' मॅरेथॉन मॉर्निंग : मॅरेथॉन अनुभवातील गमतीजमती – InMarathi

मॅरेथॉन मॉर्निंग : मॅरेथॉन अनुभवातील गमतीजमती

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

घड्याळात पहाटे २.३० चा गजर होतो आणि हुकुमी जाग येते. फ्लॅग ऑफ खरं तर ५.३० किंवा ६ ला असतो पण पोट “संपूर्ण रिकामं” व्हायला मला किमान २ ते २.५ तास लागतातच. म्हणजे तेवढा वेळ बसावं लागत नाही आतमध्ये, पण २ ते ३ वेळा जावं लागतं. मॅरेथॉन, मग ती ५ किमी ची असू दे किंवा ४२ किमीची, स्टॅमिना आणि इच्छाशक्तीच्या जोडीला तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोट रिकामचं असावं लागतं. नुसतं साफ असून चालत नाही. मॅरेथॉनची ती पहाट माझ्यासाठी खूप स्पेशल असते. मी काय त्यात पहिला येणार नसतो. पण तो काही किलोमीटर्सचा प्रवास मला पुढच्या अनेक दिवसांसाठी ऊर्जा देणारा असतो.

शशांक कुलकर्णी नामक मित्राने कट्ट्यावर हे मॅरेथॉनच खूळ माझ्या डोक्यात भरलं खर तर. २०१५ च्या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनला साधारण एक महिना राहिला होता आणि शशांकने मला विचारलं होत की पळायची का ही मॅरेथॉन? मी हो म्हणालो. मनात शंका ठेवूनच मी २१ किमीला रजिस्टर केलं. प्रॅक्टिस चालू ठेवलीच होती, पण पहिलाच घास २१ किमीचा मला जरा जड वाटत होता. एकवेळ अपचन झालेलं चालेल पण घास अडकला तर जास्त इज्जत जायची, ही भीती मनात होती. ६ डिसेंबर २०१५, रविवार. फ्लॅग ऑफ ५.३० ला झाला आणि रेस सुरू झाली. मी एक ठरवून घेतलं होत की काहीही झालं तरी आपण २१ किमी पूर्ण करायचे, तसे ते केलेसुद्धा. अडीच तास लागले. सुदैवाने कसलाही “बाजार उठला” नाही. पण हळू हळू करून का होईना, आपण “इतक” पळू शकतो हा आत्मविश्वास मात्र आला.

 

pune marathon marathipizza.cms
discoverpune.com

त्याच्या पुढची मॅरेथॉन मात्र मी विसरू शकत नाही. १० किमीचीच होती ती. उत्साहात सुरुवात तर केली पण दोन कि अडीच किमी झाले असतील नसतील आणि पोटात कळ मारायला लागली. बाब्बौ, म्हटलं झाला बाजार आता. एकतर मॅरेथॉन फार मोठी नसल्यामुळे टॉयलेटची सोय फक्त स्टार्ट पॉइंट ला होती, मध्ये कुठेच नव्हती. “आणीबाणी” या शब्दाचा नेमका अर्थ मला कळला त्या दिवशी. तसाच थोडा चालत, थोडा पळत, मेंदूमार्फत पोटाला समजावत, आजूबाजूला जी “प्रेक्षणीय स्थळे” पळत होती त्यांच्यावर लक्ष केन्द्रित करत, थोड हेडफोन्स मधल्या गाण्यांवर लक्ष देत कसाबसा प्रेशर दाबत ती मॅरेथॉन पूर्ण केली. पण तेव्हापासून कानाला खडा. रिकाम पोट असल्याशिवाय नाहीच पडायच घराच्या बाहेर हे ठरवून घेतलं. पण जे ठरवलय ते केलं असतं तर आयुष्यात खूप पुढे गेलो असतो. कारण अशीच वेळ पुढे एकदा माझ्या २९ व्या वाढदिवशी (२२ एप्रिल, २०१६) आली होती. २९ वा वाढदिवस म्हणून २९ किमी पळायच असं ठरवून माझ्या घरातून (जुनी सांगवी) – ब्रेमेन चौक आणि तिथून विद्यापीठ चौक मार्गे सेनापति बापट रोड – कर्वे रोड – टिळक रोड – बाजीराव रोड वगैरे असा साधारण रूट मॅप ठरवून घेतला होता. बरोबर पहाटे चार – सव्वाचारला बाहेर पडलो घरातून आणि गोल मार्केट आलं तसं निसर्गाची हाक आली. हाक जरा जास्तच जोरात आली होती. घर किमान 3 किमी मागे राहीलं होतं, तसच थोड रेटल आणि आणखी प्रेशर आता सहन होण्याच्या पलीकडे गेलं. एव्हाना विद्यापीठ चौक आला होता. त्याच चौकात विद्यापीठाच्या मेनगेटला लागून एक पोलिस चौकी आहे. त्याच्या मागच्या बाजूला टॉयलेट आहे. तिथे जायचा रस्ता हा चौकीतून नाही तर चौकीच्या बाजूने आहे (जिज्ञासूंनी खात्री करून घ्यावी). कसलाही विचार न करता घुसलो आणि मोकळा होऊन परत पळायला लागलो.

गमतीचा भाग सोडला तर डिसेंबर २०१५ पासून फार नाही पण १७-१८ मॅरेथॉन्स पळालो असेन. यातल्या काही मॅरेथॉन्स अविस्मरणीय आहेत माझ्यासाठी. गेल्या सप्टेंबरातली “सातारा हिल मॅरेथॉन”, एकतर सातारा मुळात थंड. त्यात आदल्या रात्री पाऊस पडून गेलेला. ढगाळ हवामान, उन्हाचा त्रास नाही आणि सातार्‍यातुन सुरू होणारा यवतेश्वराचा हिरवाईने (घाटातली आणि आजूबाजूचीही) गच्च भरलेला घाट चढून परत उतरायचा. फिजिकल एंडयूरन्सची कसोटी लागली पण कमाल मजा आली. रेस संपल्या संपल्या रुमवर जाऊन लगेच गाडी पुण्याकडे मारली होती. त्यानंतरची १६ ऑक्टोबर २०१६ ची PRBM. ४२ किमीला रजिस्टर केलेलं. शनिवारवाड्याला सुरू झालेली रेस, बालेवाडीत संपली तेव्हा सव्वापाच तास उलटून गेले होते. पण फिनिश लाईन क्रॉस केली तेव्हाचा आनंद आणि त्यानंतर मित्रांनी कट्ट्यावर केलेलं स्वागत मी नाही विसरू शकत कधीच. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे या जानेवारीतली मुंबई मॅरेथॉन. ही पण ४२ पळालो. त्यात जवळ जवळ भारताच्या प्रत्येक राज्यातून आलेले रनर्स होते. एकट्या ४२ किमीलाच ८००० लोकं होते. २१ किमीची रेस जवळजवळ २२ ते २३ हजार लोकं पळत होते. सगळ्या कॅटेगरीज मिळून ४०००० च्या आसपास लोकं धावले त्यादिवशी. एकमेकांना चीयरअप करत, थ्रुआऊट ४२ किमीच्या ट्रॅकवर उभ्या असलेल्या मुंबईकरांचे स्वागत अनुभवत लोकं पळत होते.

रनिंगने आरोग्याचे खूप फायदे होतात, वजन कमी होतं वगैरे मार्केटिंगछाप गोष्टींसाठी रनिंगखरंच  करू नये. मी एका तासात १० किलोमीटर्स पळू शकतो वगैरे गोष्टींसाठी तर नाहीच नाही. स्टार्ट लाईन ला उभे असलेले सर्वच जण मनातून थोडे घाबरलेले असतात, कितीही प्रॅक्टिस केलेली असली तरीही प्रत्येक मॅरेथॉन हि वेगळी आणि नवी असते. तुमचा “मेंटल विल” नावाचा स्नायू कितपत तयार झालाय याची टेस्ट म्हणजे मॅरेथॉन. ते जाड-बारीक होणं किंवा असणं हे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत. बाकी प्रॅक्टिस सगळेच करतात. आणि मॅरेथॉनच्या दिवशी तुम्ही जे पळता त्यापेक्षा रोजचे 5 किमी जास्त महत्वाचे असतात. मी रनिंग करतो कारण मला त्यात खरंच अवर्णनीय आनंद मिळतो. रनिंग मला आवडतं कारण त्यात तुमच्या “मानव्याची प्रत” तपासली जाते. त्या काही थोड्या किलोमीटर्स च्या प्रवासात तुम्ही स्वतःचे असता. मला वाटतं, MEDITATION ची व्याख्या पण हीच आहे. प्रत्येक मॅरेथॉनच्या फिनिश लाईनला मला दोनच भावना मनात येतात. एक, खूप भारी वाटतं आणि दोन, आयुष्यात काहीतरी बरं करत असल्याचा फील येतो. तो फील सोबत बाळगून, माझ्या दैनंदिन सामान्य आयुष्यात मी पुढच्या मॅरेथॉनची वाट पाहत असतो.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?