' भारत आजही पारतंत्र्यात आहे का? ऑस्कर प्रकरणानंतर आपण यावर विचार करायलाच हवा – InMarathi

भारत आजही पारतंत्र्यात आहे का? ऑस्कर प्रकरणानंतर आपण यावर विचार करायलाच हवा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

यावर्षी आपण आपल्या स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव साजरा केला. भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षं उलटली तरी आजही कित्येक देशांच्या नजरेत भारत हा अजूनही स्वतंत्र देश नाहीये.

जेव्हा केव्हा जागतिक पातळीवर या गोष्टीबद्दल चर्चा होते तेव्हा कायमच आपला देश खरंच स्वतंत्र आहे का असा प्रश्न उभा राहतो. नुकतंच सरदार उधम या सिनेमाला ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागलं आणि त्यामागचं कारण होतं की त्यातून ब्रिटिशांविषयी द्वेष पसरवला गेला आहे.

 

sardar udham oscar inmarathi

 

मुळात ऑस्करसारख्या जागतिक स्तरावरच्या मंचावरून हे असं कारण पटत नाही, कारण ऑस्करमध्ये जगभरातल्या सगळ्याच देशातले सिनेमे येतात, किमान या मंचावर तरी अशी दडपशाही असू नये आणि आज आपण याचविषयी जरा विस्तृत माहिती घेणार आहोत.

एखाद्या ऐतिहासिक घटनेवर वेगवेगळी पुस्तकं लिहिली जातात, सिनेमे तसेच डॉक्युमेंट्री आपल्याला बघायला मिळतात आणि त्यात लेखक किंवा दिग्दर्शकाचा एक स्टँड असतो आणि त्याच्या विचाराला मांडायची मुभा सगळीकडेच आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या ज्यू हत्याकांडावर डझनभर सिनेमे बनले आहेत, त्यांच्या आठवणींना उजाळा देणा-या घटना म्यूजियममध्येही आपल्याला बघायला मिळतात, अमेरिकेच्या व्हिएतनामच्या युद्धाचंसुद्धा गुणगान सतत गायलं जातं, तेव्हा मात्र कुणीच काहीच बोलत नाही.

Schindler’s list. The Pianist, Apocalypse सारखे सिनेमे लोकं डोक्यावर घेतात, त्यात मांडलेला इतिहासच सत्य मानून त्या सिनेमांवर पुरस्कारांची उधळण होते. पण मग जर एखाद्या भारतीय सिनेमात असं एखादं चित्रीकरण दाखवल्यावर मात्र जागतिक पातळीवर त्याची दखलसुद्धा घेतली जात नाही.

 

movies inmarathi 4

 

यावरून खरंच भारत स्वतंत्र आहे का? आजही भारताकडे इतर राष्ट्र चांगल्या नजरेने बघतात का? असे प्रश्न मनात येतातच.

सरदार उधममध्ये जे दाखवलं तसंच किंबहुना त्याहून अधिक भीषण हत्याकांड झालेलं आहे, बरं त्यात दिग्दर्शकाने कुठेच काही मनचं दाखवलेलं नाही, उलट ब्रिटिशांच्या Imperialism चा मुखवटाच हा सिनेमा फाडतो.

आज जगात सर्वात जास्त नरसंहार हा आपल्याच लोकांचा झाला आहे, आणि त्यापैकीच एक भीषण घटना जशीच्या तशी दाखवली तर इतर देशांना त्यात मिर्च्या झोंबण्याची काहीच गरज नाही.

उलट फक्त भारताची गरिबी आणि झोपडपट्टी दाखवणाऱ्या अजेंडा ड्रिव्हन सिनेमांपेक्षा अशा स्पष्ट आणि धाडसी सिनेमांची आपल्याला जास्त गरज आहे. आपला इतिहास आहे तसा आणि निडरपणे मांडणं खूप गरजेचं आहे.

 

india inmarathi

कित्येक इंग्रजी तसेच फॉरेनच्या सिनेमातून भारत हा कसा गरीब आहे हेच सतत दाखवलं जातं, धारावीसारखी झोपडपट्टी म्हणजेच भारत अशी प्रतिमा आपली केली जाते, आणि तेव्हा कुणीच याविषयी आवाक्षरसुद्धा काढत नाहीत.

सलाम बॉम्बे, स्लमडॉग मिलियनेअर पासून अगदी गली बॉयसारख्या सिनेमातूनसुद्धा हेच ठसठशीतपणे प्रत्येकाच्या मनावर बिंबवलं जातं की भारत हा असाच आहे. खरंतर असं नसूनही आपल्या देशात कुणीही यावर आक्षेप घेत नाही.

 

salam bombay inmarathi

 

मग इतिहासतल्या एवढ्या मोठ्या गंभीर घटनेवर बनलेल्या या सिनेमाला बाहेर काढणं ही एक प्रकारची दडपशाहीच आहे. जर भारताचं चित्रण एक गरीब राष्ट्र म्हणून तुम्ही करत असाल तर इतर राष्ट्रांनी भारतावर केलेले अनन्वित अत्याचार, शोषण यावर बनलेले सिनेमे स्वीकारायला काहीच हरकत नाही.

खरंतर सरदार उधम या सिनेमाच्या शेवटी हंटर कमिशनची झलक येते आणि शेवटी एक वाक्य येतं की “इतकी वर्षं होऊन गेली तरी अजूनही जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल ब्रिटिशांकडून माफी आलेली नाही!”

ज्या देशाला आपण केलेल्या कृत्याविषयी काहीच पश्चात्ताप नाहीये, किंबहुना त्यांच्यासाठी ही घटना अत्यंत किरकोळ आहे तर त्यांनी त्यावर बनलेला हा सिनेमा स्वीकारायला काहीच हरकत नाही.

 

sardar udham inmarathi 2

 

मुळात जर इतर गोष्टींकडे कानाडोळा करून जर सिनेमे स्वीकारणार असतील तर या सिनेमालाही ऑस्करने खुल्या मनाने स्वीकारायला काहीच हरकत नव्हती.

अर्थात ऑस्करला इतकं महत्त्वसुद्धा आपणच दिलं आहे, इतर अवॉर्ड शोप्रमाणे तोही एक अवॉर्डशो आहे याची जाणीव आपल्याला व्हायला हवी.

सरदार उधम हा उत्कृष्ट सिनेमा आहेच आणि त्याची ऑस्करकडून आपल्याला पोचपावती अजिबात नको. पण जागतिक पातळीवरचा एवढा दुटप्पीपणा आणि सिनेमा नाकरण्यासाठी दिलेलं कारण हे खरंच न पटण्यासारखं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?