' अनवाणी जाऊन पद्म पुरस्कार स्वीकारणाऱ्या तुलसी गौडा नक्की आहेत तरी कोण? – InMarathi

अनवाणी जाऊन पद्म पुरस्कार स्वीकारणाऱ्या तुलसी गौडा नक्की आहेत तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सोमवार ८ नोव्हेंबर २०२१रोजी राष्ट्रपती भवनामध्ये पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आपले राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ११९ जणांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यांमध्ये एक पुरस्कार प्रदान करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ह्यांनी त्या व्यक्तीला चक्क नमस्कार केला.

हा क्षण छायाचित्रांमध्ये टिपला गेला आणि तो लगेच देशभरात प्रसिद्ध झाला. कोण होती ही व्यक्ती जिला चक्क पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी अभिवादन केले? ती व्यक्ती म्हणजे कर्नाटकातील पर्यावरणतज्ज्ञ तुलसी गौडा या होत्या.

 

padma inmarathi 1

 

तुलसी गौडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि हा पुरस्कार घेताना तुलसी गौडा या त्यांच्या पारंपरिक पोशाखात होत्या तसेच त्यांनी अनवाणी येऊन हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. तेव्हापासून सगळीकडे चर्चा होतेय की या तुलसी गौडा आहेत तरी कोण?

 

 

कर्नाटकात वास्तव्य करून पर्यावरणासाठी उत्तुंग कार्य करणाऱ्या तुलसी गौडा यांना एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणजेच वनांचा विश्वकोश किंवा वनदेवी म्हणून ओळखले जाते. त्या कर्नाटकातील हलक्की या आदिवासी जमातीशी संबंधित आहेत. या समाजातील लोकांना वनस्पती व औषधी वनस्पतींचे ज्ञान आहे.

 

padma inmarathi 2

 

इतकी वर्षे निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरणासाठी कार्य केल्यामुळे, तसेच झाडे आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींबद्दल असलेल्या ज्ञानामुळेच त्यांना वनांचा विश्वकोश असे म्हटले जाते. आज ७२ वर्षे वय असलेल्या तुलसी गौडांनी वयाच्या बाराव्या वर्षांपासूनच पर्यावरणासाठी कार्य केले.

कर्नाटकातील होनाली या गावात राहणाऱ्या तुलसी गौडांनी आजवर तीस हजारांहून अधिक झाडे लावली आहेत. गेली सहा दशके त्या पर्यावरण संरक्षणासाठी झटत आहेत. पर्यावरणाशी निगडित चळवळीमध्ये कार्य करीत आहेत. त्यांच्या या अतुल्य कार्यासाठी त्यांचा ‘इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र अवॉर्ड’, ‘राज्योत्सव अवॉर्ड’ ,’कविता मेमोरियल’ आणि इतर अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.

 

padma inmarathi 3

 

तुलसी गौडा या केवळ दोन वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांना शालेय शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्या समाजाच्या पद्धतीप्रमाणे त्यांचे लग्नही लवकर झाले. त्या ५० वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांच्या आईबरोबर त्या लहानपणापासूनच जवळच्या नर्सरीत काम करायला जात असत. औपचारिक शिक्षण झाले नसले तरीही त्यांच्या वनस्पतींविषयीच्या ज्ञानासाठी सगळीकडे त्यांचे नाव चर्चेत आहे.

गेली ६० वर्षे त्या पर्यावरणासाठी अखंड कार्य करत आहेत. आजवर त्यांनी ३० हजारांहून अधिक झाडे लावली आहेत. सध्या त्या वनविभागाच्या नर्सरीचे काम बघतात. त्यांच्या या कार्यासाठी राष्ट्रपतींनी ट्विटरवरून तुलसी गौडा यांचे कौतुक केले आहे.

 

padma inmarathi 4

जेव्हा त्यांना एन्सायक्लोपीडिया असण्याबद्दल विचारले जाते तेव्हा त्या म्हणतात, की “माहित नाही कशी पण असे वाटते की मी जंगलाची भाषा बोलू शकते. जंगलाशी संवाद साधू शकते.” त्यांच्या या ज्ञानाचा वापर करून त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी कार्य केले आहे. जंगलासाठी सगळ्यात आवश्यक असलेले “मदर ट्री” ओळखण्यापासून ते बियांची गुणवत्ता तपासण्यापर्यंत त्यांचा गाढा अभ्यास आहे.

तुलसी गौडा यांनी त्यांच्या गावातील महिलांच्या अधिकारांसाठी देखील काम केले आहे. एकदा त्यांच्या समाजातील एका महिलेला बंदुकीची भीती दाखवून धमकावण्यात आले तेव्हा, तुलसी गौडा त्या महिलेच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिल्या आणि तिची मदत केली. त्या म्हणाल्या की जर अपराध्याला शिक्षा झाली नाही तर त्या या अन्यायाचा जोरदार विरोध करतील.

 

padma inmarathi 7

 

तरुण पिढीला जंगलांची काळजी घेण्यासाठी प्रेरित करणे हा तुलसी गौडा यांचा उद्देश आहे. त्या हलक्की वोक्कलिगा या जमातीशी संबंधित आहेत आणि हे लोक या निसर्गाशी पूर्णपणे जोडले गेले आहेत. येथील महिला पृथ्वी आणि जंगलाची काळजी घेतात. भारताला किंबहुना संपूर्ण जगालाच अश्या अनेक तुलसींची गरज आहे ज्या संपूर्ण जगाची इको-सिस्टम टिकवण्यात मोलाचा हातभार लावू शकतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?