Site icon InMarathi

“रोहित कर्णधार झालाय याचा आनंद आहेच, पण तशीच मनात धाकधूकही आहे”

virat rohit and dravid inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

विश्वचषकाआधीच विराटने निर्णय तर जाहीर केला होता, आणि तरीही विश्वचषकात फारशी चांगली कामगिरी करणं भारतीयांना जमू शकलं नाही. कुणी विराटच्या कर्णधारपदावर निशाणा साधला, कुणी रवी शास्त्रींच्या मस्तमौला वृत्तीवर, तर कुणी धोनीच्या नावाने तोंडसुख घेतलं.

आपण भारतीय मंडळी क्रिकेटच्या बाबतीत गरजेहून अधिक संवेदनशील आहोत, हे पदोपदी जाणवत असतं. कधी शून्यावर बाद झाला, म्हणून एखाद्या खेळाडूचा पुतळा जाळणारे आपण, त्याच खेळाडूने सामना जिंकवून दिल्यावर त्याला डोक्यावर घेऊन नाचतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

तसंच काहीसं विराटच्या बाबतीत घडलंय का? याचा आपणच पुन्हा एकदा विचार करायला हवा. ५० टी-२० सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलेल्या विराटने ३२ सामने जिंकले आहेत. म्हणजे विजयाची टक्केवारी उत्तमच आहे. मग विराट चांगला कर्णधार नाही, हा जावईशोध नेमका लावला कुणी आणि कसा?

 

 

विराटने कर्णधारपदावरून पायउतार होणं, हा निर्णय चांगला आहे. संघाच्या आणि त्याच्या स्वतःच्याही भल्यासाठी त्याने हा निर्णय घेणं ही चांगली गोष्ट आहे.

विश्वचषकात विजय मिळवणं, किंवा किमान नावाला आणि दर्जाला साजेशी कामगिरी करणं भारतीय संघाला जमलं नसल्याने, विराटने शेवटच्या सामन्यात विजय मिळवून सुद्धा त्याच्या कर्णधारपदाचा शेवट मात्र गोड झाला नाही.

विराटचा उत्तराधिकारी कोण?

मला तर असं वाटतं की केवळ स्प्लिट नव्हे, तर मल्टिपल कॅप्टन्सीची संकल्पना भारताने सुद्धा अवलंबली पाहिजे. टी-२०, वनडे आणि कसोटी आणि तिन्ही क्षेत्रात तीन वेगळे कर्णधार असू देत की… हा प्रयोग करून बघण्यात काय नुकसान आहे.

या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधायचं झालं, तर टी-२० मध्ये राहुल आणि वनडेमध्ये रोहित असं दिलं जावं. तीन वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये तीन कर्णधार असावेत. प्रत्येकाचा भारही हलका असेल, शिवाय कर्णधार म्हणून विचार करण्याची सवय एकाचवेळी तिघांना असेल. याचा झाला तर संघाला फायदाच होईल.

 

 

आता राहता राहिला प्रश्न विराटने कर्णधारपद सोडण्याचा, तर त्याच्या फलंदाजीचा आणि भारतीय संघाचा चाहता म्हणून असं मनापासून वाटतंय, की डोक्यावरील काटेरी मुगुट (एका फॉरमॅटमध्ये का होईना) काढून ठेवलाय, म्हटल्यावर त्याची फलंदाजी पुन्हा एकदा आधीसारखी बहरावी, पुन्हा एकदा एकामागोमाग एक शतकांचा त्याने सपाट लावावा.

येणारा काळ कठीण जाणार, की…

विराटनंतर कर्णधार कोण, हा प्रश्न आता अनुत्तररित राहिलेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धची मालिका खेळणार आहे. राहुल द्रविड नवा प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाला लाभलाय. द्रविड गुरुजींच्या शाळेत मुळात विद्यार्थ्यांना शिस्त लागणार आहे, असं गृहीत धरुयात.

कप्तान आणि प्रशिक्षक यांच्यात बेबनाव झाला तर नेमकं काय घडू शकतं, हे याआधी अनेकदा अनुभवलं आहे. येत्या काळात अशी बिकट परिस्थिती येऊ नये अशी इच्छा क्रिकेट चाहत्यांच्या मनात नक्कीच असेल. द्रविड गुरुजी तसे कडक शिस्तीचे असल्यामुळे त्यांच्याशी जमवून घेणं कठीण जाऊ शकतं हे तर नक्की…

 

 

कर्णधारपदाचा पर्याय रोहितचा, पण…

रोहित उपकर्णधार असल्याने, विराटनंतर कर्णधार म्हणून रोहित हाच पहिला पर्याय असल्याचं म्हटलं गेलं आणि तोच कर्णधार झालाय. पण रोहितचं सध्याचं वय पाहता, त्याला कर्णधार करणं म्हणजे २-३ वर्षांनंतर पुन्हा नव्याने कर्णधाराची शोधाशोध सुरु करणं…!!

मुळात येत्या दोन वर्षात, दोन विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. म्हणजेच दोन वर्षांसाठी या कर्णधाराला जीव ओतून कामगिरी करावी लागणार. अनुभवी रोहित हे आव्हान पेलण्यासाठी सक्षम आहे. पण त्याचं वय पाहता, येत्या काळात तो क्रिकेटला रामराम ठोकणार हे स्पष्ट आहे.

म्हणजेच २-३ वर्षांतच पुन्हा एकदा नव्याने कर्णधाराचा शोध सुरु होणार.

त्यावेळी राहुल हा पर्याय चाचपडून पाहायचा झाला, तर त्याचं वय वाढलेलं असणार. रिषभ पंत हा पर्याय तोवर अधिक सक्षम झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय सांगावं, कदाचित ईशान किशनने सुद्धा तोपर्यंत त्याच्या कप्तानीची चुणूक दाखवलेली असेल.

 

त्यामुळे दोन वर्षांत पुन्हा नव्याने कर्णधाराचा शोध घेणं, हा निर्णय आत्ता फार कठीण वाटत नसला, तरी तो त्यावेळी कठीण ठरू शकतो हे नाकारता येत नाही.

नवा कर्णधार, नवी सुरुवात

प्रत्येक कर्णधाराचे आवडते खेळाडू असतात. त्याच्या योजना, डावपेच या सगळ्याचा विचार करता त्याच्यासाठी हे खेळाडू महत्त्वाचे असणं श्रेयस्कर सुद्धा असतं. विराट पायउतार होणार म्हणजे येत्या काळात काही प्रमाणात का होईना पण संघाची पुनर्बांधणी होणार हे नक्की!

उदाहरणच द्यायचं झालं, तर वरुण चक्रवर्ती हा विराटसाठी हुकुमी एक्का असणारा, मिस्टरी स्पिनर आहे. येत्या काळात चहलचं पुनरागमन, राहुल चहर आणि अश्विन नेहमी संघात दिसणं अशा गोष्टी पाहायला मिळाल्या तरी आश्चर्य वाटू नये. हे असे बदल भारतीय संघात घडणार. त्याच काळात दोन विश्वचषक स्पर्धा खेळायच्या असल्यामुळे पेपर फारच कठीण आहे, असं म्हणायला हवं…

 

 

सध्यातरी आपण भारतीय संघाला शुभेच्छा देऊया. रोहित कर्णधार झालाय याचा आनंद आहेच, पण तशीच मनात धाकधूकही आहे. येणाऱ्या भविष्याची… बघू, सध्या तरी फिंगर्स क्रॉस्ड आणि वेट अँड वॉच…!!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 ===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version