मोबाईलची काही झक्कास फीचर्स, जी कदाचित तुम्ही कधीच वापरली नसतील…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
स्मार्टफोन हे नावच किती योग्य आहे. खरंच हल्लीच्या काळातील फोन्स फारच स्मार्ट झाले आहेत. पण या स्मार्टफोन्सचा वापर आपण स्मार्टली करतो का, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? पडला असेल तर उत्तमच, पण असा प्रश्न पडला नसेल तरीही या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या…
तुमच्यापैकी कुणीच या स्मार्टफोनचा वापर १००% स्मार्टली करत नाही. कुठली ना कुठली फीचर्स वापरणं, समजून घेणं आपल्याकडून राहून जातं. अशीच काही झकास फीचर्स आज समजून घेऊयात, जी कदाचित तुम्हाला ठाऊकही नसतील किंवा तुम्ही वापरली नसतील.
१. रॅम मेमरीमध्ये अॅप्स लॉक करणे
आपण अँड्रॉइड फोनवर ज्यावेळी एखादं अॅप सुरु करतो, त्यावेली ते बंद केल्यानंतरदेखील रॅममध्ये सुरूच राहतं. अशी अॅप्स सुरु राहू नयेत म्हणून क्लिअर ऑलचा पर्याय तुमच्यापैकी अनेकांनी अनेकदा वापरला असेल. पण यावेळी क्लिअर ऑलचा पर्याय निवडला, तर हवी असलेली अॅप्स सुद्धा बंद होतात.
अशावेळी हवी असलेली अॅप्स बंद होऊ नयेत म्हणून ती लॉक करून ठेवता येतात. हे फिचर तुमच्यापैकी अनेकजण वापरत नसतील नाही का?
रॅममधील अॅप सिलेक्ट करून ठेवा, मग त्यावर लॉकचा पर्याय आलेला तुम्हाला दिसेल. जे फिचर सुरु केलं की काम फत्ते…
२. स्मार्ट लॉक
स्मार्ट फोन लॉक असणं ही अगदीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपला मोबाईल आपल्या नकळत कुणी इतरांनी वापरू नये म्हणून तो लॉक करून ठेवणं, हाच एक पर्याय असतो. पण मग अशावेळी पटकन फोन अनलॉक व्हावा गरजेच्या वेळी नीट वापरता यावा असंही वाटत असतं. स्मार्ट फोनमधील स्मार्ट लॉक हे फिचर हेच काम करतं.
एखाद्या विशिष्ट ठिकाणी असताना, तुम्ही फोन फक्त स्वाईप करून अनलॉक करण्याचा पर्याय निवडू शकता. अगदी उदाहरणच द्यायचं झालं, तर घरात असताना तुमचा फोन इतर कुणी हाताळणार नाहीये. मग अशावेळी घराच्या लोकेशनवर तो सहजरित्या अनलॉक होईल आणि कुठलाही पासवर्ड टाकण्याची गरज पडणार नाही असं सेटिंग करता येतं.
म्हणजेच घरी असताना, फोन थेट अनलॉक करता येईल आणि मित्रांसोबत कट्ट्यावर, ऑफिसात किंवा इतर कुठे असाल, तेव्हा मात्र हा ‘स्मार्ट’ फोन पासवर्डची मागणी करेल.
याच फिचरमध्ये ऑन बॉडी डिटेक्शन आणि device असे आणखीही दोन पर्याय आहेत. हे स्मार्ट लॉक वापरून तर पहा, फायदा होणार हे नक्की…
३. अॅप लॉकर
कधी कधी फोन कायम लॉक ठेवणं शक्य नसतं. पण मोबाईलमध्ये असणारी सगळी अॅप्स इतर कुणाच्या हाती लागणं हेसुद्धा शक्य नसतं. यासाठी अॅप लॉकर हा एक अत्यंत उत्तम पर्याय ठरतो.
–
- तुम्ही मोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्ज करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच! वाचा
- तुमचा स्मार्टफोन फारच लवकर डिस्चार्ज होण्यामागे ही आहेत १० कारणे… वाचा
–
अॅप लॉकरमध्ये आपल्याला हवी असणाऱ्या अॅप्सची यादी बनवून ठेवा. ही अॅप्स उघडताना तुमचा फोन स्मार्टली वागेल आणि पासवर्ड विचारेल. बऱ्याचशा अँड्रॉइड फोन्समध्ये हे फिचर इन बिल्ट असतं आणि तरीही ते वापरलं जात नाही.
४. स्प्लिट स्क्रीन
एकाच वेळी दोन अॅप्स वापरणं ही अनेकदा ‘काळाची गरज’ असते. मल्टिटास्किंग करणाऱ्यांसाठी तर हे फिचर म्हणजे स्वर्गसुख म्हणायला हवं. रॅममध्ये असलेल्या अॅपवर क्लिक करून ठेवा, काही पर्याय उघडतील. ज्यात स्प्लिट स्क्रीन असा एक पर्याय दिसेल. तो निवडा. हे झाल्यावर जे दुसरं अॅप वापरायचं आहे ते निवडा, आता एकाच वेळी स्क्रीनवर दोन्ही अॅप्स उघडलेली असतील.
थोडक्यात काय, तर स्क्रीन स्प्लिट झालेली असेल. एकावेळी दोन्ही स्क्रीन्स समोर दिसत राहतील. जेणेकरून एका अॅपमधून दुसऱ्या अॅपमध्ये जाणं सोपं जाईल.
५. वायफाय डायरेक्ट
फाईल शेअर करण्यासाठी हा पर्याय उत्तम ठरतो. ब्लूटूथचामार्फत फाईल शेअरिंगचा जमाना तर आता गेलाच आहे. मग त्यासाठी विविध अॅप्सचा पर्याय निवडला जातो. पण तुमच्या स्मार्टफोनमध्येच वायफाय डायरेक्टचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.
एकाच वायफाय नेटवर्कला जोडलेली असणारी कोणतीही २ डिव्हायसेस अगदी सहजपणे एकमेकांसोबत फाईल्स शेअर करू शकतात. हा पर्याय वापरला, तर फाईल शेअर करण्यासाठी कुठल्याही इतर अॅपची गरज पडणार नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.