Site icon InMarathi

कडक सॅल्यूट! अंध असूनही त्यांनी सर केलं तब्बल १७००० फुट उंचीचं हिमशिखर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणसाची इच्छाशक्ती मजबूत असली, की मग त्याला त्याचे लक्ष्य गाठण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. माणूस जर मनाने बलवान असेल तर  कुठलीच शारीरिक व्याधी त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबवू शकत नाही.

भलेही ती व्यक्ती दिव्यांग असली, तरीही दुदर्म्य इच्छाशक्ती आणि अफाट साहसाच्या जोरावर माणूस अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवू शकतो. अशी कित्येक उदाहरणे आपण बघतो. अशाच एका दिव्यांग व्यक्तीने हिमशिखर गाठून एक अचाट पराक्रम करून दाखवला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गुजरातमधील वडोदराच्या संजीव गोहिल यांनी दिव्यांग असून सुद्धा हिमालयातील १७ हजार फुटांवरील एक शिखर सर करण्याची कामगिरी करून दाखवली आहे. संजीव हे दृष्टिहीन आहेत, पण त्यांची शारीरिक मर्यादा त्यांच्या लक्ष्याच्या कुठेही आड आली नाही.

हिमालयातील अत्यंत प्रतिकूल वातावरणाचा धैर्याने सामना करत त्यांनी सतरा हजार फुटांची उंची असलेले हिमालयातील फ्रेंडशिप शिखर सर केले आहे. त्यांच्या या मोहिमेत त्यांच्या मित्राने त्यांची पुरेपूर साथ दिली आहे. संजीव गोहिल यांनी त्यांचे मित्र पुष्पक कोटिया ह्यांच्या साथीने हे शिखर सर केले.

 

 

या मोहिमेदरम्यान उणे तापमान, कडाक्याची थंडी, प्रतिकूल हवामान ह्या सगळ्याला तोंड देत  संजीव व पुष्पक यशस्वीपणे ह्या शिखरावर पोचले. फ्रेंडशिप पीक किंवा फ्रेंडशिप शिखर हे समुद्रसपाटीपासून १७३४६ फूट उंचावर आहे.

त्रेचाळीस वर्षीय संजीव गोहिल त्यांच्या मोहिमेबद्दल सांगताना म्हणतात, की “मला ह्याआधी सुद्धा ट्रेकिंग करण्याचा अनुभव आहे. यापूर्वी मी पावागढ आणि जाम्बुघोडाचे डोंगर मी चढलोय, पण हिमालयाचा अनुभव पूर्णपणे वेगळा होता. हिमालयातील वातावरण आणि थंडी यामुळे हे शिखर सर करणे एक आव्हान होते, पण माझ्या मित्राच्या साहाय्याने मी हे शक्य करू शकलो.”

संजीव पूर्वी भारतीय पोस्ट सेवेत सहाय्यक म्हणून कामाला होते, पण दृष्टि गेल्यानंतर त्यांना ही नोकरी सोडावी लागली. सध्या ते वेगवेगळ्या एनजीओबरोबर फ्रिलांसींग करतात. ही संस्था दिव्यांग लोकांना योग्य नोकरी मिळावी, त्यांना आत्मनिर्भर होता यावे यासाठी कार्य करते.

संजीव यांना २००१ साली रेटिनायटिस पिगमेंटोसा या प्रोग्रेसिव्ह दृष्टी विकाराचे निदान झाले. हळूहळू त्यांची पूर्ण दृष्टी या विकारामुळे गेली, पण दृष्टी जाण्याआधीपासूनच त्यांना जंगले, वन्यजीव संरक्षण आणि पर्वतारोहणाची आवड होती. ही आवड त्यांनी आजही दृष्टी पूर्ण गेल्यानंतरही कायम ठेवली आहे.

ते म्हणतात की ,”जंगलात, डोंगरदऱ्यांत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हे माझे पॅशन आहे. पण माझे मित्रमंडळ आणि कुटुंबामुळे मला हे करणे शक्य होते.”

 

 

फ्रेंडशिप शिखर सर करण्यासाठी संजीव यांना पाच दिवस लागले. या दरम्यान त्यांचे मित्र पुष्पक कोटिया कायम सावलीसारखे त्यांच्या बरोबर होते. ३३ वर्षीय पुष्पक कोटिया हे सिव्हिल इंजिनिअर आहेत. पुष्पक पुढे व त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या मागे संजीव असा त्यांनी पूर्ण प्रवास केला व हे शिखर यशस्वीपणे सर केले.

“पुष्पकच्या खांद्यावर हात ठेवून चालल्यामुळे त्याच्या खांद्याच्या हालचालींवरून मला रस्त्याच्या अंदाज येत होता. प्रत्येक पावलागणिक सावधानता बाळगावी लागते, कारण कुठला दगड कधी निखळून पडेल ह्याचा अंदाज देता येत नाही. माझे स्वप्न आहे की आयुष्यात कधीतरी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणे.” असे त्यांनी सांगितले.

पुष्पक कोटिया व त्यांची ओळख ही वाईल्डलाईफ ट्रस्ट मुळे झाली. दोघेही वाईल्डलाईफ ट्रस्ट साठी काम करतात.

 

 

“आम्ही या पूर्वी गिर्यारोहण केले होते पण बर्फाच्छादित थंडगार पर्वतांमुळे फ्रेंडशिप पीक स्केलिंग करणे हे एक मोठे आव्हान होते. चढाई दरम्यान गिर्यारोहक बर्फात आधीच्या गिर्यारोहकांच्या पावल्यांच्या ठश्यावर पाय ठेवत ठेवत प्रवास करतो, परंतु संजीवसाठी ते अधिक आव्हानात्मक बनले कारण त्याला बर्फातील पावलांचे ठसे दिसू शकत नाहीत. प्रत्येक पावलागणिक त्याला इतरांपेक्षा तिप्पट ऊर्जा लागते” असे कोटिया म्हणाले.

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवणारे संजीव गोहिल व मित्राला प्रत्येक पावलावर साथ देणारे पुष्पक कोटिया ह्या दोघांनाही एक कडक सॅल्यूट!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version