आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लाईफ ऑफ पाय, कास्ट अवे ह्यांसारखे चित्रपट बघितले, की आपल्यालाही भीती वाटते. ह्या चित्रपटांत असेही दाखवले आहे, की माणसाची इच्छाशक्ती मजबूत असली तर तो कुठल्याही संकटातून बाहेर पडू शकतो.
अगदी समुद्रात एकटे सापडलो तरीही इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस स्वतःचा जीव वाचवू शकतो. अर्थात हे पडद्यावर बघायला मजा वाटते, पण प्रत्यक्ष आयुष्यात अशा प्रसंगाची नुसती कल्पना देखील केली तर अंगावर काटा येतो.
असाच प्रसंग एका व्यक्तीच्या आयुष्यात खराखुरा घडला आहे आणि त्यातून ती व्यक्ती सुखरूप बाहेर पडली आहे. त्या व्यक्तीचे नाव पून लिम असे आहे. हा मनुष्य थोडेथोडके नाही, तर तब्बल ११३ दिवस समुद्रात एका लाकडी फळीच्या आधारावर जिवंत राहिला.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास पून लिम केवळ २१ वर्षांचा होता आणि तो हाँगकाँगमध्ये राहत होता. तो १९४२ साली SS Benlomond ह्या ब्रिटिश जहाजावर नाविक म्हणून नोकरीला होता.
ह्या जहाजातून सामानाची वाहतूक होत असे. पण दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान U172 ह्या जर्मन पाणबुडीची दृष्टी ह्या जहाजावर पडली आणि तिथेच लिमच्या संकटाला सुरुवात झाली.
२३ ऑक्टोबर १९४२ रोजी रात्री उशिरा U172 ह्या पाणबुडीने SS Benlomond ह्या जहाजावर २ टोर्पेडोने हल्ला केला. ह्या जहाजावर ना सैन्य होते ना हत्यारं त्यामुळे जहाज बुडू लागले.
हा हल्ला इतका जोरदार होता, की जहाज पूर्ण एका बाजूला झुकले. जहाजाच्या इंजिन रूम मधील बॉयलरमध्ये स्फोट झाले. त्यामुळे जहाज थोड्याच वेळात बुडले आणि जहाजावर असलेल्या ५४ लोकांपैकी केवळ ६ लोक वाचले.
सुदैवाने जहाज बुडण्याच्या आधी लिमला एक लाईफ जॅकेट मिळाले. जे ह्या हल्ल्यातून जिवंत वाचले, ते दक्षिण अटलांटिक महासागरात दुर्दैवाने वेगवेगळ्या दिशांना वाहत गेले.
२ तास लाईफ जॅकेटच्या मदतीने समुद्रात तरंगत असताना लिमला आठ स्क्वेअर फुटांची एक लाकडी फळी तरंगताना दिसली. तो लगेच त्या लाकडी फळीवर चढला.
ह्या राफ्टवर बिस्किटांचे काही टिन, पाण्याचा एक जग, काही चॉकलेटं, साखरेचं एक पाकीट, काही फ्लेअर्स, २ स्मोक पॉट्स आणि एक टॉर्च होती. पाण्याच्या जगमध्ये ४० लिटर पाणी होते.
लिम ज्या संकटात सापडला होता त्याची नुसती कल्पना करून सुद्धा सर्वसामान्य माणूस भीतीने थरथर कापायला लागतो. सुरुवातीचे काही दिवस लीमने खाण्यापिण्याचे सामान सांभाळून सांभाळून वापरले, पण हे इतकेसे सामान त्याला किती दिवस पुरणार होते?
हळू हळू खाण्याच्या वस्तू संपत आल्या, तरी त्या अथांग समुद्रात त्याला कोणीही मदतीसाठी दिसले नाही. अखेर त्याने जीव वाचवण्यासाठी राफ्टच्या एका कोपऱ्यात मासे पकडण्यासाठी एक हुक तयार केले.
बिस्किटांच्या टिनापासून त्याने एक सुरी तयार केली होती. मासे पकडून तो त्या सुरीच्या साहाय्याने कापत असे आणि राफ्टवर असलेल्या तारांवर सुकवत असे. पावसाचे पाणी साठवून ते पीत असे.
एकदा समुद्रात मोठे वादळ आले आणि त्यामुळे लिमचे खाण्याचे सामान व पिण्याचे पाणी खराब झाले. काहीच न उरल्यामुळे अखेर त्याने एका पक्ष्याची शिकार केली व त्याचे रक्त पिऊन स्वतःची तहान -भूक भागवली.
डेली टेलिग्राफमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पून लिम जेव्हा त्या राफ्टवर जीव वाचवण्याची धडपड करत होता, तेव्हा तिथून अनेक जहाजं गेली पण तो चिनी (आशियाई) असल्याने कुणी त्याची मदत केली नाही.
एका अमेरिकन एयरमॅनने सुद्धा त्याला बघितले, पण तितक्यात एक वादळ आले आणि राफ्ट सह लिम दुसऱ्या बाजूला वाहून गेला. जर्मन जहाजांनी सुद्धा लिमला एकटेच समुद्रात तरंगताना बघितले पण तरीही त्याची मदत केली नाही.
अखेर त्याचे राफ्ट तरंगत तरंगत ब्राझीलच्या जवळ आले, तेव्हा लिमला समुद्राच्या पाण्याचा रंग बदलल्याचे लक्षात आले. त्याच्या मनात आशा जागृत झाली आणि त्याने कसेतरी राफ्ट किनाऱ्यावर आणले.
तो ज्या किनाऱ्यावर आला तिथे ब्राझीलचे घनदाट जंगल होते. जंगलाच्या जवळ ब्राझीलच्या तीन मासेमाऱ्यांना तो सापडला. त्याने त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्या मासेमाऱ्यांनी त्याला जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये नेले.
१३३ दिवस लिम समुद्रात होता त्यामुळे त्याचे ९ किलो वजन कमी झाले होते. त्याची तब्येत देखील ढासळली होती, पण ४ आठवडे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर तो ठणठणीत बरा झाला.
SS Benlomond वरील हल्ल्यातून वाचणारा तो एकमेव नाविक होता.
हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर तो युकेमध्ये आला. प्रवासादरम्यान त्याने अमेरिकेला एक थांबा घेतला, तेव्हा तिथल्या काही पत्रकारांना त्याने सगळी घटना सांगितली.
त्याला त्याच्या ह्या साहसासाठी महाराज जॉर्ज सहावे ह्यांच्या हस्ते ब्रिटिश एम्पायर मेडल मिळाले. तसेच ब्रिटिश रॉयल नेव्हीने त्याच्या काही टेक्निक्स जाणून घेऊन त्यांच्या नाविकांना ट्रेनिंग देताना त्या टेक्निक्सचा वापर करणे सुरु केले.
त्यानंतर लिमला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. त्याने त्याचे उर्वरित आयुष्य शांततेत घालवले. १९९१ साली ब्रुकलिन मध्ये त्याचा मृत्यू झाला. लिमची गोष्ट केवळ रोमांचक नाही, तर ती “सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट” ही थिअरी खरी आहे ह्याचा जिवंत पुरावा आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.