Site icon InMarathi

घरातली ही कामं करत असाल, तर व्यायाम करण्याची गरजच नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ज्या व्यक्तीवर घराची सगळी जबाबदारी असते, त्या व्यक्तीला स्वतःसाठी वेळ मिळणं कठीणच असतं. खास करून महिलांचा तर घरचं सगळं करण्यात, सगळ्यांना काय हवं काय नको ते बघण्यात संपूर्ण दिवस निघून जातो. त्यात घर आणि नोकरी ह्या दोन्हीही जबाबदाऱ्या असतील तर स्त्रियांची तारेवरची कसरत असते.

अर्थात हल्ली काही घरातले पुरुष सुद्धा स्त्रियांच्या बरोबरीने घरातील कामाचा भार उचलतात, पण अजूनही हे प्रमाण कमीच आहे.

ज्या व्यक्तीवर घरातल्या कामांची जबाबदारी असते त्या व्यक्तीला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी किंवा स्वतःच्या तब्येतीसाठी काही करण्यासाठी वेळच मिळत नाही. अगदी व्यायाम करण्यासाठी वेळ काढणे आणि उत्साह टिकवणे अवघड वाटते.

पण जर तुम्ही घरातली ही कामं करत असाल, तर तुम्हाला व्यायामासाठी आवर्जून वेगळा वेळ काढण्याची गरजच नाही. ही कामं करता करताच तुमचे कार्डिओ वर्कआउट नक्कीच होईल! तुम्हाला आश्चर्य वाटेल पण घरातील कामे केल्याने आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त कॅलरीज जळतात.

ही कामे केल्याने शरीर लवचिक राहते, शारीरिक सामर्थ्यात वाढ होते. त्यामुळे जर तुम्हाला व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल तर ही घरातली ही कामे करून तुम्ही एका दगडात दोन पक्षी मारू शकता.

१. झाडझूड/ केर काढणे.

 

 

घराची रोजची स्वच्छता करणे म्हणजे आधी आपण केरसुणी हातात घेऊन फरशी झाडू लागतो. त्यात जर पूर्वीसारखं झाडू हातात घेऊन वाकून किंवा दोन पायांवर बसून केर काढला तर तुमचा ‘लेग्स डे’ झाला असे समजा!

केर काढण्याच्या ह्या क्रियेत पायांना, पाठीला, कमरेला, खांदे, हात ह्या सर्व अवयवांना चांगलाच व्यायाम होतो. व्यायामाच्या भाषेत सांगायचे झाल्यास तुमच्या कोअर मसल्सना उत्तम व्यायाम होतो. तुम्हाला फ्रोझन शोल्डर किंवा टेनिस एल्बोचा धोका कमी असेल.

फक्त केर काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडताना तुमचे कोअर मसल्स टाईट ठेवा आणि अर्धे स्क्वाट्स करण्यापेक्षा मध्ये मध्ये पूर्ण स्क्वाट्स करा म्हणजे पायांवर जास्त जोर येऊन पाय दुखणार नाहीत आणि घर झाडून काढल्यानंतर जर दोन पायांवर बसून फरशी पुसलीत, तर तुमचे पोट कधीही सुटणार नाही.

 

२. बागकाम

 

 

बागकाम केल्याने मनाला उभारी मिळते. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्याने, मातीत हात घातल्याने मन शांत होते. शिवाय सृजनाचा आनंद मिळतो.

आपण लावलेल्या झाडाला फळ, फुल आलं, की तो आनंद अवर्णनीय असतो.  हा तर मनाचा व्यायाम झाला, पण बागकाम केल्याने शरीराला देखील चांगला व्यायाम मिळतो.

अनेक तज्ज्ञांनी हे सिद्ध केले आहे बागकामाच्या छंदामुळे ताणतणाव कमी होतो, मनाला उभारी मिळते. तसेच जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्या बागेत स्वतः काम करत असता, तेव्हा वेगवेगळ्या अवयवांना चांगलाच व्यायाम मिळतो.

स्क्वाट्स केल्याने पायांना व्यायाम मिळतो. तण ,गवत मुळापासून उपटताना हातांना व्यायाम होतो. जड कुंड्या उचलताना, माती भरलेले घमेले उचलताना तुमचे स्ट्रेंथ ट्रेनिंग होते.

 

३. कणिक मळणे

 

 

स्वयंपाक करताना रोज सकाळचे काम म्हणजे आधी पोळ्यांसाठी कणिक भिजवणे किंवा मळणे. भरपूर पोळ्या लागत असतील तर मोठ्या प्रमाणात कणिक भिजवावी लागते.

कणिक मळताना हाताचे विविध व्यायाम अगदी आपल्या नकळत होतात. कणिक चांगली तिंबून तिंबून मळताना बायसेप्स, फोरआर्म्सचे व्यायाम होतात. शिवाय बोटांचे देखील व्यायाम होतात जे आपण एरवी अजिबात करत नाही.

४. गाडी स्वच्छ करणे

 

 

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण आपण जेव्हा आपली चारचाकी किंवा दुचाकी गाडी धुताना आपला छान व्यायाम होतो. आपली गाडी स्वतः स्वच्छ केलीत तर तुमचे बायसेप्स अगदी छान आकारात येतील. असे म्हणतात, की गाडी धुताना आपल्या २००पेक्षा अधिक कॅलरीज जळतात.

५. स्वतःचे कपडे हातांनी धुणे

 

 

स्वतःचे कपडे स्वतः हातांनी धुणे हा सुद्धा एक चांगला व्यायाम आहे. पाणी भरलेल्या बादल्या उचलणे, बसून वाकून कपडे धुणे, ब्रशने कपडे घासणे, कपडे पिळणे, आपटणे, कपडे चांगले घट्ट पिळून झटकून वाळत टाकणे ह्या सगळ्या कामांत सगळ्या शरीरालाच पूर्ण व्यायाम होतो.

ह्या सगळ्या कामात भरपूर शक्ती खर्च होते. असे म्हणतात कपडे धुताना आपल्या शरीरातील किमान १०० कॅलरीज बर्न होतात.

ह्याशिवाय घरातील पांघरुणे, चादरी झटकणे, संपूर्ण घराची स्वच्छता करणे, धूळ झटकणे, पंखे पुसणे, खिडक्या-दारे पुसणे, जाळे जळमटे काढणे, बाथरूम स्वच्छ करणे, स्वयंपाक करून भांडी घासणे, ओटा स्वच्छ करणे, ऑफिसची स्वच्छता करणे-त्यातील वस्तू जागच्या जागी लावणे ह्या कामांमध्ये सुद्धा भरपूर शक्ती खर्च होते आणि शरीराला चांगला व्यायाम देखील होतो.

म्हणूनच  जर तुम्हाला व्यायाम करायला वेळ मिळाला नाही, पण तुम्ही दिवसभरात ही कामे केली असतील तर काळजी करू नका. तुमचा चांगलाच व्यायाम झालेला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version