Site icon InMarathi

सचिन – तुझं चुकलंच !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आमची पिढी एवढी नशीबवान, आम्हाला सचिनचा तेंडल्या ते देव हा अख्खा प्रवास डोळ्यासमोर बघायला मिळाला. ९६च्या वर्ल्ड कपमध्ये हरल्यावर भारतासाठी नाही पण तेंडल्यासाठी जास्त वाईट वाटलं, ९९च्या वर्ल्ड कप मध्ये त्याच्या घरातलं दुःख अख्या भारताचं दुःख झाल, शारजामधून तर देवाचे पाय पाळण्याबाहेर दिसायला लागले, मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर हा एकमेव आधार झाला, त्यानी पुन्हा संघ बांधला, टीमसाठी पाजी आणि अख्ख्या भारतासाठी देव झाला. अनेक कोटी भारतीयांचं श्रद्धास्थान!! हा देव भक्तांना खुश करायचा , ह्या देवासाठी उपास केले जायचे, नवस बोलले जायचे. सुदर्शनचक्र रुपी बॅट हाती असणाऱ्या ह्या देवाचे कोटी कोटी भक्त त्याची पूजा करू लागले होते.

washingtonpost.com

सध्या हा आमचा देव, स्वतः वरच्या सिनेमासाठी भयंकर बिझी आहे. अगदी पंतप्रधानांपासून ते सिद्धिविनायकाला भेटून आला. परवा तर डायरेक्ट मराठी चॅनेलवरच्या “चला हवा येऊ द्या” मध्येच येऊन पोचला. हा आमचा देव आला होता ‘बिलियन ड्रीमझ‘ च प्रमोशन करायला. क्षणात मन खट्टू झालं!

आयपील ,चॅम्पियन ट्रॉफी किंवा CHYD चा २०/३०० वा भाग असेल, असा म्हणून स्पेशल गेस्ट म्हणून आला असता तर खूप भारी वाटलं असत! CHYD चा सलाईन बरेच प्रोड्युसर घेतात. प्रेक्षक येईल की नाही?, आपली कलाकृती जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांपर्यंत पोचेल की नाही? ह्याची त्यांना भीती असते….पण साक्षात देवसुद्धा ???

ज्याच्यावर भारतासकट जगभरातल्या लोकांनी प्रेम केलं, त्याच लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्याला अशा गोष्टींचा आधार का घ्यावा लागला असेल????

youtube.com

खरं तर सकाळी अनाऊन्स करून दुपारी पिक्चर रिलीज केला असता तरी लोकांनी, भक्तांनी वेड्यासारखी गर्दी केली असती, एवढी शक्ती नक्कीच आहे ह्या देवामध्ये आणि एवढा आत्मविश्वास आहे भक्तांचा देवामध्ये! जुन्या एका मॅचचे हायलाईट्स दाखवले मुव्ही म्हणून दाखवले तरी हाऊसफुल्ल होईल…पण मग हे असं असताना देवानी रूप बदलून लोकांसमोर का यावं? ज्या प्रकारे गेले वर्षभर मार्केटिंग सुरु आहे ते करायची वेळ का यावी? कशाला एवढा आटापिटा करावा? लोकं पिक्चर बघतील का नाही अशी भीती देवालाच का वाटावी? असा काही नसेल तर मग नक्की काय आहे? प्रोड्युसर / डिस्ट्रिब्युटरवगैरेच प्रेशर?? ज्याने कधी अँब्रोज/ मॅकग्रा वगैरे च प्रेशर नाही घेतलं तो का हे प्रेशर घेईल!!

बरं हे असं ही नाही की देवाचा दर वर्षी पिक्चर येणार आहे, त्यामुळे अफाट गर्दी न होण्याचा, लोकं पिक्चर न बघण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा काही देवाचा धंदा नाही, मग त्यानी शाहरुखसारखा लोकांसमोर हात पाय पसरून का प्रमोशन करायचं? शाहरुख, सलमान ह्या लोकांचं पोट चालतं ह्यावर त्यामुळे त्यांनी हे करायलाच हवं….पण देव?? का????

hindustantimes.com

फेकींग न्यूज वाल्यानी तर ‘मुव्ही प्रमोशन’ हा पण सचिनच्या जीवनाचा महत्वाचा टप्पा होता वगैरे बोलून, देवावर विनोद निर्मिती सुरु केली आहे, भयंकर त्रास होतो असं ऐकताना! कुठंतरी खुपतंय हे. ज्याच्याबरोबर १५-२० वर्ष प्रेमाची देवाणघेवाण केली त्याला असं बघून खुपतंय.

नेहमी भीती वाटत राहते, रिटायरमेंट नंतरसुद्धा सतत लोकांसमोर राहण्याच्या वृत्तीमुळे त्याच्यावरचं प्रेम कमी तर होणार नाही ना. आत्मचरित्र झालं , मग “App” काढलं, आता मूवी आणि अधेमधे गाणी वगैरे सुरु असतातच! हे जर दुसऱ्या कोणी खेळाडूंनी केलं असतं तर कदाचित एवढी खंत वाटली नसती! पण हा देव आमच्या मनात आहे आणि त्यामुळे दुःख जास्त खोलवर! आमचा बाळकृष्ण जसा देव्हाऱ्यात असतो तसाच हा देवसुद्धा क्रिकेट ग्राउंडवरच जास्त भावतो !

एक गोष्ट नक्की समजली, हातात बॅट असल्यावर देव होणारा तो, माईक हातात आल्यावर सेल्समनसुद्धा होतोय आणि आपल्याच आयुष्यावरची पोथी स्वतःच्याच भक्तांना विकतोय!!

daily.social

देवामधल्या लपलेल्या ह्या सेल्समनला मॅन ऑफ द सिरीज मिळो आणि त्याचा सिनेमा सुपर हिट होवो हीच बाप्पाकडे प्रार्थना!!!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version