आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
दिवाळी ही प्रत्येकासाठी वेगळा उत्साह घेऊन येते. म्हणजे घरातील महिला या खमंग फराळ बनवण्यात गर्क असताता, पुरुषमंडळी त्यावर ताव मारण्याच्या तयारीत असताना, तरुणांची खरेदीची लगबग सुरु असते. एकंदरित घरात उत्साहाचे वातावरण असले तरी बच्चेकंपनीमात्र उन्हात तहानभूक विसरून मातीचा किल्ला करण्यात व्यस्त असतात.
एरव्ही आईवडिलांकडून स्वच्छेतेचे धडे गिरवणारी ही बच्चेकंपनी दिवाळीपूर्वी मात्र माती-चिखलात मनसोक्त खेळते, बरबटलेले हात, कपड्यांवर उमटलेले चिखलाचे डाग, कधीतरी फुटलेले गुडघे आणि चेह-यावर ‘मोहिम फत्ते’ झाल्याचा आनंद हे चित्र तुमच्याही सोसायटीमध्ये किंवा आसपासच्या परिसरात दिसतं ना?
पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की इतर सगळे सण सोडून नेमक्या दिवाळीच्याच मुहुर्तावर किल्ला करण्याची परंपरा का सुरु झाली असावी? खरंतर दिवाळी आणि गड-किल्ले यांचा प्रत्यक्षात काहीही संबंध नाही, मग दिवाळीलाच लहान मुलांना किल्ले करण्याची कल्पना नेमकी कशी सुचत असावी?
गड-किल्ल्यांची माहिती
असं म्हटलं जातं की पुर्वीच्या काळी दळणवळणाची फारशी साधनं उपलब्ध नव्हती. त्यामुळे आपल्या शहराजवळ असलेले मोजके गड-किल्ले सुट्ट्यांमध्ये पाहिले जायचे. त्यानंतर मुलांना त्याची माहितीही सांगितली जायची. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रात इतर कोणकोणते किल्ले आहेत? मुलांच्या अशा प्रश्नांना उत्तरं देताना कधी पालक पुस्तकातील चित्र दाखवायचे तर कधी कहाण्या सांगायचे.
अशावेळी मुलांकडून उत्सुकतेने ऐकलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला जायचा. तेथूनच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किल्ला साकारला जाण्याची परंपरा सुरु झाली असावी असंही चित्र अनेक उदाहारणांमधून समोर आलं आहे.
किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास तर कळतोच. किल्ला हे शौर्याचे, ध्येयाचे प्रतिक मानले जाते.
दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेच बिज मनामध्ये रुजवण्यांच कामही आपोआप होते. पुढे हिच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला तयार करणे सुरु झाले.
महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची समृद्ध परंपरा आहे. ही परंपरा भावी पिढीला कळावी, त्यांनी ती जपावी यासाठी किल्ल्यांची माहिती मुलांना देणं, त्यांनी किल्लेसफरीत सहभागी होणं अशा उपक्रमांची गरज असते, त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत किल्ला करणं हा त्यातील अत्यंंत महत्वाचा भाग मानला जातो.
सुट्ट्यांचा सदुपयोग
दिवाळीच्या सुट्टीत मुलं ख-याअर्थाने मनसोक्त सुट्टी एन्जॉय करू शकतात. प्रथम सत्र परिक्षा संपल्यानंतर नव्या सत्राची उत्सुकता असते, शिवाय दिवाळीत असलेले अनुकूल हवामान, सर्वांच्याच शाळेला लागलेली सुट्टी यांमुळे मुलं वेळेचा सदुपयोग करू शकतात.
यंदा दिवाळीत कोणता किल्ला साकारायचा? याचं उत्तर शोधण्यासाठी मुले विविध किल्ल्यांचे फोटो पाहतात, माहिती घेतात, यामुळे एकंदरित मुलांच्या ज्ञानात भर पडते. यानिमित्ताने केवळ किल्लेच नव्हे तर स्वराज्य साकारणा-या अनेक वीरांची माहिती, यशोगाथा विद्यार्थी ऐकतात, समजून घेतात. हा इतिहास नव्या पिढीत रुजवण्यासाठी किल्ला हे सशक्त माध्यम आहे.
शिवाय दिवाळीत अनेक मुले आपल्या आजोळी येतात, त्यामुळे जुने सवंगडी पुन्हा भेटल्याने किल्ला करण्यात अधिक धमाल येते. नव्या-जुन्या सवंगड्यांसह वेल घालवणे हे देखील दिवाळीतच किल्ला करण्यामागील एक कारण आहे.
–
मोती साबणाची मागणी दिवाळीतच जास्त का असते? यामागे आहे एक कनेक्शन, बघा
दिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो? तसं नाहीये! वाचा जगभरातील दिवाळीबद्दल…
–
नैसर्गिक व्यायाम
मोबाईल, व्हिडिओ गेम्स यांमध्ये गर्क असणारी हल्लीची मुले व्यायाम करत नाहीत ही तक्रार नेहमी केली जाते. यामुळे लहान वयापासूनच अनेक आजारही मुलांमध्ये दिसून येतात.
अशावेळी दिवाळीरपुर्वी किल्ला करण्यासाठी निघालेल्या बालवीरांना नैसर्गिकरित्या व्यायाम घडतो. किल्ल्याची साधनं जमवणं, त्याची रचना करणात मुलांचा घाम निघतो. मुलांना अशा प्रकारचा नैसर्गिक व्यायाम घडतो.
दरवर्षी वेगळा किल्ला साकारणे, किल्ल्यायासाठी दगड, माती, वीटा जमवणे, किल्ल्यावर शिवाजी महाराजांसह मावळे उभारणे ही बाब मुलांसाठी मनोरंजानासह ज्ञानवर्धकही आहे.
यंदा दिवाळीत तुम्ही कोणता किल्ला साकारणार आहात?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.