” आहे की काय असं वाटतं.
रॉजर फेडररला कोणी २००१ च्या आसपास बघितलं असतं, तर तेव्हा अंदाज ही आला नसता हा माणूस हा टॅलेंटचा खजिना आहे आणि पुढे जाऊन राजा होणार आहे.
तसंच आतासुद्धा त्याला टेनिस कोर्ट बाहेर भेटलं तर जाणवणार नाही आपण एका राजाशी बोलतोयआणि एक्साक्टली असंच काहीसं आहे आपल्या परेश मोकाशीचं.
इतका सरळ, जमिनीवरच पाय असणारा माणूस की जर तुम्हाला तो हॉटेलमध्ये किंवा लिफ्टमध्ये, वगैरे इन शॉर्ट कुठंही भेटला तरी ह्या माणसाला नॅशनल अवॉर्ड मिळालाय, ह्याचा सिनेमा ऑस्कर पर्यंत पोहोचलाय असं काहीही जाणवून देणार नाही!! इथेच परेशबद्दल आदर वाटायला लागतो!
परेश इतका प्रतिभावान आणि गुणी कलाकार आहे की, त्याची प्रत्येक कलाकृती प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणारी आणि सुखाचे असंख्य क्षण पेरणारी असते.
गोष्टींकडे बघण्याची दृष्टी आणि सांगण्याची स्टाईल सुद्धा वेगळीच असते. त्यामुळेच हॉरर, सस्पेन्स, भावनिक,लव्हस्टोरी अशा प्रकारचे सिनेमे बघायची सवय असलेल्या आपल्यासारख्यांना त्यांनी ‘क्युट’ हरिशचंद्र दाखवला आणि तो महाराष्ट्र, भारत असं राज्य करत करत ऑस्कर पर्यंत पोचला.
तसं बघायला गेलं तर ही हरिश्चंद्राची गोष्ट खूप फिल्मी, ड्रामेबाज पध्दतीनीपण सांगता आली असती! पण परेश! परेशच तसं नाही. दादासाहेबांची धडपड, जुनं लंडन, थेटर अशा अनेक गोष्टी त्यांनी ‘क्युट’च दाखवून अख्खी गोष्ट सहज उलगडली .
लहानपणी एखादी गोष्ट बाबा, काका वगैरेनी सांगितली तर आवडत नाही पण तीच गोष्ट आजीच्या तोंडून ऐकायला गोड वाटते, एक विशेष मजा येते, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते! परेश त्या आजीसारखच कुठलीही गोष्ट गोड करून आपल्यासमोर ठेवतो!!
परेशचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांची ‘नस’ ओळखणं, अगदी फेडरर समोरच्या खेळाडूला ओळखतो तसाच! आपला प्रेक्षकाला काय हवंय हे परेशला माहित असतं आणि त्यामुळेच विनोदनिर्मिती साठी त्याला फारसे वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.
गोष्टीच अशा बांधली जाते की निखळ विनोद घडत जातो, तो घडवावा लागत नाही.
सध्या काही दिग्दर्शकांची एक टीम असते, ते शक्यतो त्याच त्याच लीड ऍक्टर ला घेऊन सिनेमा बनवतात पण परेश…..परेशचं तसं नाही. क्ले कोर्ट, ग्रास कोर्ट प्रमाणे गेम जसा बदलावा तसा परेश गोष्ट, परिस्थितीनुसार कलाकार बदलतो.
किंबहुना त्याचे ‘पत्ते’च तो वेगळे खेळतो आणि त्यामुळेच नंदू माधव, नंदिता धुरी अशा ‘स्टार पॉवर’ नसलेल्या पण ‘पावरफुल’ परफॉर्मन्स देणाऱ्यांची लीड रोल साठी निवड होते.
आपलं प्लॅनिंग, लिखाण ह्या सगळ्यावर अतिशय आत्मविश्वास असल्यामुळेच परेश ही ‘स्टार’ नसण्याची रिस्क घेऊ शकतो.
फेडरर काय आणि मोकाशी काय…. दोघांचं नेचर हे तसंच सारखंच. शो करायची, हवाबाजीची सवयच नाही. किंबहुना ती आवडच नाही! दोघांचाही सक्सेसफुल होण्यासाठीचा मंत्र एकच- थोडा वेळ लागला तरी चालेल पण execution पेक्षा जास्त वेळ planning वर इन्व्हेस्ट करायचा…
परवाच रॉजर एका इंटरव्हियूमध्ये बोलला,
करिअर मोठं आणि हेल्दी होण्यासाठी फ्रेंच ओपन खेळणार नाही, डायरेक्ट विम्बल्डन खेळीन.
परेशचं पण तसंच . भले ३-४ वर्ष कलाकृती केली नाही तरी चालेल, पण जेव्हा प्रेक्षकांसमोर काही आणीन ते चांगल्या तयारीनिशी पूर्ण झालेलं एक ‘फाईन प्रोडक्ट‘ असेल!
अशाच प्रकारे अभ्यास करून, व्यक्तिरेखा – छोट्या छोट्या डिटेल्स च निरीक्षण करून हरिश्चंद्रानंतर ३-४ वर्षांनी एलिझाबेथ आला. परेशच्या गोड नजरेतून करमणुकीबरोबर ४ गोष्टी शिकवून गेला आणि खूप सारं प्रेम मिळवून गेला. त्याच्या ह्या अपार मेहनतीचं फळ त्याला मिळालं, जेव्हा त्याची ही गोड कविता एलिझाबेथ, नॅशनल अवॉर्ड पर्यंत पोचली!
एकादशी नंतर अनेक वर्षानंतर ह्या गुणी दिग्दर्शकाचा नवीन सिनेमा आलाय . चि. व चि सौ कां.
चित्रपटाच्या ३ मिनिटाच्या ट्रेलर मध्ये साधारण ८ वेळा वगैरे जोरदार हसलो. तेव्हाच लक्षात आलं आपला फेडरर ही ग्रँडस्लॅम मारणारच आणि झालं ही तसंच!! मुव्ही रिलीज झाल्यानंतर माझ्या भरतनाट्य कट्ट्यावरच्या मित्रांनी फोन करून सांगितलं,
परेशचा नवीन सिनेमा बघ रे…. कडक आहे……
मी त्याला रिप्लाय दिला,
याह, रॉजर दॅट !!!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.