Site icon InMarathi

आता फेसबुक नाही तर मेटा – का बदललं हे नाव? नवीन नावामुळे नेमकं होणार काय…

facebook rebranding inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लहानथोरांच्या आवडीचे फेसबुक हे सोशल नेटवर्किंग कंपन्यांमधील सर्वात मोठं नाव आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. किंबहुना सोशल नेटवर्किंग म्हणजेच फेसबुक अशी सोशल नेटवर्किंगची नवी ओळख झाली आहे.

फेसबुक एक दिवस जरी बंद पडलं तरी अक्षरश: लोक प्रलय आल्यासारखे पॅनिक होतात हे आपण मागच्या महिन्यात फेसबुक, इंस्टाग्राम काही तास बंद पडलं होतं तेव्हा बघितलं. तर अशी ही मार्क झुकरबर्गच्या अपत्याची म्हणजेच फेसबुकची लोकप्रियता जगभरात सगळीकडे आहे.

 

 

आता मात्र मार्क झुकरबर्गने फेसबुक संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. घाबरू नका! तुमचं फेसबुक काही ऑर्कुटप्रमाणे बंद होणार नाही. फक्त फेसबुकचं नाव बदलून ‘मेटा’ असं ठेवण्यात आलं आहे. मार्क झुकरबर्गने नुकतीच यासंदर्भांत माहिती जाहीर केली आहे.

फेसबुकचे नाव बदलण्यामागे रिब्रॅंडिंग हा उद्देश आहे असं झुकरबर्गद्वारे जाहीर करण्यात आलं आहे. कंपनीचं नाव बदललं असलं तरीही फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या इतर स्वतंत्र प्लॅटफॉर्म्सची नावं मात्र तीच असतील. ती नावं बदलण्यात येण्याची घोषणा अद्याप तरी झालेली नाही.

थोडक्यात काय तर तुम्ही-आम्ही वापरत असलेल्या फेसबुकच्या अॅपचं नाव फेसबुक असंच राहणार आहे.

अशी करण्यात आली घोषणा…

मार्क झुकरबर्गने कालच म्हणजे २८ ऑक्टोबर २०२१ रोजी फेसबुकच्या वार्षिक समारंभात ‘मेटा’ या नव्या नावाची घोषणा केली. भारतीय प्रमाण वेळेनुसार काल मध्यरात्रीपासून फेसबुकला नवे नाव मिळाले आहे. या घोषणेनंतर कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर नवा लोगो अपडेट केला तसेच ‘मेटा’साठी नवे ट्विटर हॅन्डलदेखील सुरु केलं आहे.

 

 

महत्त्वाची बाब अशी, की समिध चक्रवर्ती जे फेसबुकचे माजी सिव्हिक इंटेग्रिटी चीफ आहेत त्यांनीच फेसबुकसाठी ‘मेटा’ हे नवं नाव सुचवलं होतं.

फेसबुकने नावात बदल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २००५ साली सुद्धा फेसबुकचं नाव “द फेसबुक” असं होतं, ते नुसतं “फेसबुक” करण्यात आलं. आज जगभरात ३ अब्जांहून अधिक लोक फेसबुक वापरतात. भारतात तर फेसबुकची लोकप्रियता लक्षणीय आहे. तरुणांपासून ते अगदी वरिष्ठ नागरिकांसाठी सुद्धा फेसबुक ही अत्यावश्यक गोष्ट झाली आहे. भारतात सुमारे ४१ कोटी लोक फेसबुक वापरतात.

फेसबुकचं नाव जरी बदललं असलं तरीही त्या अॅप्लिकेशनच्या सर्व्हिसमध्ये काहीही बदल होणार नाहीत. जे अॅप सध्या कार्यरत आहे, जसं चालत आहे, ज्या सर्व्हिसेस त्यावर उपलब्ध होत्या त्या पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील.

 

 

रिब्रॅंडिंगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. तसेच व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम या फेसबुकच्या मालकीच्या दोन अॅप्लिकेशन्सना सुद्धा कंपनीच्या नवीन लेबल अंतर्गत आणण्याची योजना देखील येत्या काळात असल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.

मेटा हे नाव ग्रीक भाषेतून आले आहे. याचा अर्थ होतो “बियॉंड” म्हणजेच पलीकडे! झुकेरबर्गने मेटाच्या वेबसाईटवर “फाउंडर्स लेटर” देखील लगेच अपडेट केले. कंपनीचं नाव बदललं असलं, तरी कंपनीचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गच असणार आहे.

नाव बदलल्याने कंपनीत रोजगाराच्या नव्या संधी देखील उपलब्ध होतील अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मेटावर्स साठी कंपनीला हजारो लोकांची विविध कामांसाठी गरज लागणार आहे अशी घोषणा मागेच कंपनीने केली होती. सध्या फेसबुक कंपनीकडून १० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

भविष्यात लागणारी गरज ओळखून कंपनीने आजच त्यानुसार पावले उचलत अत्याधुनिक अॅप्लिकेशन्सची सुरुवात केली आहे.

मेटावर्समुळे फेसबुक तसंच इतर लहानमोठ्या नेटवर्किंग कंपन्यांसाठी बिझनेसचं नवं दालन उघडेल. नवीन बाजारपेठ, नवीन ग्राहक, सोशल नेटवर्कचे नवीन पर्याय आणि नवनवे पेटन्ट या संधी मेटावर्समुळे उपलब्ध होऊ शकतील अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

 

मेटावर्समुळे व्हर्च्युअल वातावरणात खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन गेमिंगला सुद्धा भरपूर चालना मिळू शकेल तसेच काम देखील करता येऊ शकेल, कम्युनिकेशनसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील.

म्हणजेच एकूण फेसबुक आता आणखी विस्तार करण्याच्या तयारीत आहे आणि ह्यात आपल्याला काय नवीन मिळतेय याकडे सर्व युझर्सचे लक्ष लागलेले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version