Site icon InMarathi

भारतीय संघाच्या पराभवाची कारणं आजची नाहीत; ‘त्याच’ दिवशी याची सुरुवात झाली…

india vs pakistan inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

रविवारी पाकिस्तानविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला आणि एकाच खळबळ उडाली. जिकडेतिकडे चर्चेचा विषय फक्त तोच! मग कुणी विराटकडे बोट दाखवलं, कुणी धोनीच्या मेन्टॉरिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, कुणी रवी शास्त्रींच्या मस्तमौला वृत्ती चर्चेत आणली तर कुणी आणखी काही…

 

 

भारतीय संघाच्या पराभवाची नेमकी काय कारणं असू शकतील, याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु असल्या, तरी या पराभवाची सगळी कारणं अगदी या काही दिवसातील नाहीत, असं म्हणायला हवं. संघ निवडीवरच अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

काहीशी चुकलेली संघनिवड हा पराभवाच्या कारणांपैकी एक आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.

संघ निवड करतानाची भूल…

भारतीय संघ दुबईत सर्वाधिक सामने खेळणार आहे. आयपीएल हंगामातील उत्तरार्ध युएईमध्ये झाला. या सामन्यांमध्ये जलदगती गोलंदाजांचा दबदबा असल्याचं पाहायला मिळालं. निवडसमितीने हा मुद्दा कुठेतरी दुर्लक्षित ठेवला असावा, असं निवडलेल्या संघाकडे पाहिल्यावर लक्षात येतं.

भारतीय संघात ३ जलदगती गोलंदाज आणि इतर सर्व फिरकी गोलंदाज अशी विभागणी करण्यात आली होती. त्या जलदगती गोलंदाजांमध्येही भुवनेश्वर हा मध्यमगती गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणायला हवा ही चूक सुधारण्याचा प्रयत्न काही प्रमाणात करण्यात आला आणि अक्षर पटेलच्या जागी शार्दूलला बढती देण्यात आली.

 

 

शार्दूल चांगला गोलंदाज असला, तरी त्याच्याही गोलंदाजीचा वेग काहीसा कमी असून, भुवीप्रमाणेच तो एक चांगला स्विंग गोलंदाज आहे. म्हणजेच ‘जलदगती’ या मुद्द्यावर इथेही भारतीय संघ काहीसा मागेच पडला.

ही चूक भारतीय संघाला महागात पडली आणि असंच काहीसं येत्या सामन्यात घडलेलं पाहायला मिळालं, तरीही त्यात कदाचित अनेकांना आश्चर्य वाटणार नाही.

धोनीचा मिडास टच नसणं

महेंद्रसिंग धोनी यष्ट्यांमागे असणं भारतीय संघाच्या नेहमीच पथ्यावर पडायचं. त्याचा शांत आणि संयमी स्वभाव, चांगली निर्णयक्षमता या गोष्टी भारतीय संघासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ होत्या यात शंकाच नाही.

 

 

यावेळी सुद्धा धोनी संघासोबत आहेच, मात्र त्याने मेंटॉर म्हणून मार्गदर्शन करणं आणि अंतिम ११ जणांच्या संघात असणं, यात बराच फरक आहे. धोनीला नशिबाची साथ असते असं म्हणणारे सुद्धा तुमच्यापैकी काही जण असतील. मग विराटवर नशीब रुसलेलं असतं याचाही अनुभव अनेकदा घेतला गेला आहे. या सामन्यातही विराटने टॉस हरलाच होता की…

टॉस हरणं हीदेखील भारताच्या विरोधात गेलेली महत्त्वाची बाब ठरली. निम्मा सामना तर भारतीय संघाने तिथेच हरला, असंही अनेकांचं म्हणणं पडलंय…

पाकिस्तानचा युएईमधील अनुभव…

पाकिस्तानचं होम ग्राउंड कुठलं, असं विचारलं तर लाहोर, कराची अशी नावं ऐकायला मिळणार नाहीत. ‘युएई’ असंच उत्तर ऐकायला मिळेल. गेली अनेक वर्षं पाकिस्तानच्या यजमानपदाचे सामने युएईमध्येच होत आहेत. भारत पाकिस्तान सामना दुबईत झाला. तिथे पाकिस्तानने तब्बल २५ सामने त्याआधी खेळले होते. यावर आणखी काही सांगणे न लगे…

 

 

 

कोहलीवर असणारा दबाव

कर्णधार म्हणून ही कोहलीची शेवटची स्पर्धा आहे. त्याची कप्तान म्हणून कारकीर्द फार खराब नसली, तरी कुठलीही मोठी स्पर्धा जिंकणं त्याला आजवर जमलेलं नाही. त्यामुळे त्याच्यावर दबाव असणं साहजिक होतं.

विराट टी-२० सामन्यांमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध कर्णधार म्हणून उतरला होता. हा दबाव सुद्धा महत्त्वाचा ठरला यात शंका नाही. त्याचे काही निर्णय चुकले, यामागे कुठेतरी हा दबाव कारणीभूत होता, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

यातही मागच्या काही काळात तो स्वतः फॉर्मात नव्हता. सामना सुरु होण्याआधीपर्यंत हा दबाव सुद्धा त्याच्या मनावर नक्कीच असेल. चांगली फलंदाजी केल्यावर हा दबाव काहीसा कमी झाला असेल, पण तरीही जो व्हायचा तो परिणाम झालाच.

 

 

बाबर आणि रिझवानची जोडी

बाबर आझम हा पाकिस्तानचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहेच. कप्तान झाल्यावर त्याचा खेळ अधिक बहरत गेला आहे. रिझवान आणि बाबर ही सलामीची जोडी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यांच्यावर फारसा दबाव नसल्याचं ते खेळात असताना जाणवत होतं. हाच पाकिस्तानच्या विजयातील ‘की फॅक्टर’ ठरला.

 

 

त्या दोघांनी जबरदस्त फलंदाजी केली. बाबरचा आत्मविश्वास केवळ त्याच्याच नव्हे, तर संघाच्याही पथ्यावर पडला. कर्णधार चांगली कामगिरी करत असेल, तर संघाला आपोआप उत्साह येतो.

आपली फलंदाजी ढेपाळली त्याआधी विराटची कामगिरी चांगली होत नव्हती, आणि बाबर मात्र भन्नाट फॉर्मात होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात इथेही मोठा फरक होता. जो पाकिस्तानच्या पथ्यावर पडला.

विराटचे चुकलेले निर्णय…

हार्दिक पंड्याला संघात स्थान देणं भारतीय संघाला महागात पडलं अशी चर्चा अनेकजण करत आहेत. यात काही प्रमाणात तथ्य सुद्धा आहे. सहाव्या गोलंदाजांचा पर्याय भारतीय संघाकडे नव्हता. इतर गोलंदाज विकेट काढू शकत नसताना, हा भारतासाठी कळीचा मुद्दा ठरला.

हार्दिकने फलंदाजीतही छाप पाडली नाही. त्याचा खराब फॉर्म हे यामागचं कारण आहे. मात्र याचा फटका भारतीय संघाला बसला. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू या निर्णयाविषयी बोल्ट असताना, इंझमाम उल हक या माजी पाकिस्तानी कर्णधाराने सुद्धा असंच मत मांडलं आहे. विराटचा मात्र ‘फलंदाज’ हार्दिकवर पूर्ण विश्वास आहे.

 

 

पहिल्या दोन षटकात पाकिस्तानी संघावर दबाव टाकणं गरजेचं होतं. मात्र तिथे जसप्रीत बुमराहला गोलंदाजी देण्यात आली नाही. त्याच्या हाती चेंडू आला तोवर पाकिस्तानचा आत्मविश्वास उभारू लागला होता.

युझवेन्द्र चहलला वगळून ज्या वरुणला वर्ल्डकपच्या संघात स्थान देण्यात आलंय, ज्याच्यावर कर्णधाराने अधिक विश्वास टाकलाय त्यालाही योग्यवेळी गोलंदाजी न मिळणं हा चुकलेला निर्णय होता.

थोडक्यात काय, तर ज्या दोन खेळाडूंवर कर्णधाराने विश्वास टाकला, त्या दोन खेळाडूंनी काही ना काही कारणाने निराशा केली. विराटचे काही निर्णय चुकले याचा याहून मोठा दुसरा पुरावा असू शकत नाही.

 

 

ही होती भारतीय संघाच्या पराभवाची काही कारणं… आणखीही काही कारणं यामागे असतील असं तुम्हाला वाटत असेल, तर ते कमेंटमधून नक्की कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version