' किशोरदांनी केला ‘हा’ खोडकरपणा, म्हणूनच राजेश खन्नाला मिळाली ‘आनंद’ची भूमिका – InMarathi

किशोरदांनी केला ‘हा’ खोडकरपणा, म्हणूनच राजेश खन्नाला मिळाली ‘आनंद’ची भूमिका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

किशोर कुमार हे इंडस्ट्रीतलं असं नाव जे दिग्गज, प्रतिष्ठित होतंच मात्र तितकंच खोडकरही होतं. किशोर कुमार यांच्या खोड्यांनी संपूर्ण इंडस्ट्री वैतागायची, मात्र त्यांच्यावर फार काळ रूसून बसणं कोणालाच जमायचं नाही.

जितके खोडकर, खडूस, हट्टी तितकंच समोरच्याला खळखळून हसविणार्‍या किशोरदांचे एकाहून एक अतरंगी किस्से प्रसिध्द आहेत. असाच एक किस्सा आहे भूमिका नाकारण्यासाठी त्यांनी केलेल्या अजब खोडीचा-

 

kishore kumar happy inmarathi

 

अमिताभ, राजेश खन्ना यांच्या अभिनयाने सजलेला, ज्यातल्या नायकाचे संवाद आज इतक्या वर्षांनंतरही लोकांना आवडतात असा क्लासिक सिनेमा म्हणजे, ‘आनंद’.

दु:खांत असणारा हा चित्रपट लोकांना आवडेल की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यातही राजेश खन्नासारख्या गोडगुलाबी भूमिका साकारणार्‍या हिरोला शेवटी मरताना दाखविणं म्हणजे स्वतःहून हात भाजून घेण्यासारखं होतं.

स्वत: राजेश खन्ना यांनाही ही भूमिका प्रचंड आवडलेली असली, तरीही क्लायमॅक्स दु:खी करणं त्यांनाही धोक्याचं वाटत होतं. त्यांचे चाहते पडद्यावर त्यांचा मृत्यू स्वीकारू शकणार नाहीत याची त्यांच्यासहित प्रत्येकाला खात्री होती, मात्र हृषिकेश मुखर्जी आपल्या मतावर ठाम होते.

हे सगळं घडण्याआधी आनंदच्या भूमिकेबाबतचं एक महानाट्य घडून गेलं होतं. फार कमीजणांना हा किस्सा माहित आहे.

 

anand movie inmarathi

 

तर झालं असं होतं, की आनंदच्या भूमिकेसाठी राजेश खन्ना ही पहिली निवड नव्हतीच. ही भूमिका अनेकांनी नाकारल्यावर राजेश खन्ना यांच्याकडे आली.

हा सुपरस्टार आनंदच्या भूमिकेत अगदी ऐनवेळेस कास्ट झाला, सर्वात आधी ही भूमिका शशी कपूरला विचारली गेली होती. शशी त्यावेळेस इतर चित्रप्रटात प्रचंड व्यस्त असल्याने तारखांचा प्रश्न होता, शिवाय शशी कपूर यांना कथानक फारसं आवडलेलं नव्हतं.

शशी कपूर यांच्या नकारानंतर हृषिकेश मुखर्जी शशीचे भाऊ राज कपूर यांच्याकडे गेले. राज कपूरला कथानक तर आवडलं पण शेवट नाही आवडला आणि त्यांनी ही भूमिका करायला नकार दिला.

हृषिकेश मुखर्जींची या भूमिकेसाठीची तिसरी पसंती जरा वेगळी आणि आश्चर्य वाटणारी होती. यादीतलं तिसरं नाव होतं, किशोर कुमार. किशोरदांना कथानक तर आवडलं, पण क्लायमॅक्स नाही आवडला. त्यांनी हृषिदांना शेवट बदलण्याचं सुचविलं. यावर दोघांचे अनेकदा वाद झाले.

 

anand movie inmarathi1

 

हृषिदा आपल्या मतावर ठाम होते. त्यांच्या मते चित्रपटाचा हाच अंत असायला हवा, तो योग्यच आहे, तर किशोरदांचं म्हणणं होतं, की मुळातच कथानकात इतका करुण रस असताना किमान चित्रपट संपताना तरी प्रेक्षकांना थोडं मोकळं वाटायला हवं.

अखेर तोडगा असा निघाला, की शुटींग चालू करावं आणि पुढचं पुढे बघावं. चित्रपटाची सर्व तयारी पूर्ण झाली. इतर सहकलाकारांची निवड झाली. गाणी, संगीत याच्या बैठका झाल्या आणि भूमिकेच्या लूकवर काम चालू झालं.

याच्यासंदर्भात एक मिटींग ठेवली गेली, ज्यात सर्व कलाकारांनी उपस्थित रहाणं आवश्यक होतं. मिटिंगमधे सगळेजण उपस्थित होते फक्त किशोरदा येणं बाकी होतं. ते आले सगळेजण चकीत झाले.

किशोरदांनी चक्क डोक्यावरचे सगळे केस साफ उडवून गुळगुळीत गोटा केला होता. चकाकणारं टक्कल आणि चेहर्‍यावर खोडकर हसू आणत किशोरदा हृषिदांच्या समोर उभे होते आणि त्यांनी विचारलं, ‘अब क्या करोगे दादा?’

दादा तरी काय करणार होते? ते गोंधळून गेले होते. सगळी तयारी झालेली असताना, शुटिंगला सुरवात व्हायला अवघे काही दिवस उरलेले असताना नायक गोटा करून आला होता.

त्याचा लूक तरी कसा ठरवणार? संपूर्ण ऑफिसमधे किशोरदा दंगा करत, खोड्या करत फिरले आणि घरी निघून गेले. अर्थातच या भूमिकेतून त्यांना काढण्यात आलं.

आता या भूमिकेत कोण? हा मोठा प्रश्न होता. कोणीतरी राजेश खन्ना यांचं नाव सुचविलं. भल्या भल्यांनी नाकारलेली भूमिका राजेश खन्ना तरी सहज कसे स्विकारणार होते?

 

anand movie inmarathi

 

त्यांच्याशी शून्य अपेक्षेनं बोलणी चालू झाली. त्यांना हृषिदांची अडचण समजत होती, मात्र तोच जुना पेच आताही होता. कथानक आवडलेलं, पण शेवट नाही.

राजेश खन्ना यांना कसंबसं या भूमिकेसाठी तयार करण्यात आलं. मनात शंका होतीच, पण  स्वतःला संपूर्ण झोकून राजेश खन्ना यांनी ही भूमिका साकारली आणि पुढचा सगळा इतिहास तर तुम्हाला माहितच आहे.

अनेक पुरस्कार मिळवून राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीतील महत्वाची भूमिका ठरलेला ‘आनंद’ आज हिंदी चित्रपट इतिहासातला क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?