आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – धनंजय कुरणे
===
कारकीर्दीच्या सुरुवातीलाच लोकांच्या मनात तयार झालेली स्वतःची ‘इमेज’ बदलणं ही फारशी सोपी गोष्ट नाही, पण अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेनं मात्र ही अवघड गोष्ट घडवून आणली.
‘गहराई’ आणि ‘इन्साफ का तराजू’ या दोन चित्रपटातल्या प्रक्षोभक आणि बहुचर्चित दृश्यांमुळे पद्मिनीची प्रतिमा ‘अॕडल्ट पिक्चर्सची नायिका’ अशी झाली होती. ‘प्रेमरोग’ हा मुख्य प्रवाहातला सिनेमा असला तरी त्यातही काळाच्या दृष्टीने काही ‘बोल्ड’ गोष्टी होत्याच.
पण ‘इन्साफ का तराजू’ आणि ‘प्रेमरोग’ या दोन्ही सिनेमांसाठी तिला उत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर अॕवाॕर्डस् देखील मिळाली होती. त्यामुळे एकाच वेळी ‘टीका आणि कौतुक’ यांची ती धनी बनली.
हे सर्व घडत असताना तिचं वय किती असावं.. अवघं सतरा.. ‘धोक्याचं सोळावं’ नुकतंच सरलं होतं. अर्थात वय जरी फक्त सतरा असलं तरी ‘इंडस्ट्रीत’ येऊन बरीच वर्षं लोटली होती.
सातव्या वर्षापासून ती ‘कोरसमधे’ गात होती. ‘यादों की बारात’च्या कोरसमधे तिचा स्वर होता. घरात शास्त्रीय आणि सुगम संगीत पाणी भरत होतं. वडील.. पंढरीनाथ कोल्हापूरे शास्त्रीय गायक.. लता-आशा यांचे आत्तेभाऊ.
पद्मिनीला गायिका व्हायचं होतं. लता-आशा यांच्या मागं उभं राहून ती कोरसमधे गातही होती, पण त्याचवेळी बालकलाकार म्हणून सिनेमात काम करायची संधी चालून आली.
अवघ्या सातव्या वर्षी ती कॕमे-याला सामोरी गेली. स्वाभाविकच तिच्या अभिनयात एक बालसुलभ सहजता आली. देव आनंदच्या ‘इश्क इश्क इश्क’ मधे ती चमकली.
दररोजचं शूटिंग संपलं की ती दमून जायची.. पाय खूप दुखायचे. स्वतः देवसाहेब तिच्या तळव्यांना तेल लावून पाय चेपत असत. अशा लाडात ही मुलगी मोठी झाली.
नंतर एका कार्यक्रमात तिचं नृत्य पाहून राज कपूरनं तिला विचारलं.. “तू सिनेमात काम करशील का?”.. तेव्हा त्या चिमुरडीनं नाक उडवत मोठ्या तो-यात उत्तर दिलं… “मी already फिल्म अॕक्टर आहेच!” तिचा धीटपणा पाहून राजकपूरनं तिला ‘सत्यम् शिवम्’ मधे घेतलं.
ती गाणंही छान म्हणते हे कळल्यावर राजनं तिला लतासमोर उभं करुन ‘यशोमती मैय्यासे’ हे गाणं पूर्ण म्हणायला लावलं. लतानं आपल्या ‘भाचीचे’ हावभाव नीट निरखले आणि जणू पद्मिनीच हे गाणं म्हणतेय असं वाटेल अशा पध्दतीनं हे गाणं रेकॉर्ड केलं.
‘जमानेको दिखाना हैं’ आणि ‘प्रेमरोग’ मुळे ऋषीकपूर बरोबर तिची जोडी जमली. ‘प्रेमरोग’ मधे ती ऋषी कपूरच्या थोबाडीत मारते असा सीन होता. त्याचे तब्बल आठ ‘टेक’ झाले. ऋषी कपूरचा गाल चांगलाच सुजला.
याचा वचपा ऋषीनं पुढे एका सिनेमात काढला. ‘राही बदल गये’ या सिनेमात नायिकेला थप्पड मारायचा सीन त्यानं दिग्दर्शकाला घालायला लावला.
—
- एकीकडे स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवणारे बॉलिवूडकर, अशा अंधश्रद्धा पाळतात…
- दादा कोंडकेंचं मूळ नाव आहे वेगळं, ‘या’ घटनेमुळे सगळेजणं म्हणू लागले ‘दादासाहेब’
—
‘आहिस्ता आहिस्ता’ चं शूटिंग चालू असताना इंग्लंडचा ‘प्रिन्स चार्ल्स’ हे चित्रिकरण पहायला आला. तेव्हा पद्मिनीनं हार घालून त्याचं स्वागत केलं.. आणि त्याच्या गालावर हलकेच आपले ओठ टेकले. राजघराण्यातील व्यक्तीशी अशी सलगी केल्यामुळे इंग्लंडमध्ये चांगलीच खळबळ उडाली.. आणि अर्थातच भारतातही!
पण नंतर ‘वो सात दिन, सौतन, विधाता’ यासारख्या सिनेमात चांगल्या भूमिका करुन पद्मिनीनं आपल्यावर बसलेला शिक्का पुसून टाकला. ‘प्यार झुकता नही’ या सिनेमाला अनपेक्षितपणे प्रचंड यश लाभलं.
मिथुन बरोबर तिची जोडी जमली. ‘डान्स’ हा दोघांनाही अतिशय प्रिय असलेला प्रकार. त्यामुळे पडद्यावर त्या दोघांची केमिस्ट्री खुलून दिसली.
‘बोल्ड’ दृश्यांच्या वाटेला जायचं नाही म्हणून तिनं चक्क ‘राम तेरी गंगा मैली’ नाकारला. श्रीदेवीनं केलेली ‘तोहफा’मधली भूमिकाही अव्हेरली. ‘सिलसिला’ मधला ‘रेखा’चा रोल तिनं ‘तारखा उपलब्ध नाहीत’ म्हणून नाकारला. नंतर सुपरडुपर हिट झालेले हे चित्रपट नाकारुन तिनं स्वतःचं मोठं नुकसान करुन घेतलं.
भरीस भर म्हणून वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी तिनं प्रदीप शर्मा या निर्मात्यासोबत लग्न केलं.. ते ही घरच्यांचा विरोध पत्करुन .. पळून जाऊन!..आणि लगोलग (प्रदीर्घ कालावधीसाठी) सिनेसंन्यासही घेतला.
‘तिनं योग्य भूमिका स्वीकारल्या नाहीत’ असं राजकपूर म्हणाला होता. ती कदाचित आणखी मोठी स्टार होऊ शकली असती… पण ती आपल्या आयुष्याबाबत समाधानी आहे.
२०१९ च्या ‘पानिपत’ मधे गोपिकाबाई बनून तिनं दर्शन दिलं. नुकतंच ‘प्रवास’ या मराठी सिनेमात काम करुन आपला अभिनयाचा प्रवास सुरुच असल्याचं तिनं जाहीर केलं. याआधी चिमणी पाखरं या मराठी सिनेमातली तिची भूमिका खूप गाजली होती.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.