Site icon InMarathi

टुकार ट्रेलर्स, मराठी सिनेमांची भ्रष्ट नक्कल : बॉलिवूडचा बेगडीपणा पुन्हा सिद्ध झालाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

गेल्या आठवड्यापासून सगळीकडेच वेगवेगळ्या बॉलिवूड चित्रपटांची चर्चा होतीये. सिनेमागृह, नाट्यगृह बऱ्याच मोठ्या प्रतिक्षेनंतर सुरू झाल्याने प्रेक्षकही नवीन गोष्टी बघायला चांगलेच उत्सुक आहेत.

सध्या कोणताही नवा सिनेमा रिलीज झाला नसला तरी, येत्या काळात दिवाळी, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर बरेच मोठमोठे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण आज याच सिनेमांच्या आणि बॉलिवूडच्या एकंदरच खूळचटपणाबद्दल सविस्तर भाष्य करणार आहोत.

एकीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेरशाह किंवा सरदार उधम सारखे पावरफुल आणि तगडे सिनेमे बघायची सवय प्रेक्षकांना लागलेली असताना दीड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर बॉलिवूड तुमच्यासाठी काय घेऊन येतंय, तर सूर्यवंशी, अंतिम, सत्यमेव जेयतेसारखे बालिश सिनेमे!

 

 

या तिन्ही फिल्म्समध्ये कॉमन फॅक्टर म्हणजे या सिनेमांचे ट्रेलर्स. ३ ते ४ मिनिटांचा ट्रेलर कट केल्यावरसुद्धा यांची अपेक्षा असते की लोकांनी एवढं सगळं ट्रेलरमध्ये बघूनसुद्धा खास तिकीट काढून सिनेमा बघायला यावं.

सूर्यवंशीसारख्या सिनेमाचा साडे चार मिनिटांचा ट्रेलर पाहूनच मला असं झालं की बास आता सिनेमात काहीच नाही बघायला. जे काय surprise element होते ते सगळेच यांनी ट्रेलरमध्ये टाकले, आता यांचा सिनेमा मास ऑडियन्स तरी कशाला बघायला जाईल.

अरे बाबांनो आजकाल सिनेमात ३ मिनिटाच्या वर एक गाणंही दिसत नाही त्याच जमान्यात तुम्ही सिनेमाचा ट्रेलरच ४ मिनिटाचा कट केलात तर लोकांनी वेगळं काय आणि का बघायला यावं?

बरं एवढं करून अक्षय कुमार हेलिकॉप्टरवर लटकून येणार, अजय देवगण नेहमीप्रमाणेच चालत्या कारमधून एंट्री घेणार, रणवीर नेहमीसारखी काहीतरी टुकार स्टाईल मारणार, कतरिना काय फक्त काही गाण्यांपूरती समोर येणार, आता हे एवढं सगळं दाखवल्यावर त्यात नेमकं काय बघायला राहिलंय हे त्या दिग्दर्शकाला तरी शोधून सापडणार आहे का?

 

 

खरंच आपल्या इंडस्ट्रीतल्या लोकांनी ट्रेलर कसे कट करायचे याचे प्रशिक्षण घ्यायला हवं, ट्रेलर किंवा टीजरमधून प्रेक्षकांची उत्सुकता तणायला हवी, फक्त मासच नाही तर क्लास ऑडियन्सलासुद्धा तुमच्या सिनेमात काय आहे हे बघायची उत्सुकता वाटायला हवी, कारण आपल्या देशातला ५० % प्रेक्षकवर्ग असा आहे जो ट्रेलर बघून सिनेमा बघायचा का नाही हे ठरवतो.

कारण सामान्य माणसासाठी कुटुंबाला घेऊन सिनेमाला जाणं हे तसं खर्चीकच आहे, आणि सणांच्या मुहूर्तावर जरी लोकं पैसे खर्च करून सिनेमा बघायला आले तरी त्यांच्यासाठी अशी कोणतीतरी गोष्ट ठेवा जी त्यांनी ट्रेलरमध्ये पाहिली नाहीये!

सूर्यवंशीप्रमाणेच जॉन अब्राहमसारख्या गुणी नटाकडून आणखीन एक ‘सत्यमेव जयते २’ नावाचा टुकार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुळात देशभक्तीला मसाला लावून आपल्या देशात ज्या पद्धतीने सिनेमात प्रेझेंट केलं जायचं, तो काळ गेलाय हे फिल्ममेकर्स कधी समजणार?

उरी, शेरशाहसारखे सिनेमे लोकांनी उचलून धरले कारण त्यात प्रेझेंट केलेली देशभक्ती ही लोकांच्या जवळची वाटली, फक्त ओरडा आरडा किंवा नुसती मारामारी, किंवा भारी भरकम डायलॉग म्हणजेच देसभक्ती यातून बॉलिवूड कधी बाहेर पडणार हे परमेश्वरच जाणे!

जॉन अब्राहम हा खरंतर तसा सेन्सीबल नट आहे, पण त्याच्याकडूनसुद्धा हे असले टुकार सिनेमे यायला लागले की खूप वाईट वाटतं. भाऊंनी फोर्स सिनेमात दोन्ही हातानी पल्सर काय उचलली, आता तर थेट गाडीवर बसलेल्या माणसासकट बाइक उचलण्याचा पराक्रम जॉनने या सिनेमात केला आहे.

 

 

बरं एवढंच नाही तर जॉन भाऊ इतक्या जोराने एका लाकडी टेबलावर हात आपटतात की भूकंप यावा तशी त्या टेबलला भेग पडते आणि चक्क टेबलाचे दोन भाग पडतात.

एवढ्यावरच थांबेल तर तो जॉन कसला, जे इंजिन कारमध्ये अशा पद्धतीने फिट केलेलं असतं की जे अपघाताच्या वेळेसही बाहेर येणार नाही, पण जॉन भाई आपले ते इंजिनसुद्धा स्वतःच्या हाताने उखडतात.

म्हणजे देशभक्ती आणि अॅक्शनचा तडका दिला की सगळेच सिनेमे सुपरहीट होतात या भ्रमातून बॉलिवूड कधी बाहेर येणार? म्हणजे एक काळ होता की रजनीकांत यांच्या सिनेमात असे स्टंट बघायला मिळायचे, पण काळानुसार साऊथच्या सिनेमातसुद्धा फिजिक्सचा अभ्यास चांगलाच वाढला असून ते आपल्यापुढे केव्हाच निघून गेले आहेत.

बरं आता आपण येऊया एका अखेरच्या सिनेमाच्या ट्रेलरकडे तो म्हणजे आपल्या लाडक्या एकमेव भाईजानच्या ‘अंतिम द फायनल ट्रूथ’! या सिनेमातून भाईजान आपल्या मेहुण्याला रीलॉंच करणार आहेत, कारण पहिल्या सिनेमात त्यांच्या मेहुण्याला कुणीच भाव दिला नव्हता त्यामुळे या सिनेमात खुद्द भाईजान या सिनेमात काम करणार आहेत.

 

 

बरं भाईजान सिनेमात काम करणार म्हंटल्यावर तुम्हाला वाटतं का की त्यातल्या इतर कोणत्या कलाकारांवर फोकस असेल? या प्रश्नाचं उत्तर लहान शेंबडं पोरगं पण देईल. आणि अगदी तसंच या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसतंय, कारण ट्रेलरमध्ये फक्त आपले भाईजान आणि त्यांचे डायलॉगच आहेत.

हा सिनेमा म्हणजे आपल्या मराठीतल्या माईल स्टोन मानल्या जाणाऱ्या मुळशी पॅटर्न या सिनेमाचा रिमेक आहे, आणि जेव्हा या सिनेमाचा रिमेक भाईजान करणार आहेत अशी न्यूज कानावर आली होती तेव्हाच मी हार मानली.

मुळशी पॅटर्नमधून शेतकऱ्याची व्यथा, त्यांच्या मुलांच्या व्यथा, गुन्हेगारी विश्व आणि ते वास्तव ज्या दाहकतेने आणि सच्चाईने मांडलं होतं त्याच्या १ % जरी या बेगडी रिमेकच्या ट्रेलरमध्येसुद्धा दिसलं असतं ना तरी भाईजान त्या दिवशी गाडी चालवत नव्हता हे मी हसत हसत मान्य केलं असतं!

 

 

पण एका मराठी सिनेमाची इतकी भ्रष्ट नक्कल उभ्या जन्मात कधी पाहिली नसेल अशी फिलिंग हा अंतिमचा ट्रेलर बघताना आली, आणि प्रवीण तरडेसारख्या गुणी माणसाच्या सिनेमाला महेश मांजरेकरसारखा दिग्दर्शक हिंदीत बनवून त्यांची जी थट्टा करू पाहतोय हे खरंच नाही बघवत. महेश मांजरेकर यांनी मुळशी पॅटर्नसारख्या सिनेमाचा हिंदी रिमेक सलमानसोबत करावा ही मराठी इंडस्ट्रीतली शोकांतिकाच आहे.

खरंच एवढ्या संवेदशील आणि सेन्सीबल सिनेमाचा अपमान करणाऱ्या भाईजानच्या आणि महेश मांजरेकरसारख्या दिग्दर्शकाच्या करियरचा हा सिनेमा ‘अंतिम’ ठरो आणि पुन्हा हे असले भ्रष्ट रिमेक करायची दुर्बुद्धि कुणालाच न होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version